‘लक्ष’ खेचून पैसे कमावणारी ‘अटेन्शन इकॉनॉमी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:13 IST2025-11-13T11:11:43+5:302025-11-13T11:13:54+5:30
Attention Economy: लोकांचे लक्ष किंवा अटेन्शन हे एक मौल्यवान संसाधन मानून त्याचा वापर पैसे मिळवण्यासाठी केला जातो तेव्हा त्यातून उभी राहिलेली अर्थव्यवस्था ही ‘अटेन्शन इकॉनॉमी’ म्हणून ओळखली जाते.

‘लक्ष’ खेचून पैसे कमावणारी ‘अटेन्शन इकॉनॉमी’
लोकांचे लक्ष किंवा अटेन्शन हे एक मौल्यवान संसाधन मानून त्याचा वापर पैसे मिळवण्यासाठी केला जातो तेव्हा त्यातून उभी राहिलेली अर्थव्यवस्था ही ‘अटेन्शन इकॉनॉमी’ म्हणून ओळखली जाते. डिजिटल युगात विशेषतः सोशल मीडिया, मोबाइल ॲप्स, वेब साईट्स आणि जाहिरातींमधून सतत कोणीतरी काहीतरी दाखवण्याचा, विकण्याचा प्रयत्न करत असतं. त्या उत्पादनाला आपण देतो त्या अटेन्शनमधून ‘अटेन्शन इकॉनॉमी’ उभी राहते आणि विकसित होते.
इंटरनेटमुळे आणि प्रचंड प्रमाणातील माहितीमुळे लोकांचं लक्ष वेधून घेणं ही स्पर्धा आहे. त्याची किंमतही भरमसाट आहे. जो ब्रँड, ॲप किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अधिकाधिक लक्ष वळवून घेण्यात यशस्वी होतो, तो अधिक पैसा कमवतो. उदाहरणार्थ, फेसबुक, इन्स्टाग्राम, यू ट्यूब किंवा नेटफ्लिक्ससारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यावर किती वेळ खर्च करतो त्यावर पैसे मिळवतात. आपण त्यांच्यावर जेवढा जास्त वेळ घालवतो, तेवढं जास्त उत्पन्न त्यांना जाहिरात स्वरूपात मिळतं.
ही अर्थव्यवस्था वापरकर्त्यांचं डिजिटल वर्तन समजून घेऊन त्यांचा वापर करून पैसे मिळवण्यासाठी आपल्या स्ट्रॅटेजीज आखते. त्यामुळेच अल्गोरिदम्स, नोटिफिकेशन्स, ट्रेंड्स, व्हायरल कन्टेंट यांचा वापर करून वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
हे अर्थशास्त्र काही बाबतीत मानवजातीच्या हिताचं असलं, तरी त्याचे दूरगामी परिणाम अधिक आहेत. लक्ष एकाग्र न होणं, सतत लक्ष विचलित होणं, माहितीच्या महापुरातून माहितीचा निर्माण होणारा मानसिक थकवा, सोशल मीडिया ॲडिक्शन, सुपिरअरिटी किंवा इन्फिरिअरिटी काॅम्प्लेक्स, जे नाही ते आहे असे दाखवण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे. या नव्या अर्थव्यवस्थेतून आता नवनवे मानसिक विकार उद्भवू लागल्याने ही अर्थव्यवस्था एका नव्या जागतिक चिंतेचं कारण बनू लागली आहे.