दहशतवाद पेरला; सांगा, फळ कुठले मिळेल? पाकिस्तानने पोसलेल्या तालिबानचाच आता पाकला विळखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 08:38 IST2026-03-08T08:38:17+5:302026-03-08T08:38:37+5:30
पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानची बिजे रोवली. आश्रयही दिला. दहशतवाद, जिहादी नेटवर्कचा वापर करून भू-राजकीय प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.

दहशतवाद पेरला; सांगा, फळ कुठले मिळेल? पाकिस्तानने पोसलेल्या तालिबानचाच आता पाकला विळखा
दहशतवाद पेरणाऱ्यांना आणखी कुठले फळ मिळेल? आज अफगाणिस्तान–पाकिस्तान सीमेवरचा संघर्ष हेच उत्तर देतो. हे अचानक उफाळून आलेले संकट नाही. तो केवळ सीमावाद नाही. हा आहे दशकानुदशके पेरलेल्या दहशतवादाच्या बिजांचा परिणाम. आज तालिबानपाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर हल्ले करत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानही प्रत्युत्तर देत आहे. पण या संघर्षाची सुरुवात केवळ गोळीबाराने झाली नाही. ही सुरुवात तेव्हाच झाली, जेव्हा दोन्ही देशांत दहशतवादाला राज्यकारभाराचे साधन बनवले गेले. ज्याचा वापर पाकिस्तानने भारतावर अनेकदा केला. आज त्याच पाकिस्तानला हे भोगावे लागत आहे.
पाकिस्तानच्या लष्करी विचारधारेत 'स्ट्रॅटेजिक डेप्थ' ही संकल्पना प्रभावी राहिली. भारतासोबत युद्ध झाले, तर अफगाणिस्तानात पाकिस्तानस्नेही सत्ता असावी, जेणेकरून पश्चिम सीमा सुरक्षित राहील. अशी यामागची भूमिका होती. यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानची बिजे रोवली. आश्रयही दिला. दहशतवाद, जिहादी नेटवर्कचा वापर करून भू-राजकीय प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आधीची 'रणनीती' आता पाकिस्तानसाठी 'आत्मघात' ठरत आहे. तालिबान एकेकाळी पाकिस्तानचे साधन होते. भारताचा अफगाणिस्तानातील प्रभाव रोखण्यासाठी त्याचा वापर केला गेला. पण आज तालिबान पाकिस्तानवर हल्ले करत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानला भारताशी मैत्री ठेवायची आहे. ही बाब पाकला बोचणारी आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षाची बीजे त्यांनीच रोवलेली
‘तहरीक-ए-तालिबान’ ठरला मोठा धोका
‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) हा पाकिस्तानविरोधी गट आहे. पाकला हानी पोहोचवण्यात हा गट आघाडीवर आहे. पण तो कुठून जन्मला? हा प्रश्न पाकिस्तानने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. जिहादी इकोसिस्टिमला खतपाणी घालत पाकिस्तानने आणि तिथल्या दहशतवादी म्होरक्यांनी तालिबानी दहशतवादाला वाढवले. प्रोत्साहन दिले. 'चांगले दहशतवादी' आणि 'वाईट दहशतवादी' असा हास्यास्पद भेद करण्याचा प्रयत्न केला. पण सत्तेसमोर चांगले-वाईट नसते. आज ‘टीटीपी’ पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे.
पाकिस्तानची सर्वत्र कोंडी
अमेरिकेच्या तुकड्यांवर जगणाऱ्या पाकला दोन्ही बाजू सांभाळताना नाकी नऊ आले आहेत. एकीकडे पाकिस्तान कसा दहशतवाद पोसत आला, वाढवत आला हे भारत जगाला दाखवून देत आहे. दहशतवादविरोधी मोहिम रूजवत आहे. यासाठी पाठिंबा मिळवत आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानही पाकिस्तानला जेरीस आणत आहे. अधून-मधून बलुचिस्तानची आर्मीही पाकला घरात घुसून मारत आहे. चक्रव्युहात अकडलेल्या पाकिस्तानने बाहेर पडण्याचा मार्ग केव्हाच स्वतःसाठी बंद करून घेतला आहे.
ड्युरंड रेषा : वादाचे मूळ
हे सारे जिथे घडतेय, त्या ड्युरंड रेषेने आतापर्यंत पाकिस्तानला अनेक जखमा दिल्या आहेत. ड्युरंड रेषा ही केवळ सीमा नाही. ती इतिहासाची जखम आहे. पाकिस्तान अन् अफगाणसाठीही ओरखडा आहे. अफगाणिस्तानने कधीही तिला पूर्ण वैधता दिली नाही.
पश्तून समाज दोन भागांत विभागला गेला. सीमा प्रत्यक्षात मोकळीच होती. परिणामी दहशतवादी गट कधी या देशात तर कधी त्या देशात सहज उड्या मारू लागले. त्यांना आश्रय मिळत गेला.
भारताने नेमकं कशावर लक्ष ठेवायला हवं?
लष्कराचा प्रभाव
पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढणे हे भारतासाठी कधीच चांगले संकेत नसतात. आजच्या पाकिस्तानच्या परिस्थितीच्या केंद्रस्थानी आहे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा वाढता प्रभाव. एकीकडे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत पातळीवर बंडखोरांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. या कारवायांमुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता आणखी वाढताना दिसते.
अमेरिकेशी संबंध
इतिहास पाहिला तर पाकचे अमेरिकेशी जवळचे संबंध लष्करी सत्ताकाळातच वाढले आहेत. १९८० च्या दशकात जनरल झिया-उल-हक यांच्या काळात व २००० च्या दशकात परवेझ मुशर्रफ यांच्या काळात ते चांगले होते. आता पुन्हा दाेघांची जवळीक वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत. जर या संबंधांमुळे पाकिस्तानला अधिक शस्त्रसामग्री मिळाली, तर भारतासाठी ते चिंतेचे कारण ठरू शकते.