Strict steps have been taken to curb pollution in the capital, Delhi | राजधानी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी हवीत कठोर पावले

राजधानी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी हवीत कठोर पावले

- शैलेश माळोदे
देशाची राजधानी दिल्ली, पुन्हा एकदा ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या धर्तीवर प्रदूषण आणि गारठ्याच्या धुक्यात हरवून जात त्यातून दोषारोपांच्या चक्रात अडकली आहे. दरवर्षी या दिवसात दिल्लीतील धुके इतके दाट होते की हिवाळ्यापेक्षा प्रदूषणाचा विळखाच मनाला खूप यातना देतो, शारीरिक यातनांबद्दल तर न बोललेलेच बरे. दरवेळेला ‘प्रदूषणात वाढ’ यासारख्या मथळ्यांचे फार कौतुकही आता राहिलेले नाही. वायुप्रदूषण हा केवळ दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा बनलाय. तो केवळ पर्यावरणीय मुद्दा राहिलेला नाही की त्यावर परिषदांतून पक्त चर्चेचे गुºहाळ लावावे आणि बाहेर पडल्यावर वाहनातून डिझेलवर चालणाऱ्या इंजीनद्वारे प्रदूषणकारी वायुउत्सर्जन करीत निघून जावे.
वायुप्रदूषण हा सार्वजनिक आरोग्याशी निगडित मुद्दा बनलाय. त्याचा संबंध प्रत्येक श्वसन करणाºया जीवाशी आहे. केवळ मनुष्यच नव्हे तर प्राण्यांशीही आहे. अबालवृद्ध आणि स्त्री-पुरुष तसेच धर्म, जात हा विषय त्यात नाहीच. ज्या प्रमाणात वायुप्रदूषणात वाढ होतेय त्याच प्रमाणात जणू नीती निर्धारकांचा त्या संदर्भातील प्रतिसाद मंदावतोय, असे मत व्यक्त होताना दिसते. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या २०१६ च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी १ लक्ष मुले पाच वर्षांची होण्याच्या आतच मृत्युमुखी पडताना दिसताहेत. कारण हवाप्रदूषण त्याचप्रमाणे देशातील लोकांचे सरासरी आयुर्मानही जागतिक प्रमाणापेक्षा दोन ते तीन वर्षांनी घटतेय.
आकडेवारी असे दर्शवते की जगातील इतर समकक्ष परिस्थिती असलेल्या राष्ट्रांच्या तुलनेत भारताची स्थिती वायुप्रदूषणाचा विचार करता अत्यंत वाईट आहे. ग्रीनपीस संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असून दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे. शेजारी देशांशी तुलना केल्यास स्थिती अधिकच वाईट असल्याचे दिसते. चीनचा आकडा पाच, पाकिस्तान दोन आणि बांगलादेशचा एक आहे. पर्यावरणीय कामगिरीचा विचार करता जागतिक क्रमवारीत भारत शेवटून चौथ्या म्हणजे १८१ राष्ट्रांत १७७ व्या स्थानावर आहे. उर्वरित क्रमांक बांगलादेश, बुरुंडी, डेमॉक्रेटिक रिपब्लिक आॅफ कांगो आणि नेपाळ यांचे आहेत.


सध्या दिल्लीच्या स्थितीचा विचार करता येथील बालकांचे आरोग्य आणि जीवनाचा दर्जा खूप खालावलेला आहे. आरोग्याचा विचार करता काही तज्ज्ञांच्या मते दररोज २२ सिगारेट्स ओढल्यानंतर जे काही प्रदूषण फुप्फुसात होत असेल त्या पातळीची स्थिती सध्या दिल्ली हवेची आहे. वाढते पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे प्रदूषकांचे विविध स्रोतांपासून वाढणारे प्रमाण हे पूर्वीच धोकादायक असल्याने सार्वजनिक आरोग्यासाठी काळजीचे कारण होते. परंतु सध्याचे पार्टिक्युलेट मॅटरचे संकट पूर्वीपेक्षा वेगळे आहे. कारण लोकांची प्रदूषण पातळी मॉनिटर करण्याची क्षमता वाढलीय आणि ही खूपच महत्त्वाची बाब आहे. केवळ हवामान खात्याशी संबंधित संस्था वा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अंदाज आणि आकड्यांवर अवलंबून राहण्याचे दिवस विविध अ‍ॅप्समुळे इतिहासजमा झाले आहेत. तरीही वाढती जागरूकता आणि सामाजिक माध्यमांवर व्यक्त होणारा संताप अर्थपूर्ण कार्यवाहीत रूपांतरित झालेला दिसत नाही.
हवेची घटती गुणवत्ता लक्षात घेता आणि त्यात स्थानिक घटकांचा वाटा ध्यानात ठेवता केंद्र आणि राज्य सरकारला अप्रिय परंतु कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. दिल्लीतील खासगी वाहनांची मोठी संख्या लक्षात घेता सम-विषम वाहनांचा दिल्ली सरकारचा निर्णय आणि त्याचबरोबर गरज भासल्यास हवेची गुणवता खूप घसरल्याच्या स्थितीत दुचाकी, तिचाकी आणि अगदी चारचाकींवरही बंदी आणण्यासारख्या निर्णयाबरोबरच बांधकाम रोखणे, दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील वीज केंद्र बंद ठेवण्यासारखे पर्याय वापरावे लागतील.

दिल्ली सरकार आणि केंद्राद्वारे संपूर्ण वर्षाच्या आकडेवारीची सरासरी दाखवून परिस्थिती सुधारत असल्याचा आभास निर्माण केला जातो आणि त्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा तळ झाकला जातो. परिस्थिती बिकट होण्यापूर्वी किमान दोन महिने अगोदरच याबाबत कठोर पावले उचलायला हवीत. त्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकारांतील कठीण नातेसंबंध लक्षात घेत नागरिकांच्या आरोग्यासाठी खºया अर्थाने ठोस कार्यवाही करणारी सक्षम, मजबूत आणि स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. नाहीतर दरवर्षी त्या काळापुरत्या क्षणिक प्रतिक्रिया उमटतील आणि प्रदूषणाविरुद्धची लढाई केवळ प्रार्थना आणि हवेवर अवलंबून राहील. दिल्लीकरांनी खरोखरच याचा विचार करायला हवा.
(पर्यावरण अभ्यासक)

Web Title: Strict steps have been taken to curb pollution in the capital, Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.