विशेष लेख: ...आधी उपमुख्यमंत्री, आता राष्ट्रीय अध्यक्ष, पुढे?
By यदू जोशी | Updated: February 27, 2026 06:44 IST2026-02-27T06:43:16+5:302026-02-27T06:44:33+5:30
सुनेत्राताईंच्या धीरोदात्तपणाचे, शांतपणाचे कौतुक झाले; पण आता त्यांना 'बोलावे' लागेल. त्यांची आणि पार्थ या दोघांचीही आता खरी परीक्षा असेल !

विशेष लेख: ...आधी उपमुख्यमंत्री, आता राष्ट्रीय अध्यक्ष, पुढे?
-यदु जोशी (राजकीय संपादक, लोकमत)
अजितदादांच्या अपघाती निधनाला उद्या एक महिना पूर्ण होईल. दुःखातून सावरत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, आता त्या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षही झाल्या आहेत. काळ थांबतो थोडाच? सुनेत्राताईच्या धीरोदात्तपणाचे, शांतपणाचे कौतुक झाले, पण आता आहेत त्याच मूड आणि मोडमध्ये त्या राहिल्या तर कौतुकाची जागा टीका घेईल. धीरोदत्तपणा हा आजचा गुण उद्याचा अवगुण ठरेल. संयमाचीही 'एक्सपायरी डेट' असते. धीरगंभीरता एका वळणापर्यंत ठीक असते. आता विधिमंडळात काय किंवा बाहेरही काय; त्यांना बोलावे लागेल. वारसा हा आधार आहे पण भविष्य हे कृतीतूनच लिहिले जाईल.
वयाच्या पासष्टाव्या वर्षी राजकीय कारकिर्दीची नवी उंची गाठण्यासाठी अजित पवार यांनी स्वतःमध्ये प्रचंड बदल करवून घेतले होते, आता ती वेळ नियतीने सुनेत्रा पवार यांच्यावर वयाच्या बासष्टाव्या वर्षी आणली आहे. त्यांना वा पार्थ पवारांना मागे सारून पटेल, तटकरे पक्षाचा कब्जा घेतील, अशी आवई काही जणांनी उठवली होती, तेव्हा याच ठिकाणी असे लिहिले होते की ते शक्य नाही. ही राष्ट्रवादी असो की ती... पवार या नावाशिवाय चालू शकत नाही. आज ते खरे ठरले आहे. पटेल, तटकरे हे अष्टप्रधान मंडळात राहतील, पण प्रमुख होणार नाहीत.
सल्लागार मात्र कायम
अजितदादांच्या जागी सुनेत्राताई आल्या, पण अजितदादांची जागा सर्वदृष्टीने त्या किती लवकर घेतात ते त्यांच्या नेतृत्वाच्या आणि पक्षाच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. पार्थ पवार उद्या राज्यसभेत जाणारच आहेत, आईबरोबर त्यांचीही कसोटी आहे; चिडचिड न करता परिपक्वता आणणे हाच त्यांच्यासाठी योग्य मार्ग असेल. कारण आईच्या कारभारात त्यांच्या म्हणण्याला फारच महत्त्व असते, असे म्हणतात. अजितदादांची उणीव सुनेत्राताई कितपत भरून काढू शकतील, याचा अंदाज त्यांच्या पक्षातील नेते सध्या बांधत आहेत. पक्षाध्यक्ष, उपमुख्यमंत्री म्हणून पुढचे एक वर्ष सुनेत्राताईसाठी अतिशय महत्त्वाचे असेल. कारण, त्यांच्या एकूणच क्षमतेचे मूल्यमापन आतले आणि बाहेरचेदेखील करत राहतील. 'लाडावलेला मुलगा' या प्रतिमेतून बाहेर येत पार्थ पवार त्यांना किती परिपक्वपणे साथ देतात हेही महत्त्वाचे असेल.
माहिती अशी आहे की, महिन्याकाठी बक्कळ पैसा घेणाऱ्या एका सल्लागाराला घरी पाठवण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला होता. त्याच्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याची नोटीस २९ जानेवारीला देण्याचे ठरले होते. पण अजितदादा गेले अन् सल्लागार अजूनही कायम आहेत. गेल्या महिनाभरात आपले कोण आणि परके कोण, याची एक यादी सुनेत्राताईंनी तयार केली असेलच. अजितदादांचे जे अगदी खूपच निष्ठावंत होते ते सुनेत्राताईजवळ इच्छा असूनही मन मोकळे करू शकत नाहीत आणि राजकीय मजबुरी म्हणून जे अजितदादांना नेते मानायचे ते आता चमकोगिरी करत आहेत, असे म्हणतात.
विरोधी पक्षनेता नाही अन् विरोधकही नाहीत
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसताना होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. विरोधी पक्षनेता तर नाहीच, पण विरोधही दिसत नाही. संख्येने दुबळे असलेले विरोधक सरकारवर हल्ला चढवण्याबाबतही खूपच कमकुवत दिसतात. सरकारची कोंडी होण्याऐवजी विरोधकांचीच झालेली दिसत आहे. तीन पक्षांमधील समन्वय बेपत्ता झाला आहे. सरकारशी भांडायचे सोडून राज्यसभेच्या एका जागेसाठी एकमेकांशीच भांडत आहेत. नाना पटोले यांच्याकडे गोव्यात लग्न होते, त्यामुळे ते पहिल्या आठवड्यात अधिवेशनात नव्हते. सोमवारपासून ते येतील तेव्हा विरोधकांची कामगिरी एकदम उंचावेल, अशी अपेक्षा करावी काय?
जाता जाता
सार्वजनिक बांधकाम विभागात २९३ कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. चर्चा अशी आहे की, 'धर्मा'च्या नावाखाली अधर्म केला जात आहे. सोबत कोणी दिनेशही आहे म्हणे! सरकारी नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांकडून 'मागणी' केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे.
अशा तरुणांचे सरकारबद्दल आणि एकूणच सरकारी नोकरीबद्दल काय मत होईल? हेच की इथे पैसे द्यावे लागतात आणि खावेही लागतात. या परस्पर झालेल्या अधर्मामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या राज्यमंत्र्यांनी धर्मासह तिघांना खूप झापले म्हणे, पण उपयोग काय? घ्यायचे ते घेऊन झाले आहे, आता कनिष्ठ अभियंत्यांना ते परत थोडेच दिले जाणार? मोठी इनिंग खेळण्याची संधी असलेल्या नेत्यांनी अपप्रवृत्तींना दूर केलेच पाहिजे.
'सावज टप्प्यात आल्याशिवाय मी शिकार करत नसतो' असे सुधाकरराव नाईक म्हणायचे. त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी टप्प्यात आलेल्या अपप्रवृत्तींना टिपले पाहिजे.
yadu.joshi@lokmat.com