- हरीश गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि चार शंकराचार्यांपैकी एक असलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यातील संघर्षाचे रूपांतर आता राजकीयदृष्ट्या संवेदनशील धार्मिक पेचप्रसंगात झाले आहे. हा पेच आणखी चिघळेल अशी चिंता भाजपला वाटते. गोहत्येवर देशभर बंदी आणावी यासाठी चार शंकराचार्य दिल्लीत बैठक घेण्याचे ठरवत असून, चौघेही भाजपवर नाराज आहेत. अयोध्येत राममंदिराचा समारंभ झाला त्यावेळी उपस्थित राहायला चौघांनीही नकार दिला होता. परंतु, संवेदनशील विषय असल्याने शंकराचार्यांवर जाहीर टीका करायची नाही, असे भाजपने ठरवले.
योगी आणि शंकराचार्य यांच्या झालेल्या वादात पडण्याचेही काळजीपूर्वक टाळले जात आहे. भाजप गप्प आहे याचा अर्थ तो तटस्थ आहे असे मात्र नाही. दिल्ली आणि योगी आदित्यनाथ यांच्यातील संबंध फार सलोख्याचे नाहीत. हा वाद चिघळला तर योगी राजकीयदृष्ट्या दुर्बल होतील आणि दिल्लीला मध्यस्थ म्हणून शंकराचार्यांशी बोलण्याची संधी मिळेल. बहुतेक याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वेगळा सूर लावायला सुरुवात केली आहे. योगींच्या भूमिकेपासून ते स्वतःला बारकाईने बाजूला ठेवत आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी 'एका दगडात दोन पक्षी' मारण्याचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरावे. राष्ट्रीय स्तरावरील बेचैनीचा मुद्दा राज्यातील पेचप्रसंगातून सोडवू दिला जात आहे. या विषयापासून हिशेबी अंतर राखल्यामुळे तणाव कमी होतो की वाढतो हे पाहावे लागेल. उत्तर प्रदेशातील धार्मिक विसंवाद हा केवळ श्रद्धेपुरता मर्यादित नसून तो सत्तेशी निगडित आहे. योगींना वेसण घालण्याची पक्षश्रेष्ठींची इच्छा असू शकेल. एरव्ही हा धोकादायक खेळ ते खेळले नसते. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा गेले काही महिने योगी करत आहेत, हेही येथे महत्त्वाचे!
राजनाथ आणि शिवराज यांचा अपवाद..मोदी यांच्या भाजपवर सत्ता कडेकोट पद्धतीने केंद्रित झालेली असली, तरी दोन नेते मात्र त्यातून सुटल्याचे दिसते. राजनाथ सिंह आणि शिवराजसिंह चौहान. आता त्यांना हात लावता येणार नाही, पण त्यांच्यापासून धोकाही नाही अशा 'चौकटी'त त्यांनी स्वतःला बसविले आहे. ७४ वर्षांचे राजनाथ सिंह मोदी मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ मंत्री. जगदीप धनखड प्रकरणात खासदारांच्या गुपचूप सध्या घेणे किंवा उपराष्ट्रपतीपदाविषयीचे धोरण ठरवणाऱ्या बैठकीचे अध्यक्षपद यासारखी नाजूक पण विश्वासाची कामे करून त्यांनी शांतपणे आपली निष्ठा दाखवून दिली. सरकारमध्ये ते अधिकृतपणे दुसऱ्या क्रमांकावर असले, तरी तसे कधीच दाखवत नाहीत. बोलत नाहीत; शांत राहतात. यामुळे सर्व गटात स्वीकारले जातात. महत्त्वाकांक्षा काबूत ठेवून पुढे सरकतात.
शिवराजसिंह चौहान यांनी मात्र उलटा रस्ता धरला आहे. मध्य प्रदेशात दणदणीत बहुमत मिळवून दिल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात आले. कठोरपणे जागा दाखविली गेली. तेव्हा ते बंड करतील असे अनेकांना वाटले होते. परंतु, केंद्रीय कृषीमंत्री आणि मोदींचे अत्यंत बोलके निष्ठावंत म्हणून शिवराज यांनी स्वतःला तयार केले. एकेकाळी जे त्यांच्याकडे मोदींचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहत होते त्यांना याचे आश्चर्य वाटते. सध्याच्या भाजपमध्ये राजनाथ आणि शिवराज ही 'जुळवून घेण्या'ची दोन उदाहरणे मानली जातात. एक स्वतःकडे कमीपणा घेतो, दुसरा जरा जास्तच बोलतो. दोघांनाही दीर्घकाळ टिकून राहण्याची महत्त्वाकांक्षा आहे. नव्या भाजपमध्ये हक्क सांगितल्याने पुढे चाल मिळत नाही तर आपापल्या शैलीने नमते घ्यावे लागते, हेच या दोघांची कहाणी सिद्ध करते.
झारखंडमध्ये काय शिजते आहे?झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अलीकडे वारंवार दिल्लीत दिसतात. ते दावोसमधील बैठकीलाही उपस्थित होते. मोदी सरकारने ज्यांना तेथे जाऊ दिले अशा विरोधी पक्षाच्या भाग्यवान मुख्यमंत्र्यांपैकी सोरेन एकमेव ठरले. अलीकडे सोरेन पाच दिवस दिल्लीत होते. भाजप नेत्यांना ते भेटले आहेत अशा वावड्या उठू लागल्या. काही तासांसाठी ते अहमदाबादला जाऊन तिथेही भाजप नेत्यांना भेटले अशी चर्चा सुरू झाली तेव्हा एका मोठ्या उद्योगपतीने ठेवलेल्या पोलो सामन्यासाठी ते गेल्याचा खुलासा आला. पण दोन गोष्टी महत्त्वाच्या- सोरेन यांच्याविरुद्ध ईडीचा तपास चालू आहे... आणि दुसरे, त्यांचे वडील, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मरणोत्तर 'पद्मभूषण' देण्यात आले.
Web Summary : Tensions rise between Yogi Adityanath and Shankaracharyas, creating a political dilemma for BJP. The party's silence hints at a strategic move, potentially weakening Yogi while national issues play out. Rajnath Singh and Shivraj Singh are examples of adjusting to the BJP's current power structure. Jharkhand's CM's Delhi visits raise eyebrows amid investigations.
Web Summary : योगी आदित्यनाथ और शंकराचार्यों के बीच तनाव बढ़ने से भाजपा के लिए राजनीतिक दुविधा पैदा हो गई है। पार्टी की चुप्पी एक रणनीतिक कदम का संकेत देती है, जो संभावित रूप से योगी को कमजोर कर सकती है जबकि राष्ट्रीय मुद्दे सामने आते हैं। राजनाथ सिंह और शिवराज सिंह भाजपा की वर्तमान शक्ति संरचना के अनुकूल होने के उदाहरण हैं। झारखंड के मुख्यमंत्री की दिल्ली यात्रा जांच के बीच भौंहें उठाती है।