विशेष लेख: महायुुतीने सहावी जागा लढवली आणि समजा पडले... तर?

By यदू जोशी | Published: February 2, 2024 10:17 AM2024-02-02T10:17:48+5:302024-02-02T10:19:43+5:30

Rajya Sabha Election: भाजप आणि मित्रपक्ष राज्यसभेच्या पाच जागा लढवतील आणि जिंकतील. सहावी जागा लढण्याची जोखीम महायुतीने पत्करली तर रंगत येईल.

Special Article: Rajya Sabha Election, Mahayuti will contests sixth seat of Rajya sabha and it Loss, Then? | विशेष लेख: महायुुतीने सहावी जागा लढवली आणि समजा पडले... तर?

विशेष लेख: महायुुतीने सहावी जागा लढवली आणि समजा पडले... तर?

- यदु जोशी
(सहयोगी संपादक, लोकमत)

ही २०१५ मधली गोष्ट आहे. राज्यसभेचे उमेदवार ठरविण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत सुरू होती.  दोन तीन नावे ठरवून दिल्लीला पाठवायची असे चालले होते. त्यासाठी बैठकीत खल सुरू होता. तेवढ्यात दिल्लीहून फोन आला... ‘उद्या सकाळी एका दलित उमेदवाराचे नाव सुचवा...’ सगळेच चाट पडले, राज्यसभेत पाठवता येईल असा दलित चेहरा कोण याची शोधाशोध सुरू झाली अन् तेव्हा अडगळीत पडलेले पिंपरी-चिंचवडचे अमर साबळे यांना खासदारकीची लॉटरी लागली. सांगण्याचा मतलब एवढाच की भाजपमध्ये काहीही होऊ शकते. 

 राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक आहे. उमेदवारीबाबत भाजपमध्ये धक्कातंत्राचा अवलंब केला जाऊ शकतो. माध्यमांमधून कितीही नावे येऊ देत, शेवटी वरचे दोघे अन् देवेंद्र फडणवीस काय ते ठरवतील. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे बिहारचे प्रभारी आहेत, नितीशकुमार एनडीएत परतले त्यात त्यांचाही रोल होताच. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी तावडेंना तेथून हलवून मुंबईतून लढविले जाणार नाही असे अनेकांना वाटते. म्हणूनच  त्यांना राज्यसभेवर पाठविले जाईल, असे म्हणतात. तावडे हुशार आहेत. २०१४ मध्ये त्यांचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी एका शब्दाने नाराजी व्यक्त केली नाही, ते काम करत राहिले. आधी पक्षाचे राष्ट्रीय सचिव, मग सरचिटणीस झाले. आता शहा-नड्डांच्या जवळ आहेत. पंकजा मुंडे या तावडेंकडून काही शिकल्या नाहीत. राज्यसभा, विधान परिषदेची निवडणूक आली की संभाव्य उमेदवारांमध्ये पंकजा यांचे नाव असते आणि नंतर कटते. त्यामुळे आता त्यांचे नाव संभाव्यमध्ये घेत नाही म्हणजे तरी त्यांना संधी मिळेल. 

नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे की त्यांचे पुत्र आ. नितेश राणे यांना महाराष्ट्रात पुढे मंत्री म्हणून संधी द्यायची, या दोनपैकी एक पर्याय निवडला जाईल. दुसऱ्या पर्यायाला पसंती दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. सिनिअर राणेंना थांबविले तर मग मुलाला भविष्यात मोठे करण्याचा शब्द दिला जाईल. प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेची वाट अवघड मानली जाते. पक्ष संघटनेत त्यांची सेवा घेतली जाऊ शकते.  भाजपकडून यावेळी एक मराठा, एक ओबीसी आणि एक नॉन मराठा-नॉन ओबीसी असे तीन उमेदवार दिले जाऊ शकतात. तीनपैकी एक महिला असू शकते. दोन मराठी वृत्तपत्रांचे मालकही शर्यतीत आहेत. 

भाजप आणि मित्रपक्ष ५ जागा लढवतील आणि जिंकतील. सहावी जागा लढण्याची जोखीम भाजपने म्हणजे महायुतीने पत्करली तर रंगत येईल. सहावी जागा जिंकायची तर महाविकास आघाडीत उभी फूट पडावी लागेल. साम दाम दंड भेद सगळे वापरावे लागेल; पण तसे केले तर निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जातो या आरोपाला बळकटी मिळेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची प्रतिमा खराब करून घेण्याची जोखीम भाजप पत्करेल का? सहाव्या जागेसाठी भाजपला ३० ते ३५ मतांची गोळाबेरीज करावी लागेल. 

गेल्या वेळी राज्यसभा, विधान परिषद निवडणूक झाली तेव्हा भाजपने चमत्कार केला होता. त्या चमत्काराचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस होते. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता. त्यामुळे गमावण्यासारखे काहीही नव्हते. जिंकले काय किंवा हरले काय फार फरक पडणार नव्हता. यावेळी ते सत्ता पक्षात आहेत. सहावी जागा लढले आणि पडले तर त्या पडलेल्या जागेची अधिक चर्चा होईल पाच जागांचे काही कौतुक होणार नाही. काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या आधी त्याचा मुहूर्त साधला गेला तर चमत्कार घडून सहावी जागाही पदरात पाडून घेतील.

संख्याबळ बघितले तर भाजप व मित्रपक्ष पाच जागा जिंकू शकतात. महाविकास आघाडी एक जागा जिंकेल. संख्याबळानुसार ही एक जागा काँग्रेसला मिळायला हवी.  तुलनेने महाविकास आघाडीला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी कमी आमदार संख्या लागेल. आघाडीने दुसरी जागा एखाद्या मोठ्या पैसेवाल्याला दिली तर तो रंगत आणू शकेल; पण प्रश्न भाजपशी दोन हात करण्याच्या मानसिकतेचा आहे. 

सत्ता पक्षाला विरोधी पक्षाची मते फोडणे सोपे असते. ते काम विरोधी पक्षासाठी तेवढेच कठीण असते. सत्ता पक्षाच्या सावलीत असलेले आमदार महाविकास आघाडीच्या सध्या उन्हात असलेल्या घरात का म्हणून जातील? गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे क्रॉस वोटिंग झाले होते. त्याची चौकशी करण्यासाठी मोहन प्रकाश समिती नेमली होती. कोणत्याही आमदारावर कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळे क्रॉस वोटिंग केले तर काही फरक पडत नाही, असा मेसेज काँग्रेसच्या आमदारांमध्ये गेला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) मतांबाबत व्हीप  कोणाचा चालेल हा कळीचा मुद्दा असेल.

जाता जाता :  
ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांची परवा भेट झाली. ते म्हणाले, ‘मंत्रालयात जायचे तर याच्या त्याच्या ओळखीने जावे लागते. पास नाही ना माझ्याकडे. मी पत्रही दिले होते मागे पण काहीही झाले नाही.’ पोपटरावांसारख्या अनेक नामवंतांना मंत्रालयात जाण्यासाठी ताटकळावे का लागावे? निदान पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री असे सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेल्यांना तरी मंत्रालय प्रवेशाचा पास सन्मानाने द्या. मंत्री, आमदारांचे आठ-दहा चमचे दादागिरी करून एकाच वेळी मंत्रालयात जातात तेव्हा बरे चालते!

Web Title: Special Article: Rajya Sabha Election, Mahayuti will contests sixth seat of Rajya sabha and it Loss, Then?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.