विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?

By यदू जोशी | Updated: April 18, 2025 07:13 IST2025-04-18T07:09:39+5:302025-04-18T07:13:05+5:30

सगळ्याच राजकीय पक्षांनी आपले दिवंगत नेते ‘एआय’च्या मदतीने सभेत उतरवले तर? बदलत्या तंत्राचा वापर करावा; पण आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे? 

Special article on whether it is right to change Balasaheb Thackeray's views with the help of Artificial Intelligence uddhav thackeray | विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?

विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?

- यदु जोशी (सहयोगी संपादक, लोकमत)
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे परवा नाशिकच्या मेळाव्यात भाषण झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ते शक्य झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनंतर जी भूमिका घेतली ती बाळासाहेबांच्या विचारांनुसारच घेतली, असे भासवण्याचा हा प्रयत्न होता. तंत्रज्ञानाचा हा नवा आविष्कार आहे. प्रत्येकच राजकीय पक्ष आपल्या दिवंगत नेत्यांचा अशा पद्धतीने वापर करू लागला तर?  अनेक दिवंगत नेत्यांना मग ‘डबल रोल’ करावे लागतील. त्यांनी आधी मांडलेल्या विचारांना विसंगत असे कथन ‘एआय’च्या मदतीने त्यांच्याकडून ‘वदवून’ घेता येणे आता सहज शक्य झाले आहे.  

पुढच्या काळात सगळेच राजकीय पक्ष तसे करू शकतात. वर्तमानातले राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी आपल्याच दिवंगत नेत्यांचा उपयोग करण्याच्या या भलत्या प्रयोगात आपल्या वंदनीय नेत्यांची विरोधाभासी प्रतिमा आपण उभी करत आहोत, याचे भान सुटायला वेळ लागणार नाही. 

केवळ उद्धवसेनाच नाही तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीनेदेखील महाराष्ट्रात राजकीय मित्र बदलले ते सत्तेसाठी. हा बदल करण्याचे पाप आपल्यावर ओढवून न घेता ते आपल्या पूर्वीच्या नेत्यांवर लादणे कितपत योग्य आहे, याचा विचारही करावा लागेल. 

स्वतः सत्तेसाठी वैचारिक गोंधळ निर्माण करायचा आणि मग तो निस्तारण्यासाठी ज्यांच्या मनात कधीच कुठला  गोंधळ नव्हता त्यांची मदत घ्यायची, असे हे प्रकरण आहे. भाजपला तर गोपीनाथ मुंडेंपासून अनेकांचे साहाय्य  घ्यावे लागू शकते.

बाळासाहेब गेले त्याला आता १३ वर्षे झाली.  एक तप लोटल्यानंतर त्यांचा आधार घ्यावा लागतो, ही राजकीय अपरिहार्यता म्हणायची का?  उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासह विविध मुद्द्यांवरील बाळासाहेबांची भूमिका सोडली, अशी टीका सातत्याने होत असताना  आपली भूमिका बाळासाहेबांच्या तोंडून वदवून घेण्याची ही एआय कल्पना पुढे आली. त्याऐवजी बाळासाहेबांचा प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडणारे ओरिजिनल भाषण ऐकवले गेले असते तर राजकीयदृष्ट्या त्याचा अधिक फायदा झाला असता. बाळासाहेबांचे इंटेलिजन्स आर्टिफिशियल नव्हते. आपल्या विचारासाठी जी जी म्हणून किंमत मोजावी लागली, ती त्यांनी मोजली. 

बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेणे, हे स्वाभाविकच! परंतु, बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे विचारच बदलून टाकणे हा शुद्ध अविचारच! आज ठाकरेंनी असे केले; उद्या भाजप, काँग्रेसही आपापल्या नेत्यांबाबत तसे करू शकतील. बाळासाहेबांची नक्कल करण्याच्या प्रयत्नात न पडता स्वतःची म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी  केला आणि त्यात त्यांना यशदेखील आले. तथापि, त्याला उतरती कळा लागली. 

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची नक्कल केली म्हणा किंवा त्यांची स्वत:ची शैली बाळासाहेबांसारखीच आहे असे म्हणा; पण तेही राजकारणातील सुरुवातीचा दबदबा नंतर टिकवू शकले नाहीत. त्यामुळे आधी आपण हिंदुत्व सोडायचे आणि नंतर बाळासाहेबांनाही ते सोडायला लावायचे, असा या ‘एआय’ भाषणाचा अर्थ झाला. 

अर्थात सध्याचा काळच राजकीय तडजोडींचा आहे. ज्यांना भ्रष्टाचाराचे महामेरू म्हटले त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजपने संग केलाच ना! या संगातून सत्तेचे गुटगुटीत बाळही झाले.जलसिंचन घोटाळ्याचे ट्रकभर पुरावे देऊ असे सांगत भाजपने बैलगाडीभर कागदपत्रे नेली; पण शेवटी ट्रक गेला, बैलगाडी तर गायब झाली आणि त्यातली कागदपत्रे कुठे गेली हेही कुणाला कळले नाही. सगळेच सत्तेच्या गाडीत छान बसले. भाजपने अजित पवारांना घट्ट जवळ करणे हे भाजपच्या परंपरागत मतदारांना आजही रुचलेले नाही, पण करणार काय? उपाय नाही.  

उद्धव ठाकरे यांची भूमिका पटली नाही, असे सांगत एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले होते. भाजपमध्ये असे एकनाथ शिंदे अजून पाच-दहा वर्षे तरी कोणी होणार नाही, पण त्याचा अर्थ खदखद नाही, असे मुळीच नाही.

शाह यांची ती कृती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडावर गेले होते. त्यानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रम आटोपला आणि अचानक शाह यांना काय वाटले कुणास ठाऊक? ते भावविवश झाले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात हातात घेऊन कोणतीही सुरक्षा सोबत न घेता ते पुन्हा स्मृतिस्थळावर गेले आणि तेथे पाच मिनिटे शांतचित्त बसून राहिले. 

काय होतेय ते सुरक्षा व्यवस्थेलाही कळले नाही. सगळेच अवाक् झाले. एवढ्या गर्दीत अचानक फक्त फडणवीस यांना घेऊनच ते असे वेगळे पाच मिनिटे शिवरायांच्या चरणी का बसले असावेत? 

जाता जाता 

नाशिकमधील उद्धवसेनेच्या शिबिरात ॲड. असीम सरोदे यांचे विचारप्रवण भाषण झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करा, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाला शिव्या देऊ नका, असे विचार त्यांनी मांडले. त्यावेळी समोरच्या रांगेत खा. संजय राऊत बसले होते. सरोदे यांच्या भाषणाचा राऊत यांच्यावर चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे. (yadu.joshi@lokmat.com)

Web Title: Special article on whether it is right to change Balasaheb Thackeray's views with the help of Artificial Intelligence uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.