विशेष लेख: पुस्तकं समाेर ठेवली पण उत्तरे कशी शाेधणार? ‘ओपन बुक एक्झाम’चा असाही एक पैलू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:41 IST2025-08-17T11:40:31+5:302025-08-17T11:41:48+5:30

अर्थातच हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही

Special Article How can you find the answers even if you have kept the books? Another aspect of the 'Open Book Exam' | विशेष लेख: पुस्तकं समाेर ठेवली पण उत्तरे कशी शाेधणार? ‘ओपन बुक एक्झाम’चा असाही एक पैलू

विशेष लेख: पुस्तकं समाेर ठेवली पण उत्तरे कशी शाेधणार? ‘ओपन बुक एक्झाम’चा असाही एक पैलू

सुरेंद्र दिघे, विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट, ठाणे

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि वैज्ञानिक यश पाल यांचे ‘ते’ विधान विचारप्रवण करणारे आहे. २००५मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा समितीचे ते अध्यक्ष होते. आराखड्याच्या प्रास्ताविकात त्यांनी ते विधान लिहिले होते. त्याचे स्मरण होण्याचे निमित्त असे की, चारच दिवसांपूर्वी  केंद्रीय शालेय अभ्यास मंडळाने (सीबीएसई) एक सूचना जाहीर केली. त्यानुसार नववीच्या भाषा, सामाजिक शास्त्र, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षा पुढील वर्षापासून ‘ओपन बुक’ पद्धतीने होतील. या निर्णयाचे मूळच मुळात पाल यांच्या ‘त्या’ विधानात आहे. ते विधान आहे - “आपण आपल्या मुलांना आकलनशक्ती दिली पाहिजे. त्या शक्तिद्वारे मिळणाऱ्या अनुभवातून ती स्वत:ची ज्ञानसंरचना करण्यास शिकतील. ही ज्ञाननिर्मिती आनंददायी असेलच, पण ती सर्वांगीण आणि सर्जनशील असेल.” म्हणूनच या विधानाशी सुसंगत धाडसी निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंडळाचे अभिनंदन!

अर्थातच हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही. नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट हे शिक्षण प्रणाली अधिक समावेशक, लवचीक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाभिमुख करणे हे आहे. नवीन धोरणाअंतर्गत, ‘राष्ट्रीय शालेय शैक्षणिक आराखड्या’त ही बाब स्पष्ट केली आहे. “विद्यार्थ्यांनी, पाठांतर आणि स्मरणशक्तीवर अवलंबून न राहता,  आकलन, चौकस, चिकित्सक आणि विश्लेषणबुद्धी वृद्धिंगत आणि विकसित करण्याचे  प्रयत्न  केले पाहिजेत.” पण केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाचा  ‘ओपन बुक’ परीक्षा घेण्याचा हा पहिलाच प्रयोग नाही.  
 

‘ओपन बुक एक्झाम’ कशी?

‘ओपन बुक एक्झाम’ ही संकल्पना जुनी व पाश्चात्य जगात रूजलेली आहे. परंतु, इथे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते की, ही पद्धत साधारणत: उच्च शिक्षणात वापरली जाते. शालेय शिक्षणात ही परीक्षा पद्धत  का वापरली जात नाही. याचे कारण समजून घेण्यासाठी ‘ओपन बुक’ संकल्पना काय ते समजून घेऊ. आपण सर्वांनी पहिलीपासून सर्व लेखी परीक्षा दिल्या आहेत. परीक्षेआधीचे टेन्शन, वर्गात प्रवेश केल्यापासून ते प्रश्नपत्रिका हातात येईपर्यंतची आणि प्रश्नपत्रिकेवर नजर टाकून श्वास सोडेपर्यंतची अवस्था अनुभवली आहे. विद्यार्थ्यांचा हा मानसिक ताणतणाव कमी व्हावा आणि त्याने मोकळ्या मनाने, शांत चित्ताने उत्तर पत्रिका लिहावी, या उद्देशाने ‘ओपन बुक एक्झाम’ संकल्पना आली. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना आपली आकलन, चौकस चिकित्सक, विश्लेषणात्मक, तुलनात्मक  बुद्धी वापरून स्वत:च्या  शब्दात मुद्देसूद लिहिणे, अशी अपेक्षा असते.

विद्यार्थी परीक्षेत नोट्स, पाठ्यपुस्तके, परवानगी असल्यास गॅजेटचा वापर करू शकतात, परंतु हे वापरताना, आपली  सर्जनशीलता व कल्पकता वापरून,  दिलेल्या प्रश्नाचे उत्तर अधिक व्यापक (सिन्थेसाइझ) आणि सर्वांगीण (सिनर्जिक) असावयास हवे. या सर्व गोष्टी आत्मसात करण्यास परिपक्वता लागते, ती शालेय वयात कठीण आहे. यामुळे ही परीक्षा जास्त गुण मिळवण्याचा शॉर्ट कट नाही, हे लक्षात येईल. महत्त्वाचे म्हणजे ही पद्धत यशस्वी करण्यासाठी अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकनाचा दर्जा तितका उंचीचा असणे अत्यावश्यक आहे. तो आहे का? आपले शैक्षणिक, सामाजिक व मानसिक वातावरण या सर्व  गोष्टींसाठी  पोषक आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

आक्षेप का घेतले जात आहेत?

सीबीएसईने २०१४  ते २०१७ या कालावधीत  ‘ओपन बुक एक्झाम’ हा उपक्रम राबविला होता. तो बंद का केला, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. गेली दोन वर्षे काही शाळांमध्ये हा उपक्रम ‘प्रयोग’ म्हणून राबविण्यात आला होता. या प्रयोगाची निरीक्षणे, विश्लेषण आणि निष्कर्ष यांचा विचार तज्ज्ञांनी निश्चित केला असणार. तरीही काही तज्ज्ञ आक्षेप घेत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वेबसाइटनुसार देशभर त्यांच्या २६,७४०हून जास्त शाळा संलग्न आहेत. त्यात लाखो मुले शिकत आहेत.

देशभर कोट्यवधी मुले शालेय शिक्षण घेत आहेत. ओपन बुक परीक्षेला अपेक्षित असलेली आदर्श साधने, सुविधा आणि मुख्य म्हणजे या परीक्षेला अपेक्षित असलेला प्रशिक्षित शिक्षकवर्ग आज देशात उपलब्ध नाही आणि नजीकच्या काळात तो तयार होणे शक्य नाही. ज्याप्रमाणे ‘सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा सोयीस्कर अर्थ, ‘आठवीपर्यंत नापास करावयाचा नाही’,  असा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी काढला होता, तसेच ‘ओपन बुक एक्झाम म्हणजे कॉपी करण्याचा खुला परवाना’ असा अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने असे घडले, तर देशातील संपूर्ण  शिक्षण व्यवस्था कोलमडून पडेल, याचा विचार सीबीएसई, केंद्र व राज्य शासनाने करावा.

Web Title: Special Article How can you find the answers even if you have kept the books? Another aspect of the 'Open Book Exam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.