विशेष लेख: प्रवेशासाठी स्पर्धा; पण कॉलेजांतल्या ‘जागा’ रिकाम्या! गणित नेमकं चुकतंय कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:31 IST2025-08-22T11:30:26+5:302025-08-22T11:31:02+5:30
अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधल्या कितीतरी जागा अजूनही रिक्त आहेत, याच्या बातम्या हल्ली सतत दिसतात. हे गणित नेमके कुठे चुकते आहे?

विशेष लेख: प्रवेशासाठी स्पर्धा; पण कॉलेजांतल्या ‘जागा’ रिकाम्या! गणित नेमकं चुकतंय कुठे?
डॉ. विजय पांढरीपांडे,माजी कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
सध्या विद्यापीठात विविध शाखांचे प्रवेश सुरू आहेत. त्यासंबंधीच्या अनेक बातम्या सामान्य माणसाला गोंधळात टाकणाऱ्या आहेत.एकीकडे आपली अशी समजूत झालीय किंवा करून देण्यात आली आहे की, कॉलेजचे प्रवेश म्हणजे कठीण स्पर्धा. या स्पर्धेचे टेन्शन पाल्य, पालक सगळेच घेतात. एकेक गुणामुळे प्रवेश हुकतात, हवं ते महाविद्यालय, हवी ती शाखा मिळत नाही अशी चर्चा दिसते.
दुसरीकडे अनेक विद्यापीठांत प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. अनेक विभागांत अनेक (शेकडो नव्हे हजारो) जागा रिक्त आहेत. अनेक कॉलेजेसमध्ये तर सत्तर-ऐंशी टक्के जागा रिकाम्या दिसतात. आता तर इंजिनिअरिंगच्या प्रवेशाबाबतीत देखील असेच काहीसे वृत्त येते आहे. केवळ तीस-पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी फी भरून प्रवेश नक्की केले आहेत म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचा निर्णयच झालेला नाही!
एक मेडिकलचे क्षेत्र सोडले तर गरजू विद्यार्थी कमी आणि विभाग, कॉलेजेस, प्रवेशसंख्या त्यामानाने जास्त अशी परिस्थिती दिसते. या सर्व प्रक्रियेत प्रशासकीय व्यवस्थेबरोबरच विद्यार्थी, पालक यांचे अज्ञान आणि अपुरी माहिती ही प्रमुख कारणे दिसतात. अमुकच विषयाला, शाखेला महत्त्व (भाव) द्यायचे, इतर शाखांना कमी लेखायचे असा मतप्रवाह दिसून येतो.
अगदी इंजिनिअरिंगचे उदाहरण द्यायचे तर अनेक सुशिक्षित पालकांना देखील बीई अन् बीटेक या दोन पदव्यांमधला, इंजिनिअरिंग कॉलेज आणि कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी यातला फरक माहिती नसेल. संगणक शाखेत, कॉम्पुटर सायन्समध्ये विज्ञान शिकवतात की, इंजिनिअरिंग असाही प्रश्न पडू शकतो. शिवाय नव्याने आलेल्या ‘एआय’, ‘एमएल’, ‘डेटा सायन्स’ या शाखांमध्ये नेमका फरक काय, कोणत्या शाखेत कोणते विषय शिकवले जातात, याची तरी चौकशी केली जाते का? माहिती विचारली जाते का?
या नव्या शाखेचे नवे विषय शिकवणारे तज्ज्ञ प्राध्यापक आणि त्या कोर्सेससाठी लागणाऱ्या अद्ययावत प्रयोगशाळा त्या कॉलेजात आहेत का? ज्या आधुनिक विषयावर प्रोजेक्ट करायचे, सेमिनार द्यायचे त्यासाठी मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ तंत्रज्ञ आहेत का?- याबद्दल अजूनही आपल्याकडे पुरेशी माहिती/ जागरूकता यांचा अभाव दिसतो.
खरे तर कॉमर्स, सायन्स, आर्ट्स शाखा अशा प्रत्येक क्षेत्रात आज संधी आहे. अनेक नवे व्होकेशनल कोर्सेस सुरू झाले आहेत. मीडिया, एन्टरटेन्मेंट, फॅशन, नर्सिंग, अप्लाइड सायन्स, टुरिझम, हॉस्पिटल मॅनेजमेंट, सर्व्हिस सेक्टर अशा कितीतरी शाखा आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात आपल्या आवडीचे क्रेडिट कोर्सेस घेण्याचे स्वातंत्र्य असते विद्यार्थ्याला. ही माहिती आवर्जून मिळवणारे आणि प्रवेशप्रक्रियेत ती वापरणारे विद्यार्थी-पालक आता बहुसंख्येने दिसले पाहिजेत. याबाबतच्या अनास्थेचे चित्रही बदलले पाहिजे. केवळ प्रवाहाबरोबर वाहत जाण्याने आपल्या आवडीचे स्थानक, आपल्या आवडीचे उद्दिष्ट साध्य होईलच याची खात्री नसते.
एकूणच शिक्षणक्षेत्राच्या बाबतीत उपलब्ध संधी, त्याचे भविष्यातील महत्त्व, उद्याच्या गरजा, त्यासाठी करावयाची मानसिक तयारी. या सर्व बाबतींत उचित समुपदेशन यंत्रणा ही आजची खरी गरज आहे. विद्यापीठ प्रशासन, शासनाचे शिक्षण विभाग, खासगी कॉलेजेसचे व्यवस्थापन सगळेच याबाबतीत उदासीन दिसतात. प्रवेश झाले नाहीत, विद्यार्थी संख्या कमी म्हणून कुणाचे पगार कमी होत नाहीत, की कुणाची नोकरी जात नाही. शिक्षणाचे खासगीकरण म्हणजेच व्यापारीकरण झाल्यामुळे अशा समुपदेशनाच्या बाबतीत उदासीनता वाढलेली दिसून येते.
कोर्सेस, विषय निवडताना सर्वांत जास्त महत्त्वाची असते व्यक्तिगत आवडनिवड. मला काय हवे, काय आवडते हे जास्त महत्त्वाचे. त्यापाठोपाठ जे आवडते ते करण्याची क्षमता, योग्यता आपल्यात आहे का?- याचे सुयोग्य आकलन! एखादी गोष्ट सध्या जमत नसली तरी जिद्दीने ती शिकण्याची, नवे ज्ञान आत्मसात करण्याची निदान चिकाटी तरी आहे का? हे तपासायला हवे. करिअर कोर्सेसची निवड ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे, याचे भान विद्यार्थी आणि पालक दोघांनाही हवे.या पार्श्वभूमीवर विद्यापीठांमधल्या रिक्त जागांमागील गणित तपासले पाहिजे आणि तातडीने सुधारलेही पाहिजे.
vijaympande@yahoo.com