विशेष लेख: दादा, तुम्ही वेळ चुकवली! इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच अकाली एक्झिट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 08:54 IST2026-01-29T08:53:48+5:302026-01-29T08:54:27+5:30

Ajit Pawar Death News: बुधवारी बारामतीजवळ विमान अपघात झाल्याची बातमी आली, तेव्हा इतके काही विपरीत घडेल, असे वाटले नव्हते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच. अजितदादा गेले. माझा जवळचा, दमदार, दिलदार मित्र मी गमावला. २०१९पासून आम्ही खूप जवळून काम केले असले तरी त्याहीपूर्वी राज्यहिताच्या विषयांवर  एकमेकांसोबत होतो.

Special Article: Ajit Dada, you missed the time! A premature exit just when it seemed like the innings would last long.. | विशेष लेख: दादा, तुम्ही वेळ चुकवली! इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच अकाली एक्झिट...

विशेष लेख: दादा, तुम्ही वेळ चुकवली! इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच अकाली एक्झिट...

देवेंद्र फडणवीस
(मुख्यमंत्री, महाराष्ट्र ) 

बुधवारी बारामतीजवळ विमान अपघात झाल्याची बातमी आली, तेव्हा इतके काही विपरीत घडेल, असे वाटले नव्हते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच. अजितदादा गेले. माझा जवळचा, दमदार, दिलदार मित्र मी गमावला. २०१९पासून आम्ही खूप जवळून काम केले असले तरी त्याहीपूर्वी राज्यहिताच्या विषयांवर  एकमेकांसोबत होतो. दूरदृष्टी असलेले नेते फार कमी असतात. दादा हे त्यापैकी एक. शब्दाला जागणारा नेता, मित्र कसा असतो, हे मी अत्यंत जवळून दादांच्या बाबतीत अनुभवले.

कितीही संकटे आली तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती मोजायचीही असते, हे दादांकडून शिकण्यासारखे आहे. काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या, ही इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली. आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. त्यांच्यासोबत मैफल जमायची. रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो. पण, त्यातही कामाच्या विषयांची यादी त्यांच्याकडे तयार असे.  धीरगंभीर विषयांवर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्त्व खुलायचे. मग त्यांच्यातील ‘दादा’ व्यक्त व्हायचा. कुणाची आणि कशाचीच पर्वा करायची नाही, असे उत्तुंग आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व! त्यांच्यातील भावनाप्रधान माणूस फार कमी लोकांनी पाहिला. पण, मला तेही दादा अनुभवता आले. कारण, आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले.

सकाळी सहा-सातला दिवस सुरू करणारे दादा थांबत नसत. सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागत असतात. अप्रिय वाटले तरी दीर्घकालीन जनहिताचे निर्णय घेण्यात दादा अग्रेसर असत. त्यांच्यापुढे एखादी फाइल गेली तर दोनच उत्तरे मिळत-  होकार किंवा नकार. ‘पाहतो-करतो’ ही शैली दादांना मान्यच नव्हती. सभागृहात ते ठामपणे उत्तरे देत. सभागृहातील नवीन सदस्यांना शिस्त आणि नियम शिकवण्यातही त्यांचा पुढाकार असे. मंत्रिमंडळ बैठकीत येण्यापूर्वी प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करून ते आलेले असत. १८-२० विषय असले तरी नेमक्या कोणत्या विषयात कोणता मुद्दा उपस्थित करायचा, हे त्यांना ठाऊक असे. काम घेऊन येणारा कोणत्या पक्षाचा, याचा विचार दादांनी केला नाही.  आम्हा दोघांनाही क्रिकेटची आवड. कोणताही सामना असला की आम्ही दोघेही ‘स्कोअर’ काय झाला, याची माहिती घेत असू. गाणी पण आमचा समान आवडता छंद. त्यातच दादांचा ‘सेन्स ऑफ ह्यूमर’ अफलातून. कितीही गंभीर विषय असूद्या, ते थेट गमतीत बोलून समोरच्याची विकेट बेमालूमपणे घ्यायचे.

दादांना बांधकामाची गुणवत्ता या विषयात फार रस. प्रत्येक सरकारी बांधकामावर त्यांची कडक नजर असे. बारामती मेडिकल कॉलेजची वीट न् वीट त्यांनी स्वत:च्या देखरेखीत घडवून घेतली होती. त्याच मेडिकल कॉलेजमध्ये नियतीने त्यांचे पार्थिव आणले, ही पण एक विटंबनाच. मनात आज अनेक वेदना आहेत. आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली, तेथेही दादा माझ्यासोबत होते. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊण तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो होतो. नियती निष्ठुर असते, आपले काही चालत नाही. दादा! तुम्ही तर कधीच वेळ चुकवायचे नाहीत ना! पण यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. तुम्ही अकाली ‘एक्झिट’ घेतली, दादा! - ही खंत कायम राहील..!

 

Web Title : दादा, आपने समय चूका: एक असामयिक निकास; एक क्षति

Web Summary : देवेंद्र फडणवीस ने अजीत पवार, एक करीबी दोस्त और दूरदर्शी नेता के निधन पर शोक व्यक्त किया। उन्होंने महाराष्ट्र के प्रति उनकी साझा प्रतिबद्धता, दादा की ईमानदारी, निर्णायक स्वभाव और राजनीति से परे उनकी दोस्ती को याद किया। दादा का असामयिक निधन एक शून्य और एक स्थायी अफसोस छोड़ जाता है।

Web Title : Missed the Time, Dada: An Untimely Exit; A Loss

Web Summary : Devendra Fadnavis mourns the loss of Ajit Pawar, a close friend and visionary leader. He recalls their shared commitment to Maharashtra, Dada's integrity, decisive nature, and their camaraderie beyond politics. Dada's untimely departure leaves a void and a lasting regret.