...तर या जातीय वणव्यात सर्वांची होरपळ होईल ! दसरा मेळाव्यातून महाराष्ट्राला काय मिळाले?
By नंदकिशोर पाटील | Updated: October 6, 2025 19:44 IST2025-10-06T19:44:11+5:302025-10-06T19:44:56+5:30
गांधी जयंती, धम्मचक्र परिवर्तन दिन आणि विजयादशमी या त्रिवेणी योगावर झालेल्या विचार मंथनातून महाराष्ट्राला काय मिळाले, हा खरा प्रश्न आहे.

...तर या जातीय वणव्यात सर्वांची होरपळ होईल ! दसरा मेळाव्यातून महाराष्ट्राला काय मिळाले?
- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर
विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यात वैचारिक, सामाजिक आणि राजकीय मंथन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे दसरा मेळावे झाले. गांधी जयंती, धम्मचक्र परिवर्तन दिन आणि विजयादशमी या त्रिवेणी योगावर झालेल्या या विचार मंथनातून महाराष्ट्राला काय मिळाले, हा खरा प्रश्न आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ज्याला 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून ओळखले जाते. तो दिवस विजयादशमीचा होता. म्हणून, बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी नागपुरातील दीक्षाभूमीवर येऊन या महामानवाला वंदन करतात. बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारणे, सामाजिकदृष्ट्या ही क्रांतिकारी घटना होती. तो धर्मांतराचा सोहळा नव्हता; तो समानता, स्वाभिमान आणि नव्या मूल्यांचा उच्चार होता. सर्वार्थाने ते ‘सीमोल्लंघन’ होते.
नागपूर ही जशी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते, तशीच ती संघभूमी म्हणूनही परिचित आहे. डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी २७ सप्टेंबर १९२५ रोजी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तो दिवसही विजयादशमीचा होता. तेव्हापासून सुरू झालेली दसऱ्याची संघ संचलनाची परंपरा कायम आहे. संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे यंदाच्या विजयादशमी सोहळ्याला विशेष महत्त्व होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख अतिथी म्हणून केलेली निवड लौकिकार्थाने खूप सूचक होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाषावाद, धर्मवाद, खाद्य संस्कृतीच्या राजकारणाला फटकारले, समरसतेचा मंत्र दिला. रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर-गांधी-संघ या तीन प्रवाहांना एकत्र आणणारा संदेश दिला. संघपीठावरून ‘स्वदेशी’चा नारा पुन्हा घुमला.
राज्यात इतर ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यातील मौक्तीकांची दखल घ्यावी असे नाही, कारण दसरा मेळाव्याच्या नावाखाली झालेले ते शिमगोत्सव होते. मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या दोन्ही पक्षप्रमुखांनी एकमेकांची यथेच्छ उणीदुणी काढली. गावखेड्यातील भाषेत सांगायचे तर ‘दसरा’ काढला. बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा व्यासपीठ कधीकाळी जनतेच्या मनाचा ठाव घेणारे होते. आज त्याच ठिकाणी ठाकरे–शिंदे यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा पिटाराच उघडतो. हिंदुत्वाच्या रंगावर स्पर्धा, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी आगपाखड, पण महाराष्ट्राला नवा संदेश नाही. ही परंपरा विचारधाराहीन झाली, हे स्पष्ट आहे.
मराठवाड्यात झालेल्या दोन दसरा मेळाव्यातून पुन्हा तोच जातीय विखार बाहेर पडला.. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली आहे. पण स्थळ बदलले. भगवानगडाऐवजी भक्ती गडावर मेळावा झाला. यावेळी बंधू धनंजय मुंडे सोबत होते. पण दोघांच्याही भाषाणावेळी व्यत्यय आणला जात होता. वाल्मीक कराडांचे पोस्टर्स झळकविण्यात आले. सत्तेबाहेर असल्याची खंत धनंजय यांच्या भाषणातून जाणवत होती. तर पंकजा यांनी ओबीसींच्या आरक्षणाची पाठराखण केली. जातीयवादाच्या रावणाचे दहन करण्याचे आवाहन त्यांनी केले. पण बीड जिल्ह्यात हा जातीय ‘रावण’ मोठा करण्यास कोणी हातभार लावला, याचे आत्मचिंतन बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी करायला हवे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पेरलेल्या जातीय विषबिजाचे परिणाम या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाला भोगावे लागत आहेत. नारायणगडावरून मनोज जरांगे-पाटील यांनी या प्रदेशातील दु:ख मांडले खरे, परंतु विरोधकांवर टीका करताना त्यांच्याही भाषेचा स्तर घसरला.
अतिवृष्टी, ढगफुटीने मराठवाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांची माती झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. खरीप पिकांचा चिखल झालाय. पंचनामे सुरू आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. १ सप्टेंबरपूर्वी झालेल्या नुकसानीची तुटपुंजी मदत खात्यावर जमा होत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांची नजर पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत आहे. २४ लाख हेक्टरवरील पीक धुवून गेले आहे. दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न आहे. शेतकरी, शेतमजूर संकटात आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत जातीय संघर्ष पेटवू नका. निवडणुका येतील आणि जातील. पण विसवलेली सामाजिक वीण पुन्हा जोडता येणार नाही. वारकरी संप्रदायातील संत-महंताने उभारलेले भक्तीचे गड जातीपातीत विभागू नका. संताच्या शिकवणीची ती प्रतारणा ठरेल. रामायणातील रावणाचा दहन सोपा; पण समाजात पेरलेले द्वेषाचे बीज जाळणे कठीण. पांडवांनी जसे शमीच्या झाडावर शस्त्र ठेवून संयम पाळला, तसेच आज महाराष्ट्राच्या नेत्यांनी आपली सत्तालालसा, जातीय विष आणि राजकीय राग शमीला अर्पण करायला हवा. अन्यथा ही आग प्रत्येक घरपोच पोहोचेल. या जातीय वणव्यात सगळ्यांचीच होरपळ होऊन जाईल.