...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात

By अतुल कुलकर्णी | Updated: November 10, 2025 13:16 IST2025-11-10T13:15:37+5:302025-11-10T13:16:20+5:30

Municipal Corporations Election: मुंबई (३६/६), ठाणे (१८/३), रायगड (६/२), पालघर (६/१) या चार जिल्ह्यांत मिळून ७६ विधानसभेच्या आणि १२ लोकसभेच्या जागा आहेत. शिवाय पुणे (२२/३) आणि नाशिक (१७/३) या दोन जिल्ह्यांत मिळून ३९ विधानसभेच्या आणि ६ लोकसभेच्या जागा आहेत.

...so BJP wants 9 Municipal Corporations of Greater Mumbai | ...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात

...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात

-अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
मुंबई (३६/६), ठाणे (१८/३), रायगड (६/२), पालघर (६/१) या चार जिल्ह्यांत मिळून ७६ विधानसभेच्या आणि १२ लोकसभेच्या जागा आहेत. शिवाय पुणे (२२/३) आणि नाशिक (१७/३) या दोन जिल्ह्यांत मिळून ३९ विधानसभेच्या आणि ६ लोकसभेच्या जागा आहेत. याचा अर्थ विधानसभेच्या २८८ जागांपैकी ११५, लोकसभेच्या ४८ पैकी १८ जागा फक्त सहा जिल्ह्यांमध्ये आहेत. याशिवाय महामुंबईतील ४ जिल्ह्यांत महानगरपालिका, ५ नगरपरिषदा, ११ ९ नगरपंचायती आणि ३ जिल्हा परिषदा आहेत. ९ महानगरपालिकांचे एकत्रित वार्षिक बजेट १ लाख कोटीचे आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर भाजपला महामुंबईचे चार आणि नाशिक, पुणे का महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल.

महामुंबईपुरते बोलायचे झाल्यास ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेल, उल्हासनगर, वसई-विरार आणि मुंबई अशा ९ महानगरपालिकांमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत या सर्व ठिकाणी महापौर आणि स्थायी समिती चेअरमनही भाजपचाच कसा होईल, यासाठीची रणनीती भाजपने कधीच आखली आहे. पक्षाचे त्या-त्या मतदारसंघातील प्रभारी म्हणून भाजपने ज्या पद्धतीने नेमणुका केल्या आहेत, त्यावरून त्यांचे हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट पंगा घेतला. सगळ्यात आधी नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवला. त्या जनता दरबारात ठाणे शहराच्या शेकडो समस्या लोकांनी मांडल्या. त्यातून भाजपला जे दाखवून द्यायचे होते ते साध्य झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत 'जनता दरबार' घेतला आणि शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले.

नवी मुंबईमध्ये शिंदेसेना आणि गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये 'आडवा विस्तू' जात नाही अशी स्थिती आहे. ठाणे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, त्या ठिकाणी भाजप आमदारांची संख्या कितीतरी जास्त आहे. नवी मुंबई जरी ठाणे जिल्ह्याचा भाग असला, तरी तेथे स्वतंत्र महापालिका, स्वतंत्र पोलिस आयुक्तालय आहे. जिल्हा होण्याची क्षमता नवी मुंबईत आहे. त्या ठिकाणी गणेश नाईक यांनी आजपर्यंत राज्य केले आहे. नवी मुंबईत विविध प्रकारची विकासकामे, आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. त्यामुळे या शहरावर भाजप आणि शिंदेसेना दोघांनाही आपले वर्चस्व हवे आहे. पालघर जिल्हा वाढवण बंदरामुळे चर्चेत आला आहे. तिसऱ्या विमानतळाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे हा जिल्हा देखील भाजपला स्वतःच्या नियंत्रणाखाली हवा आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ठाणे व पालघर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नाईक यांच्याकडे ठाण्यासह नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर व कल्याण डोंबिवलीचीही जबाबदारी सोपवली आहे. शिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील आहेतच. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव नाईक यांच्याकडे निवडणुकीचे प्रमुखपद सोपवून शिंदेसेनेला संदेश देण्याचे काम केले आहे. आ. संजय केळकर यांनी ठाणे शहरात कायम एकनाथ शिंदे यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे. शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'आपला दवाखाना' योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची मालिका केळकर यांनी मांडली होती. त्याशिवाय ठाणे महापालिकेत असणारी अनियमितता, कथित भ्रष्टाचार, बेकायदा बांधकामे हे मुद्दे केळकर यांनी सातत्याने मांडले आहेत. ठाण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवसेना जेवढी विरोधात बोलणार नाही त्यापेक्षा जास्त विरोधी भूमिका भाजपचे आ. केळकर यांनी सातत्याने घेतली आहे. ठाण्यात भाजपने स्वबळावर लढले पाहिजे, हा मुद्दाही ते सतत मांडत आले आहेत. त्याच आ. केळकर यांची महापालिका ठाणे महापालिकेचे निवडणूक प्रमुख म्हणून भाजपने नियुक्ती करून शिंदेसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणले आहे. ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील पालिकेच्या जागावाटपाचा तिढा आता आधी गणेश नाईक, संजीव नाईक आणि संजय केळकर यांच्याशी बोलूनच सोडवावा लागेल. त्यांच्याकडून प्रश्न सुटला नाही तर तो प्रदेश पातळीवर जाईल, असेही भाजपचे नेते सांगत आहेत. शिंदेसेनेने अजून तरी कोणालाही प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

महायुतीचा भाग म्हणून लढण्याची जास्त निकड आज शिंदेसेनेला आहे. 'झाकली मूठ सव्वालाखाची' अशी भूमिका ठेवायची असेल तर शिंदेसेनेचे नेते तडजोड करतील. बिहार निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्या निकालानंतरही भाजप आणि शिंदेसेना यांची युती किती ताणायची, किती जोडायची, हे स्पष्ट होऊ शकते. मुंबईमध्ये भाजपला जास्त जागा लढवायच्या आहेत. त्यासाठी शिंदेसेनेने व्यावहारिक तडजोड केली तर ठाण्यात त्यांना थोड्याबहुत जागा मिळू शकतात. प्रत्येक मतदारसंघात भाजपने प्रभागनिहाय नियोजन केले आहे. भाजपसाठी अडचणीच्या असणाऱ्या जागाच शिंदेसेनेला ऑफर केल्या जातील. भाजप कोणतीही निवडणूक लाइटली घेत नाही. काय करायचे त्याची रचना त्यांच्याजवळ तयार आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे जसजसा निवडणुकीचा जोर वाढत जाईल तसतशी ही लढाई भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी पडद्याआड रंगली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. 

Web Title: ...so BJP wants 9 Municipal Corporations of Greater Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.