‘बारामतीकरां’ची झप्पी.. ‘अकलूजकरां’ची चुप्पी !

By सचिन जवळकोटे | Published: May 9, 2021 08:03 AM2021-05-09T08:03:47+5:302021-05-09T08:04:45+5:30

लगाव बत्ती...

Silence of ‘Baramatikars’ .. Silence of ‘Aklujkars’! | ‘बारामतीकरां’ची झप्पी.. ‘अकलूजकरां’ची चुप्पी !

‘बारामतीकरां’ची झप्पी.. ‘अकलूजकरां’ची चुप्पी !

Next

- सचिन जवळकोटे

‘जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतील तर फक्त अकलूजकरच,’ अशी डरकाळी ‘सिंहा’नं फोडली. ‘रणजितदादां’चा हा आत्मविश्वास पाहून बिच्चाऱ्या जनतेलाही विश्वास वाटला की ‘आता तोंडचं पाणी पळविलं जाणार नाही.’ बाकीचे सारे नेते निव्वळ पत्रकबाजीत रमले असताना साऱ्यांचंच लक्ष या ‘अकलूजकरां’कडं; पण कुठलं काय...‘उजनीचं पाणी’ पेटून पंधरा दिवस उलटून गेले तरीही ‘शिवरत्न’वरून भूमिका जाहीर नाहीच.

पालकमामां’नी गमाविला जिल्ह्याचा नैतिक विश्वास ! 

भीमातीरीच्या प्रचारादरम्यान पस्तीस गावांना पाणी देण्याच्या बाता किमान छत्तीस वेळा केल्या गेल्या. मतदान झाल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच ‘भरणेमामां’चं दुसरं रूप सोलापूरकरांना कळून चुकलं. नवीन पाणी देणं तर सोडाच, आहे तेही पाणी पळविण्याचा (त्यांच्या सभ्य भाषेत वळविण्याचा!) प्लॅन उघडकीस आला. इथल्या जनतेला प्रचंड धक्का बसला. विषय फक्त पाण्याचा नव्हता. विश्वासघाताचा होता. पाठीत खुपसल्या गेलेल्या खंजिराच्या धारदारपणाचा होता.

घास भरवू पाहणाऱ्या पालकांवर डोळे मिटून विश्वास ठेवणाऱ्या बालकाला जेव्हा कळतं की, घासात हळूच विष कालवलं गेलंय. तेव्हा त्याचं भावविश्व जसं उद्‌ध्वस्त होईल, तशीच भयावस्था सोलापूरकरांची झालेली. आता घसा कोरडा होईपर्यंत ‘भरणेमामा’ सांगत सुटलेत की, ‘आम्ही कुणाच्या तोंडचं पाणी पळविणार नाही.’  मात्र ‘पाणी कुणाचं’ हा मुद्दा तांत्रिक होता. या जिल्ह्याला विश्वासात न घेता परस्पर पाणी नेण्याचा मुद्दा नैतिकतेचा होता..  अन्‌ जिल्ह्याचा हाच नैतिक विश्वास ‘पालकमामां’नी आता कायमस्वरुपी गमाविलाय. हेच खरं.

आजपावेतो सोलापूरकरांच्या करंट्या ओंजळीत सांडपाणीच ओतलं जात होतं, हे सत्य ‘पालकमामां’नी प्रांजळपणे कबूल केलेलं. व्वाऽऽ हे ग्रेट मामा म्हणजे एकदम सत्यवचनी. शहराच्या दुहेरी पाईपलाईन भूसंपादनाचा निधी तोंडावर फेकला म्हणजे अख्खा जिल्हा आपल्याला वाजंत्री-बिजंत्री वाजवत पाणी वळवून देईल, असंही त्यांना वाटलेलं. व्वाऽऽ हे डबल ग्रेट मामा म्हणजे राजा हरिश्चंद्राचा जणू अवतारच.. पण इथली जनता भोळी हाय, पण येवढीबी खुळी नाय. लगाव बत्ती..

असो. ‘उजनी’तून शास्त्रशुद्धरित्या पाणी वळविण्याचं काम कसं कायदेशीर आहे, हे पटवून देण्यासाठी पुण्याच्या अधिकाऱ्यांचीही टीम ‘मामां’च्या मदतीला धावली. इथले अधिकारी मात्र चिडीचूप. बहुधा अनेकांची फॅमिली पुण्यातच असल्यानं निष्ठा विभागली गेली असावी. पण यात ‘पुणेरी’ प्रेमापेक्षा ‘बारामती’च्या भीतीची तीव्रता अधिक. कारण याचे खरे सूत्रधार कोण साऱ्यांनाच माहीत. ‘बारामती’ लोकसभा मतदारसंघात ‘इंदापूर’ येतं हेही जगाला ठावूक...अन्‌ ‘बारामतीकर’ कधीही नियमबाह्य काम करत नाहीत, याचाही साऱ्यांना अनुभव.. कारण चुकीचं कामही ते कायद्यात बसवूनच करतात, असं त्यांचेच चेले कौतुकानं खाजगीत सांगतात. 

आता विषय सोलापूरच्या स्थानिक नेत्यांचा. ‘उजनी’चं पाणी वळविण्याचे चार प्रोजेक्ट कसे पद्धतशीरपणे सुरू केलेत, हे गुपित इंदापूरकरांना सांगणाऱ्या ‘मामां’चा व्हिडिओ व्हायरल झाला, तरीही इथले नेते केवळ पत्रकं काढण्यातच मश्गुल. पत्रकार परिषद घेण्यातच रममाण. हे काम प्रत्यक्ष कसं थांबवायला हवं, यावर प्रॅक्टिकल आक्रमकता कुणाचीच नाही. ‘पाय ठेवू न देण्याची भाषा’ करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ‘पालकमामा’ दोन वेळा बैठकाही भरवून गेले. (कडक पोलीस बंदोबस्तात बरं का..).

कधीकाळी पंढरपूर वारी फोटोग्राफीसाठी हेलिकॉप्टरमधूनच ‘उजनी’ बघितलेल्या  ‘सीएम’च्या कट्टर ‘सैनिकां’नाही बहुधा या पाण्याच्या गांभीर्याची जाण नसावी. कारण आजपावेतो  पाणी-ऊस-साखर हे विषय या ‘भगवं उपरणं’वाल्यांपासून कोसो मैल दूर. त्यांना बहुधा या प्रश्नाशी कशाचंच देणं-घेणं नसावं. लगाव बत्ती..

राहता राहिला विषय दोन मोठ्या नेत्यांचा. ‘अजितदादां’च्या अत्यंत जवळचे समजल्या जाणाऱ्या ‘संजयमामां’नी याला विरोध केलेला; मात्र पाणी जाण्याच्या संतापापेक्षाही ‘बारामतीकरां’च्या हृदयात असल्याचा आनंद त्यांच्या पत्रकात अधिक होता. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे, त्यांनी कालच ‘जयवंतरावां’ना लेखी पत्र तरी पाठविलं. मात्र त्यातही पाणी देण्याच्या पर्यायावर अधिक चर्चा करण्यात आलेली.
 ‘उजनी’प्रश्नी सारा जिल्हा पेटला असताना ‘रणजितदादा’ मात्र अद्याप मौनावस्थेतच. ते ‘बारामतीकरां’ना घाबरतात, असंही कदापि नाही. मात्र गप्प राहून वेगळा ‘गनिमी कावा’ करण्याचा त्यांचा विचार असेल तर तशीही हालचाल कुठं नाही. मग ‘अकलूजकर’ गप्प का ? होय. सारा जिल्हा विचारतोय.. दादाऽऽ सारा जिल्हा विचारतोय. तुम्ही गप्प का ?
खरंच ‘अकलूजकरां’ची भूमिकाही कधी कधी अनाकलनीयच वाटते.

 २००९ ला ‘माढा लोकसभे’ला त्यांनी ‘थोरल्या काकां’साठी स्वत:हून जागा सोडली, तेव्हा सोलापूरच्या ‘डीसीसी’त ‘रणजितदादां’नी घाईघाईनं पत्रकार परिषद घेतलेली. ‘काका’ खासदार झाले, तरच मागासलेल्या सोलापूर जिल्ह्याचा विकास कसा होईल, हे पोटतिडकीनं सांगू लागले. तेव्हा एका पत्रकारानं त्यांना शांतपणे एवढंच विचारलं होतं, ‘याचा अर्थ आजपर्यंत तुम्ही विकास केलाच नाही, असं समजायचं का ? ’
या प्रश्नावर त्या काळच्या त्यांच्या स्वभावानुसार ते भडकले. (तेव्हा ते बँकेचे चेअरमन होते नां)  ‘मला माहीत होतं,  हा प्रश्न तुम्ही नक्की विचारणार,’  असं उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. जुना इतिहास आठवण करून देण्याचं कारण की, आताही तस्साऽच प्रश्न लोकांच्या मनातून उमटू लागलाय, ‘दादाऽऽ तुम्ही अद्याप शांतच. याचा अर्थ तुम्हाला हे नवं पाणी वाटप मान्य, असंच समजायचं का?’ लगाव बत्ती..

Web Title: Silence of ‘Baramatikars’ .. Silence of ‘Aklujkars’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app