अमेरिकेतील भारतीयांना कसली चिंता पोखरते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:38 IST2026-01-14T08:38:38+5:302026-01-14T08:38:51+5:30
२००० सालापर्यंत अमेरिकेत स्थायिक भारतीयांबद्दल स्थानिकांमध्ये आदर, कुतूहल आणि आश्चर्य असे. आता राग आणि असूया दिसते. असे का झाले ?

अमेरिकेतील भारतीयांना कसली चिंता पोखरते?
कुमार केतकर
ज्येष्ठ पत्रकार-संपादक राज्यसभेचे माजी सदस्य
सध्या अमेरिकेत असलेल्या भारतीयांची मनःस्थिती चिंताग्रस्त, अनिश्चितताग्रस्त आणि अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेला जाऊ इच्छिणारेही त्याच अवस्थेत आहेत. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या मानसिक कोलाहलाचे प्रतिध्वनी बहुतांश (मुख्यतः सवर्ण) मध्यमवर्गात उमटत असतात. या स्थितीचे सर्जनशील मनोविश्लेषण करण्यासाठी समाजशास्त्रज्ञाची आणि मानसशास्त्रज्ञाची गरज पडावी, इतकी ती गंभीर अवस्था आहे कधी सुप्त, कधी उघड!
ही स्थिती केवळ अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथाकथित लहरी धोरणांमुळे आलेली नाही. सर्वसाधारण अमेरिकन (मुख्यतः गोऱ्या) मध्यमवर्गातही भारतीयांविरोधात नफरत पसरू लागली आहे. तशीच पण वेगवेगळ्या तीव्रतेने अशी नफरत, चीड ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी आणि काही युरोपीय देशांतही पसरत आहे. ही नफरतीची साथ वेगाने पसरू लागली ती गेल्या १०-१५ वर्षात. त्यापूर्वीही ती सुप्त स्वरूपात होती. पण कधी त्या त्या देशातली सहनशक्ती, सभ्यता आणि सार्वजनिक सहिष्णुता अशी उग्रपणे उसळून विस्कटून जात नव्हती. निश्चित अशी काळ-वेळ-तारीख सांगता येणार नाही, पण साधारणपणे साल २००० पर्यंत भारतीयांबद्दल आदर, कुतूहल आणि आश्चर्य अशा भावना असत.
माझे बरेच जवळचे नातेवाईक, मित्र, सहकारी आणि सुपरिचित अशा व्यक्ती अमेरिकेतील निरनिराळ्या राज्यांत गेली बरीच वर्षे राहत आहेत. काही १९६५ पासून, काही १९८० पासून, काही नव्वदीच्या दशकात आणि बरेच जण २००० सालानंतर अमेरिकेत स्थलांतरित झाले! पत्रकारिता आणि विद्यापीठीय व्याख्यानांच्या, तसेच अनेक मराठी भारतीय सांस्कृतिक संस्थांच्या निमंत्रणांवरून मी ४० वर्षात किमान २० वेळा अमेरिकेत गेलो आहे. सर्व राज्यांमध्ये नाही तरी अनेक राज्यात प्रवास आणि वास्तव्य घडले आहे. पण अमेरिकनांच्या नजरेत सध्या दिसते तेवढी भारतीयांच्या विरोधातली नापसंती क्वचितच कधी अनुभवली असेल. हे खरे, की भारतविरोधी नफरतीची साथ एकाच तीव्रतेने सर्व राज्यांत पसरलेली नाही. पण जे 'एच-वन बी' व्हिसावर वा एखाद्या व्यवसाय-नोकऱ्यांमध्ये येऊन जाऊन असतात त्यांच्यापर्यंत या साथीचे जंतू येऊ लागले आहेत.
सुप्त असा वंशद्वेष, वर्णद्वेष, संस्कृतिद्वेष पूर्वी असला तरी तो काहीसा उग्र वा हिंस्त्रपणे व्यक्त होईल असे कुणालाही वाटत नव्हते. भारतीयांबद्दल पूर्वी असलेला आदर व कौतुकाची, भावना आता हेवा, मत्सर आणि असूयेतही रुपांतरित झाली आहे. ही नफरतीची साथ (किंवा लाट) सर्वदेशदूर का पसरली असावी? गेल्या १५-२० वर्षांत (मुख्यतः बाबरी मशीद उद्ध्वस्त केली गेल्यानंतर, म्हणजे ३० वर्षापूर्वी) एक आक्रमक असा नव-हिंदुत्ववाद आकार घेऊ लागला. परंतु त्याचा उग्र आविष्कार प्रथम दिसून आला, २००२च्या गुजरातमधील हत्याकांडामध्ये. तेव्हापासून देशा देशातच नव्हे तर अनिवासी भारतीय ज्या ज्या देशांत होते त्या सर्व देशांत एक नवा उन्माद उफाळून आला.
त्या उन्मादाची प्रतीके आणि प्रतिमा विविध स्वरूपांच्या होत्या. गणेशोत्सवाचे स्वरूप व्यापक होऊ लागले. नवरात्रात होणारा गरबा मोठाल्या स्टेडियममध्ये होऊ लागला. दसऱ्याचे रावणदहन अनेक अमेरिकन राज्यांमध्ये (युरोपातसुद्धा) मोठ्या उत्सवीपणे केले जाऊ लागले. ठिकठिकाणी दर आठवड्याला शनिमाहात्म्य, दासबोध वाचन, गीता पठण असे सामूहिक बैठकांचे कार्यक्रम होऊ लागले. हिंदूंचे विवाह सोहळे झोकात झगमगाटात आणि अस्सल अमेरिकी इयांगफॅन्ग शैलीत होऊ लागले. भारतातून परदेशात जाणाऱ्या धार्मिक पुरोहितवर्गाची संख्या खूपच वाढू लागली. बहुतेक मुलींच्या पालकांनी अमेरिकास्थित हिंदू (बहुतेकदा सवर्ण) मुलांचा स्थळ म्हणून शोध सुरू केला. अमेरिका हे नवमध्यमवर्गाचे तीर्थस्थळ झाले
साठीच्या दशकात अमेरिकेतील भारतीयांची संख्या ही काही हजारांत होती. पण १९६५मध्ये अमेरिकेने स्थलांतरितांना देशात येऊ देण्यासंबंधीचा कायदा अधिक व्यापक आणि उदार केला. भारतामधून सुशिक्षित इंजिनियर्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, प्राध्यापक अशा 'प्रोफेशनल्स 'नी अमेरिकेत जायला सुरुवात केली. नव्वदीच्या दशकात भारतीयांची अमेरिकेतील संख्या दहा लाखांच्या वर गेली. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर भारतात कॉम्प्युटर पर्व सुरू झाले. पंडित नेहरूंच्या काळात निर्माण झालेल्या आयआयटी आणि इतर अनेक विज्ञानविषयक संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेली हजारो तरुण मंडळी त्या संगणक पर्वामध्ये सामील झाली. त्या दशकात, म्हणजे नव्वदीच्या दशकात जे तरुण इंजिनियर्स वा अन्य प्रोफेशनल्स अमेरिकेत गेले, तेच आज तेथे बड्या बड्या अधिकारपदांपर्यंत पोहोचले आहेत.
इथवर सारे ठीक होते. पण भारतात मोदी राजवटीचा उदय आणि अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पर्वात पुन्हा घेतलेले कडवट उजवे वळण यामुळे अमेरिकेतल्या भारतीयांबद्दल स्थानिक अमेरिकनांच्या नजरेत संशय, राग आणि असूयेची भावना दिसू लागली आहे. याला तत्कालीन राजकीय घडामोडी आणि विशेषतः ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या विरोधात उघडपणे घेतलेली भूमिका याचा वाटा आहेच, पण या रागाला, संशयाला, असूयेला तेथे राहाणारे भारतीयही जबाबदार आहेत. कसे? - त्याबद्दल उद्याच्या उत्तरार्धात!
ketkarkumar@gmail.com