‘ती’ जळते, आपण पाहत राहतो! विष तत्काळ शरीराबाहेर काढावे लागते; अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:06 IST2026-03-19T10:05:08+5:302026-03-19T10:06:08+5:30
पुन्हा एक लक्ष्मी अहिल्यानगर जिल्ह्यात बळी ठरली. तिच्यावर ॲसिड फेकून तो पळाला. ती अवघी बारा वर्षांची. आपली सायकल घेऊन ...

‘ती’ जळते, आपण पाहत राहतो! विष तत्काळ शरीराबाहेर काढावे लागते; अन्यथा...
पुन्हा एक लक्ष्मी अहिल्यानगर जिल्ह्यात बळी ठरली. तिच्यावर ॲसिड फेकून तो पळाला. ती अवघी बारा वर्षांची. आपली सायकल घेऊन शाळेतून घरी चालली होती. वाटेत त्याने तिला अडवले. चेहऱ्यावर ॲसिडची बाटली रिती करून पसार झाला. आपला ॲसिडने विद्रूप झालेला चेहरा घेऊन लक्ष्मी आता पुढील आयुष्यात न्यायासाठी हेलपाटे मारेल. आपली पोलिस व्यवस्था त्यांच्या सवडीने आरोपीचा शोध घेईल. तो सापडलाच तर पुराव्यांची जंत्री जोडण्यात काही महिने जातील. मग, न्यायालयात तारखांचा पाऊस सुरू होईल. निकाल येईपर्यंत किती काळ जाईल, ते सांगता येणार नाही.
निकाल काय लागेल ते सांगणेही कठीणच. तोपर्यंत ‘आरोपीला कडक शिक्षा करा’ म्हणून एक- दोन मोर्चेही निघणार. ‘आम्ही तिला जलद न्याय देणार,’ अशी भाषणे राज्यकर्ते करणार. नाही म्हणायला मदतीचा एखादा धनादेश तिच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची छायाचित्रेही झळकतील. चटावरचे श्राद्ध उरकावे, तसे हे सगळे सोपस्कार आपण आता कुठल्याही घटनेत उरकतो आणि पुन्हा कुंभकर्णासारखे झोपतो. दिल्लीत पंधरा वर्षांच्या लक्ष्मीवर असाच ॲसिड हल्ला झाला होता. कारण, काय तर तिने लग्नास नकार दिला. पुरुषांनी नकार पचवायचे नसतात, अशी लबाड मानसिकता घेऊन पुरुष जगतो.
हा पुरुषार्थ ढोंगी, तकलादू. अन्यथा, प्रेमात नकार मिळाला म्हणून चवताळणारी पुरुष जात नोकरीत नकार मिळाल्यावर शेपूट घालून गप्प का बसली असती? विंचवाच्या नांगीत विष असते. त्यामुळे मनुष्यप्राणी बिचाऱ्या विंचवाची नांगी लगेच ठेचतो. तशी पुरुषांच्या मनातील ही विषारी नांगी ठेचली जाण्याची भीती पुरुषांना नाही, म्हणून ते मुजोरपणे वागताहेत. या देशात बारा वर्षांची लक्ष्मी असुरक्षित आहे. ती एकटी शाळेतून घरी सुखरूप पोहोचू शकत नाही, हे आपले विधिमंडळ, पोलिस, न्यायालय या सर्वांनी ध्यानात घ्यावे. कोपर्डीतील लक्ष्मीही अशीच शाळेतून घरी चालली होती. तेव्हा तिच्यावर अत्याचार झाला.
त्या दिल्लीतील लक्ष्मीवरही त्याने असेच झपकन ॲसिड टाकले. झारखंडमधल्या सोनालीवरही तिघांनी घरात घुसून ॲसिड ओतले. तिच्यावर तब्बल २२ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. तिने तर या वेदनांमुळे इच्छमरण मागितले होते. अशा अनेक लक्ष्मी आहेत. परवाच एका हभपने अहिल्यानगर जिल्ह्यातच एका अल्पवयीन लक्ष्मीला चुलीजवळील सांडशीने चटके देऊन तिच्यावर अत्याचार केला. काही महिने हा महाराज अत्याचार करीत होता, असा आरोप आहे. कपाळावर बुक्का लावला, म्हणजे मन साफ असते, असे नव्हे. हा अत्याचारी मानसिकतेचा राक्षसी पुरुष सर्वत्र आहे. महिलांचा आदर करावा, हे त्याच्या जाणिवेत आहे; पण नेणिवेत गेलेले नाही.
कायदे कठोर झाल्याचा डंका आपण पिटत असलो तरी महिला-मुली सुरक्षित नाहीत. अठरा वर्षांखालील बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी ‘प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट’ (पॉक्सो) कायदा आला. २०२३ ची आकडेवारी सांगते की, त्या वर्षात देशात या कायद्यांतर्गत तब्बल ६७ हजार गुन्हे दाखल झाले. त्यात थेट ३७६ हे अत्याचाराचे कलम लागलेले चाळीस हजार गुन्हे आहेत. एकूण गुन्ह्यांशी हे प्रमाण ९ टक्के आहे.
ॲसिड हल्ल्यावरही चर्चा खूप होते; पण हे गुन्हे थांबत नाहीत. २०१७ ते २०२३ या काळात ॲसिड अटॅकची चौदाशे प्रकरणे घडली. याबाबत स्वतंत्र कायदा नव्हता. तो आला. या गुन्ह्यासाठी दहा वर्षे कैद ते जन्मठेपेची शिक्षा आहे. पीडितेला भरपाईची तरतूद आहे. ॲसिड विक्रीवरही नियंत्रणे आणली गेली; पण तरीही गुन्हे थांबत नाहीत. कारण समाजाला कायद्याची भीती वाटतच नाही.
चेहऱ्यावर ॲसिड फेकणे, अत्याचार करणे म्हणजे त्या व्यक्तीचे आयुष्य, ओळख, स्वाभिमान आणि भविष्य एका क्षणात जाळून टाकणे. सर्वोच्च न्यायालय म्हणते की, केवळ ‘सुधारणावादी’ दृष्टिकोन चालणार नाही. कठोर शिक्षा आणि भीती निर्माण करणारी कारवाई हवी; पण केवळ न्यायालयीन निरीक्षणांनीही समस्या सुटत नाही. पोलिसांची तत्परता, न्यायालये, समाजाची जागरूकता यांचा संगम झाला, तरच बदल घडेल. ‘कायदे आहेत’ हे सांगण्याची गरज नाही, तर ‘कायदे चालतात’ हे सिद्ध करावे लागेल. विष तत्काळ शरीराबाहेर काढावे लागते; अन्यथा ते सर्व शरीरात भिनते. न्यायाला विलंब करणे, म्हणजे हे विष भिनवणे आहे.