Sharad Pawar Birthday: देवळात सतरंजीवर झोपलेल्या शरद पवारांच्या छातीवरून नाग गेला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:54 PM2019-12-12T13:54:18+5:302019-12-12T13:55:54+5:30

शरद पवारांचं बोलणं ऐकून जे.आर.डी. टाटा म्हणाले होते, ‘वन डे धिस बॉय विल बिकम अ प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया..’

Sharad Pawar Birthday special article some memories of sharad pawar political career | Sharad Pawar Birthday: देवळात सतरंजीवर झोपलेल्या शरद पवारांच्या छातीवरून नाग गेला अन्... 

Sharad Pawar Birthday: देवळात सतरंजीवर झोपलेल्या शरद पवारांच्या छातीवरून नाग गेला अन्... 

googlenewsNext

- दिनकर रायकर

वयाच्या 80व्या वर्षी सहसा राजकारणी निवृत्तीच्या उंबरठय़ावर उभे असतात. आपल्या आधीच्या आयुष्यात आपण कसे राजकारण केले, याच्या आठवणीत रमण्याशिवाय त्यांच्या जवळ तसे फारसे काही उरलेले नसते. कधी चुकून एखादी राजकीय घटना घडली तर ते ज्या भागात राहातात, त्या भागातील माध्यमांमधून त्यांच्या प्रतिक्रिया, आठवणी विचारल्या जातात, एवढाच काय तो त्यांनाही विरंगुळा असतो. मात्र या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन गेली 50 वर्षे, महाराष्ट्रातील राजकारण ज्या एकाच नावाभोवती फिरत राहिले ते नाव आहे शरदचंद्र पवार यांचे. जसे क्रिकेटमध्ये एखादाच सचिन तेंडुलकर किंवा गायनात एखादीच लता मंगेशकर असते तसे राजकारणात शरद पवार नावाचे एखादेच अनोखे रसायन तयार होते. त्याची पुन्हा निर्मिती होत नाही, किंवा त्याचा निश्चित असा फॉर्म्यूलाही नसतो. बुद्धिमत्ता, आक्रमकता आणि जनमानसाचा पाठिंबा या जोरावर राजकारणात अशक्य ते शक्य करून दाखवणारे नाव म्हणजे शरद पवार.  

1970 पासून मी त्यांचे राजकारण जवळून पहात आलो. त्यांच्या सोबत अनेकदा भेटण्याचा, खासगी मैफलीत गप्पा मारण्याचे अनेक प्रसंग मला अनुभवता आले. ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत ते दिल्लीपर्यंत गेले. त्यामुळे कोणत्या विषयाची ग्रामीण व शहरी भागात काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. पहिले पाच वर्षे ते फक्त आमदार होते व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सचिव होते. सरकारची ध्येय धोरणे त्यावेळी आधी पक्षात ठरायची. त्यावर विचारमंथन होत असे. तेथे काय बोलणे झाले हे बाहेर प्रेसला सांगण्याची जबाबदारी त्यांची असायची. त्यामुळे त्यांची आणि माध्यमांची मैत्री घट्ट होत गेली. त्यातूनच अनेक घटना, प्रसंगात मला त्यांना जवळून पहाता आले, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा अभ्यास करता आला. अनेक घटनांमध्ये आम्ही सोबत होतो. आज ते आठवताना अनेक प्रसंग मला अगदी काल घडल्यासारखे वाटतात.

1978 साली मुख्यमंत्री होण्याच्या आधीचा एक किस्सा आहे. शरद पवार भीमाशंकरच्या दौर्‍यावर होते. तिथले लोकल आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील (माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वडील) हे त्यांच्या सोबत होते. रात्री प्रचंड पाऊस पडल्यामुळे त्यांनी भीमाशंकरच्या मंदिरातच मुक्काम केला. मंदिरात शरद पवार एका बाजूला सतरंजी टाकून झोपले. मध्यरात्री एक भला मोठा नाग पवारांच्या छातीवरून गेला. बाजूलाच अर्धवट झोपेत असलेल्या दत्तात्रय वळसे पाटील यांनी ते पाहिले. ते काही काळ श्वास रोखून थांबले. नाग निघून गेल्यावर त्यांनी पवारांना उठवले आणि काय घडले ते सांगितले. लवकरच तुमच्या बाबतीत काही तरी चांगले घडेल, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

पुढे आठच दिवसात शरद पवार महाराष्ट्रात पुलोदचे मुख्यमंत्री झाले. पुलोदला त्यावेळी आरएसएसनेही पाठिंबा दिला होता हे विशेष. त्यावेळी त्यांनी पुलोदची बांधलेली मोट आजपर्यंत त्यांच्या राजकीय जीवनात कायम महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढला. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या चर्चा होऊ लागल्या. ते देश पातळीवरचे नेते बनले. पुढे दोन वर्षात पुलोदचे सरकार बरखास्त झाले. शरद पवार विरोधी पक्षनेते झाले. बॅ. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने पवारांची भाषणे ऐकली जात होती. पूर्ण राज्याचे सर्वांगीण चित्र आपल्या भाषणातून ते विधानसभेत मांडायचे. त्याच काळात त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. 100 महाविद्यालयांच्या गॅदरिंगचे उद्घाटन करण्याची निमंत्रणे आली होती. विशेष म्हणजे त्यांनी ती सगळी निमंत्रणे स्वीकारली आणि त्या त्या कॉलेजेसमध्ये जाऊन स्फूर्तिदायी भाषणेही केली. त्यामुळे ते तरुणांमध्ये लोकप्रिय झाले.

शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मुंबईतील उद्योगपतींची बैठक एअर इंडियाच्या सभागृहात बोलावली होती. तेथे जे.आर.डी. टाटा हजर होते. पवारांचे त्या बैठकीतील बोलणे, विषयांची समज, आवाका पाहून नंतर आम्हा पत्रकारांशी बोलताना जे.आर.डी. म्हणाले होते, ‘वन डे धिस बॉय विल बिकम अ प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया..’ पवार अजून पंतप्रधान झाले नाहीत; पण त्या दिशेने जाण्याचे त्यांचे प्रयत्नही अद्याप संपलेले नाहीत. 

केंद्रातील जनता पक्षाचे मोरारजी देसाई यांचे सरकार पडल्यानंतर त्यावेळचे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी विरोधी पक्षनेते यशवंतराव चव्हाण यांना सरकार बनवण्याची संधी दिली होती. पण बरेच दिवस चव्हाण यांना त्यात यश येत नव्हते. त्यावेळी नीलम संजीव रेड्डी म्हणाले होते की, ‘मी जर शरद पवार यांना बोलावले असते तर आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांना एकत्र करून सरकार बनवून कामालाही लावले असते..’ ही शरद पवार यांची त्यावेळीही ओळख होती.

शरद पवार आणि इंदिरा गांधी यांच्यात पक्षांतर्गत मतभेद होते. त्याची किंमतही त्यांना वेळोवेळी चुकवावी लागली. पण संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर सांत्वन करण्यासाठी गेलेल्या अनेक नेत्यांमध्ये शरद पवारही होते. त्यांना पाहून संजीव गांधी यांच्या पार्थिवाजवळ बसलेल्या इंदिरा गांधींनी त्यांना विचारले, तुम्ही दिल्लीतच होतात का? त्यावर पवार म्हणाले होते, ही बातमी कळाली आणि यासाठी मुद्दाम आलोय.. तेव्हा इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या होत्या.. ‘आय विल नेव्हर फरगेट धिस..’ नंतर पुढे इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळीही शरद पवार तेथे तात्काळ धावून गेले होते. तेथे राजीव गांधी होते. दिल्ली पेटली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा राजीव गांधी यांनी त्यांना दिल्लीतच थांबा, मला तुमची गरज आहे, असे सांगून त्यांना थांबवून घेतले होते.

1978 ते 1986 पर्यंत या कालावधीत देशभरात अनेक राजकीय आंदोलने झाली. त्या प्रत्येकात शरद पवार प्रामुख्याने आघाडीवर होते. त्यात त्यांचे अनेकांशी जोडले गेलेले संबंध अजूनही टिकून आहेत. त्या काळात एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, शरद जोशी असे अनेक त्यांच्या सहवासात आले. त्यातून त्यांचे पक्षातीत संबंध बळकट झाले.

विरोधी पक्षनेते असताना आम्हा पत्रकारांना घेऊन ते लोणावळा येथे वर्षा सहलीवर घेऊन गेले. सकाळच्या वेळी पावसात पायी फिरताना एसटीच्या ड्रायव्हरने गाडी थांबवून विचारले, ‘साहेब, पायी का जात आहात, गाडी बिघडली का?, एसटीत बसा.. त्यावर पवारांनी त्याला मी पावसात भिजायला आलोय; पण तू कोण? कुठला? अशी विचारणा केली तेव्हा तुम्हीच तर मला नोकरी दिली, असे सांगत त्याने पवारांना केलेला नमस्कार मला आठवतो. पुढे पायी पायी जाताना मुंबई-पुण्यातून आलेली तरुण मुलं-मुली पावसात भिजत फिरताना भेटली, तीदेखील पवारांना हाय, हॅलो करत होती. त्यांच्या लोकप्रियतेची चुणूक आम्हाला त्यावेळी दिसली. 

त्याच काळात मराठवाड्यातल्या दलित कवींना औरंगाबादच्या सुभेदारी विर्शामगृहावर रात्री गप्पा मारण्यासाठी शरद पवार यांनी बोलावले होते. त्यांचे छोटेखानी कविसंमेलनही तेथेच भरले गेले. कविता सादर करताना अनेकांनी आपले काव्यसंग्रह प्रकाशित होण्यासाठीच्या अडचणी सांगितल्या. तेव्हा मी लक्ष घालतो एवढेच ते बोलले. कविसंमेलन संपले. सगळे झोपायला गेले. सकाळी सगळ्या पत्रकारांसोबत ब्रेकफास्ट घेताना शरद पवारांची फोनाफोनी चालू होती. ते फोनवर अनेक प्रकाशकांशी बोलत होते. कोणाचे पुस्तक प्रकाशित करायला सांगत होते, तर कोणाला आर्थिक मदत देण्याविषयी सूचना देत होते.

आणखी एक किस्सा असाच. त्यांच्यातील हजरजबाबीपणा दाखवणारा. बाबासाहेब भोसले यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले. त्यांनी शरद पवार यांना फोन केला व मला तुमची मदत लागेल, असे सांगितले. मी दिल्लीला जाऊन मंत्र्यांची नावे फायनल करून घेऊन येतो, आल्यावर आपण भेटून बोलू असे भोसले म्हणाले. तेव्हा हजरजबाबी पवार लगेच बाबासाहेब भोसले यांना म्हणाले, आधी मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्या आणि नंतरच दिल्लीला जा. नाहीतर काँग्रेसमध्ये काहीही होऊ शकते. तुम्ही शपथ न घेता गेलात तर कदाचित दुसर्‍याच कोणाचे नाव येईल.. आणि तो सल्ला प्रमाण मानून बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनच दिल्लीला गेले.

शरद पवार यांचा त्या काळात काही औरच करिश्मा होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री असतानाची गोष्ट. एकदा निलंगेकरांनी पत्रकार परिषद ठेवल्याचा निरोप आला. सगळे पत्रकार त्यांच्याकडे जायला निघाले, तेवढ्यात शरद पवार यांनीही त्याचवेळी पत्रकार परिषद ठेवल्याचा निरोप आला. आम्ही सगळे पत्रकार त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या निलंगेकरांची पत्रकार परिषद सोडून शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला गेलो! असा त्यांचा करिश्मा होता, जो आज  एवढ्या वर्षांनीही कायम आहे.

त्यांच्या दिलदारीचे आणि सामाजिक भान असण्याचे तर अनेक किस्से सांगता येतील. एकच किस्सा. ‘सिंहासन’ सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी घडलेला. राजकीय पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट. त्यात एका सिनमध्ये मुख्यमंत्र्यांचे दालन दाखवायचे होते. सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांना त्यासाठी खर्‍याखुर्‍या मुख्यमंत्र्यांचे दालन शूटिंगसाठी हवे होते. मात्र मंत्रालयातील सचिवांनी त्यासाठी नकार दिला होता. ही गोष्ट शरद पवार यांना कळाली. ते स्वत: मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांची मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील केबिन शूटिंगसाठी उपलब्ध करून दिली. हे करण्यासाठी जाणीव आणि मनाचा मोठेपणा लागतो, जो शरद पवार यांच्याकडे ओतप्रोत भरलेला आहे.

बघायला गेल्यास शरद पवार ही फक्त सहा अक्षरं. मात्र या सहा अक्षरांनी देशाचे, राज्याचे राजकारण व्यापून टाकलेले आहे. केवळ राजकारणच नाही तर महाराष्ट्रातील समाजकारण, अर्थकारण, साहित्य, संस्कृती, खेळ यासह असे एकही क्षेत्र नाही की ज्याला त्यांचा स्पर्श झाला नाही. हे करत असताना जगभरातल्या राजकीय नेत्यांशी त्यांचे संबंध तेवढेच सलोख्याचे राहिले आहेत. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण केली आहे. दिवसाचे 18 तास काम करणे हा त्यांचा हातखंडा. काम न करता निवांत बसलेले शरद पवार कोणालाही, कधीही दिसले नाहीत. खूप वेळा अपमान, अवहेलना सहन केली तरीही पुन्हा नव्याने ते उभे राहिले, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने. जणू काही घडलेच नाही, या उमेदीने पुन्हा कामालाही लागले. एखाद्या राजासारखे. युद्धात हार-जीत येतेच, म्हणून राजा काही राज्य करायचे सोडून देत नाही, तसेच काहीसे.. म्हणूनच त्यांना सगळे ‘जाणता राजा’ म्हणत असावेत.

dinkar.raikar@lokmat.com
(लेखक लोकमतचे सल्लागार संपादक आहेत.)

Web Title: Sharad Pawar Birthday special article some memories of sharad pawar political career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.