विशेष लेख: बाईंडर पुन्हा एकदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:40 IST2025-11-16T08:39:35+5:302025-11-16T08:40:21+5:30
विजय तेंडुलकरांच्या काही नाटकांनी समाजाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कदाचित आजही मिळालेली नाहीत. ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक त्यापैकीच एक आहे.

विशेष लेख: बाईंडर पुन्हा एकदा
संजय घावरे
उपमुख्य उप-संपादक
विजय तेंडुलकरांच्या काही नाटकांनी समाजाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कदाचित आजही मिळालेली नाहीत. ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक त्यापैकीच एक आहे. सत्तरच्या दशकात प्रचंड विरोध झालेले हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे; पण, आता काळ बदलला आहे. एका पुरुषाच्या मनोवृत्तीवर भाष्य करणाऱ्या या नाटकात तेंडुलकरांनी मानवी इच्छा, नैतिकता, वासना, स्त्रीबद्दलचा पुरुषी दृष्टिकोन, नीती-अनीती आणि नैतिक-अनैतिकता यांचा वेध घेतला आहे. तेंडुलकरांनी त्या काळी काळाच्या पुढचे नाटक लिहिले होते; पण, आजच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या काळातील समाज या नाटकाच्याही पुढे गेला आहे.
दिग्दर्शक अभिजित झुंझारराव यांनी नव्या संचात रंगभूमीवर आणलेल्या या नाटकात सयाजी शिंदे शीर्षक भूमिकेत आहेत. सुमुख चित्रनिर्मित आणि अष्टविनायक प्रकाशित हे नाटक आजच्या पिढीचे लक्ष वेधत आहे. विक्षिप्त स्वभावाच्या भणंग सखारामची ही गोष्ट आहे. रितीरिवाजानुसार लग्न न करता पतीने सोडलेल्या किंवा पतीला त्रासलेल्या स्त्रियांना हेरून घरी आणायचे आणि त्यांच्याशी पत्नीसारखे राहायचे हा याचा स्वभाव आहे. दोघांपैकी एकाला कंटाळा आला की स्त्रीने सखारामच्या घरातून निघून जायचे. घरी आणलेल्या स्त्रीला सखाराम सर्व गोष्टी देतो; पण, त्या बदल्यात तिने त्याला शरीरसुख देण्याची अट असते. सहा स्त्रियांचा उपभोग घेतल्यानंतर सातव्या स्त्रीच्या रूपात सखाराम लक्ष्मीला घेऊन येतो. पारंपरिक विचारसरणीची लक्ष्मी घरातील सर्व कामे करण्यासोबतच सखारामरूपी वासनांध राक्षसालाही झेलते. नंतर सखारामच्या जाचाला कंटाळून ती पुतण्याकडे जाते. तिच्यानंतर सखाराम दारूड्या नवरा असलेल्या चंपाला घरी आणतो. ती लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध असते. तीच सखारामला कामाला लावते. त्यानंतर घडणारे नाट्य रंगमंचावर पाहायला मिळते.
हे नाटक त्या काळातील समाजमनाचे दर्शन घडविणारे आहे. यातील सखाराम जरी स्त्रियांवर अत्याचार करणारा असला तरी त्याची दुसरी बाजू म्हणजे तो टाकलेल्या स्त्रियांना आश्रय देतो. एखाद्याने आश्रय दिला म्हणजे त्याला त्या व्यक्तीसोबत काहीही करण्याचा अधिकार आहे या विचाराचे मुळीच समर्थन करता येणार नाही; पण, याकडे कलाकृती म्हणून पाहिल्यास सखारामच नव्हेतर, त्या स्त्रियांच्या व्यक्तिरेखांमधील विविध कंगोरे पाहायला मिळतात. लेखकाप्रमाणेच दिग्दर्शकानेही जे आहे ते थेट सादर केल्याने नाटक अंगावर येते. नाटकातील व्यक्तिरेखा परस्परविरोधी स्वभावाच्या आहेत.
निळू फुलेंनंतर सयाजी शिंदेंनी साकारलेला सखाराम या काळातील पिढीच्या मनात घर करणारा आहे. सखारामच्या स्वभावातील बारकावे सयाजी उत्तमरीत्या सादर करतात. नेहा जोशी नऊवारी साडीतील देवभोळ्या लक्ष्मीला न्याय देण्यात यशस्वी होते. अनुष्का विश्वास बिनधास्त, दारूबाज, आडदांड, फटकळ चंपाच्या भूमिकेत शोभून दिसते.