‘सुपरहिरो’ होण्याची वाढती क्रेझ...! २४ इंचाचे बायसेप्स...! हातही कापावे लागणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:28 PM2021-09-24T12:28:20+5:302021-09-24T12:28:56+5:30

याच मालिकेतली पुढची घटना आहे रशियातील. येथील एका माजी तरुण सैनिकानं झटपट ‘बॉडीबिल्डर’ होण्याच्या नादात काय काय केलं आणि ते आता त्याच्या जीवावर कसं बेततंय, याची कहाणी आणि फोटो सध्या जगभरात फिरताहेत.

Russian Bodybuilder Kirill Tereshin 24 inch biceps, Hands will have to be cut off too! | ‘सुपरहिरो’ होण्याची वाढती क्रेझ...! २४ इंचाचे बायसेप्स...! हातही कापावे लागणार! 

‘सुपरहिरो’ होण्याची वाढती क्रेझ...! २४ इंचाचे बायसेप्स...! हातही कापावे लागणार! 

Next

शर्ट काढून  फिरता यावं, आपल्या पिळदार शरीरयष्टीनं आपण सगळ्यांना मोहीत करावं, पडद्यावरच्या सुपरहिरोंसारखं आपण दिसावं ही तरुणांमधली क्रेझ किती घातक आहे, हे किरीलच्या उदाहरणानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. बॉडी बनविण्यासाठी अनेक तरुण जिममध्ये पाय ठेवण्याच्या आधीच ‘सप्लिमेण्टस’ आणि नंतर ड्रग्जचा आधार घेतात. हे प्रमाण जगभरातच प्रचंड मोठं आहे.

अतिरेकी व्यायामाचं किंवा फिटनेसचं भूत एकदा अंगात शिरलं की काय होतं, ते सगळ्यांनाच माहीत आहे. अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक घटना त्याची साक्ष आहेत. कमी वेळात जास्त बॉडी बनविण्याच्या नादात कोणी जिममध्येच जीव गमावला, कोणी ट्रेड मिलवरच प्राण सोडला, कोणी पळता पळताच स्वर्गात पोहोचला, तर कोणी स्वत:चा अक्षरश: ‘सापळा’ करून घेतला..

याच मालिकेतली पुढची घटना आहे रशियातील. येथील एका माजी तरुण सैनिकानं झटपट ‘बॉडीबिल्डर’ होण्याच्या नादात काय काय केलं आणि ते आता त्याच्या जीवावर कसं बेततंय, याची कहाणी आणि फोटो सध्या जगभरात फिरताहेत.

डेली मेलच्या वृत्तानुसार किरील तेरेशीन हा २५ वर्षीय बॉडीबिल्डर. लहानपणापासूनच बॉडीबिल्डर व्हायचं त्याचं स्वप्न होतं. विसाव्या वर्षापासून त्यानं अधिक प्रमाणात व्यायाम करायला सुरुवात केली. पण म्हणावा तसा फरक पडत नसल्यामुळे तो नाराज होता. त्याला काहीही करून आपली बॉडी अशी तयार करायची होती, की कोणीही पाहताक्षणी नाव काढावं, व्वा, बॉडीबिल्डर असावा तर किरीलसारखा..

त्यातही तरुणांना सर्वात जास्त आकर्षण असतं ते आपल्या बलदंड बायसेप्सचं. आपले दंड एकदम दणकट, मजबूत व्हावेत याचं प्रत्येकच व्यायामपटूला मोठं आकर्षण असतं. त्यामुळे अनेक जण कंबरेच्या खाली काडीमुडी असले तरी त्यांची अप्पर बॉडी आणि विशेषत: त्यांचे बायसेप्स मात्र एकदम भरीव, तगडे दिसतात. स्लिवलेस किंवा हाफ टी शर्ट घालून फिरताना लोकांच्या नजरा त्यांच्या बायसेप्सवर पडल्या आणि त्याबाबत ते कुजबुजायला लागले की यांना कसं धन्य धन्य होतं..

..पण किरील ‘बॉडीबिल्डर’ असला तरी बलदंड बायसेप्सचं त्याचं स्वप्न अजून तसं खूप दूर होतं. अशात त्याला पेट्रोलियम जेलीचा उपाय कोणी तरी सांगितला. झालं, किरीलनं लगेच तो उपाय करून पाहायला सुरुवात केली. आपल्या दंडांवर त्यानं पेट्रोलियम जेलीची इंजेक्शन्स घ्यायला सुरुवात केली. सुुरुवातीला त्याचा झटपट परिणामही दिसला. थोड्याच दिवसांत किरीलचे बायसेप्स चांगलेच बलदंड आणि मजबूत दिसायला लागले. किरीलचाही उत्साह वाढला. आपले बायसेप्स आणखी मोठे असावेत यासाठी त्यानं आपल्या दंडांवर पेट्रोलियम जेलच्या इंजेक्शन्सचा मारा सुरू ठेवला. त्यासाठी त्यानं किती इंजेक्शन्स घ्यावीत? त्यानं तब्बल सहा लीटर पेट्रोलियम जेली आपल्या दंडात टोचून घेतली.

अर्थातच त्याचा ‘अपेक्षित’ परिणाम दिसलाच. किरीलचे दंड काही दिवसांतच जवळपास फुटबॉलच्या आकाराचे झाले. बाकी हात-पाय, छाती ‘नॉर्मल’च असली तरी त्याचे बायसेप्स मात्र तब्बल २४ इंचाचे झाले!

पेट्रोलियम जेलीनं त्याचे बायसेप्स तर बलदंड केलेच, पण त्याचे साइड इफेक्टसही लगेचच दिसायला लागले. इतके की किरीलला आपले हात उचलणंही जड जाऊ लागलं. शरीरात असह्य आग होऊ लागली. त्याच्या बलदंड हातांची हालत अगदीच खराब झाली. त्याच्या हातात आणि शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. प्रकरण अगदीच हातघाईवर आल्यावर किरीलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या्त आलं.

तिथे त्याच्यावर  किचकट शस्त्रक्रिया करण्यात आली. पेट्रोलियम जेलीमुळे किरीलच्या शरीरात गेलेलं सिंथॉल ऑईल आणि मृत झालेल्या मांसपेशी काढून टाकल्या. पण तरीही फारसा फरक पडला नाही. डॉक्टरांनी सांगितलंय, त्याच्या शरीरात झालेल्या रक्ताच्या गुठळ्या जोपर्यंत पूर्णपणे काढल्या जात नाहीत, तोपर्यंत त्याच्या जीवाला धोका आहे. ही शस्त्रक्रियाही अतिशय किचकट, गुंतागुंतीची आणि वेळखाऊ आहे. ज्या बलदंड बाहूंचा किरीलला गर्व होता, ते त्याचे हात तर डॉक्टरांना कदाचित कापून टाकावे लागतील, तरीही तो जिवंत राहील की नाही, याची खात्री देता येत नाही!..

किरीलला आता स्वत:च्या कृतीवर पस्तावा होताेय. माझा हा मूर्खपणा आणि अति हव्यास मला नडला, मला आता बलदंड बॉडी नको आणि तगडे बायसेप्स नकोत, मी यातून जगलो-वाचलो, तरी देवाचे खूप खूप आभार आहेत!- असं तो म्हणतो.

डॉक्टरांनी सर्जरी करून त्याचे ‘नकली’ ट्रायसेप्स (दंडाच्या मागील बाजू) काढून टाकले असले, तरी त्याच्याबाबतची ‘हाय रिस्क’ अजूनही कायम आहे. सर्जन दिमित्री मेल्निकोव यांचं म्हणणं आहे, जे जे करायचं, ते ते सर्व आमचं करून झालं आहे. त्याच्या शरीरातील रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेनं काढून टाकणं हाच आता शेवटचा उपाय आहे. मात्र, तो अतिशय धोकादायक आहे. किरीलचा जीव वाचवण्याचे शक्य ते सारे प्रयत्न आम्ही करू, तरीही त्याच्या जगण्याची खात्री मात्र आम्ही देऊ शकत नाही.
या घटनेमुळे सगळेच हादरले असून किरीलच्या घरच्यांनी देवाचा धावा सुरू केला आहे, तर जिममध्ये त्याच्या सोबत व्यायाम करणाऱ्या त्याच्या मित्रांनी ‘सबुरी’चा धडा घेतला आहे.
 

Web Title: Russian Bodybuilder Kirill Tereshin 24 inch biceps, Hands will have to be cut off too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.