१८०० रुपये, काकूंचे भांडण आणि ओरबाडली गेलेली प्रायव्हसी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:22 AM2020-09-03T04:22:10+5:302020-09-03T11:03:36+5:30

साधी कौटुंबिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये झालेली टिंगल, शेरेबाजी, थट्टा अनेकांना सहन होत नाही. मित्रांनी केलेले चेष्टेतले ट्रोलिंगही अपमानास्पद वाटते, तिथे अचानक रातोरात आपण व्हायरल होत अनेकांच्या थट्टेचा विषय बनतो हे माणसे कसे सहन करत असतील?

Rs 1,800, Kaku's quarrel and lost privacy | १८०० रुपये, काकूंचे भांडण आणि ओरबाडली गेलेली प्रायव्हसी

१८०० रुपये, काकूंचे भांडण आणि ओरबाडली गेलेली प्रायव्हसी

Next

- मेघना ढोके
(मुख्य उपसंपादक, लोकमत)

‘काकू भांडा तुम्ही, भांडलंच पाहिजे !’ - असं म्हणत एक व्हिडिओ एव्हाना बहुतेकांनी पाहिलाच असेल. १८०० रुपये, तरुण मुलं आणि मदतनीस काकूंचा वाद यावरून समाजमाध्यमात तुफान दंगल झाली. व्हिडिओ तर व्हायरल झालाच, दुसरीकडे त्यावरून बोचऱ्या मिम्सचा पाऊस पडला, तिसरीकडे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ अशी उभी फाळणी करत समाजमाध्यमांत चर्चा करणाऱ्यांनी मनसोक्त बडबड करून घेतली. समाजमध्यमींना विषय मिळाला रे मिळाला की वाद लढवण्याची, आपली ‘संवेदनशीलता’ लगोलग दाखवण्याची मोठी घाईच होऊन जाते. या लोकांनी काकूंच्या निमित्ताने अनेक जीबी डेटा जाळला. राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त करत आर्थिक साक्षरता उप्रकम राबवण्याचंही जाहीर केलं.
म्हटलं तर गोष्ट साधी होती. तरुण मुले एकत्र राहत असलेल्या एका घरात घरकामाचे एकूण १८०० रुपये मदतनीस बाईना देण्याचे ठरले. मात्र ५०० गुणिले तीन = पंधराशे + दोनशे + शंभर मिळून एकूण १८०० रुपये होतात हे काही काकूंच्या लक्षात येईना, त्यांनी मुलांशी वाद घातला. ही घमासान त्या मुलांपैकीच कुणीतरी शूट केली. झाले काकूंचे भांडण व्हायरल ! मग चर्चा, विनोद, टाइमपासला ऊत आला आणि अनेकांचा दिवस बरा गेला !... पण कुणाच्या हे मनात तरी आले का की हातावरचे पोट असलेल्या त्या काकूंना अगदी अचानक अशी विचित्र प्रसिद्धी मिळाल्याने त्यांचे काय झाले असेल? की खासागीपणा, ‘प्रायव्हसी’ हे मूल्य फक्त शिकल्या-सवरलेल्यांचाच विशेषाधिकार मानायचा?

माणसांच्या जगण्यातले खासगीपण या नव्या माध्यमांनी ओरबाडून घेतले आहे, आणि त्यासाठी तुम्ही दीपिका पडुकोन किंवा अगदी गेला बाजार रिया चक्रवर्तीही असण्याची गरज नाही! तुम्ही ‘त्या’ अनाम काकूंसारखे कुणी असाल, तर तुमच्या खासगी खिडकीत डोकावण्याची मजा उलट जास्त येणार आणि तुम्ही कितीतरी अधिक व्हायरल होणार ! अगदी अलीकडे एका लहानग्या नग्न मुलाचा घरात नृत्य करण्याचा व्हिडिओ असाच लाखो लोकांनी पाहिला असेल. गोंडस लहानग्यांच्या बाललीला, त्यांचे हसवणारे, रडवणारे, चिडवणारे व्हिडिओ तर सततच व्हायरल होत असतात. वर्गात ज्वालामुखीचा उद्रेक अत्यंत जोषात शिकवणाºया एका शिक्षकाचा व्हिडिओही असाच गाजला आणि तोही आता व्हायरल होतो आहे. सहज गंमत म्हणून शेअर केले गेलेले असे व्हिडिओ एकदा का समाजमाध्यमात सोडले की बाण सुटल्यासारखे पुढे त्यांचे काय होणार हे कुणाच्याच हाती उरत नाही. काही दिवसांपूर्वी पुण्यातच एका महिलेने आपल्याकडे येणाºया मदतनीस मावशींचे व्हिजिटिंग कार्ड छापून दिले आणि ते कौतुकाने कुणाशी शेअर केले, तर ते इतके व्हायरल झाले की बास! त्या बार्इंना तुफान फोन आले. मनस्ताप झाला. अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीने आनंद होण्यापेक्षा ओशाळलेपणच अधिक दिले असे त्या म्हणाल्या. क्षणभर विचार करून पहा, या मदतनीस काकूंचे आणि कदाचित त्या मुलांचेही जगण्याचे वर्तुळ चारचौघांसारखे सामान्य, लहानसे असेल. त्यांच्यातला संवाद - मग तो गंमतीचा असला तरी - हा असा अचानक व्हायरला झाल्यानंतर त्या काकूंना काय काय सोसावे लागले असेल? किती मन:स्ताप झाला असेल?

साधी कौटुंबिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये झालेली टिंगल, शेरेबाजी, थट्टा अनेकांना सहन होत नाही. मित्रांनी केलेले चेष्टेतले ट्रोलिंगही अपमानास्पद वाटते, तिथे अचानक रातोरात आपण व्हायरल होत अनेकांच्या थट्टेचा विषय बनतो हे माणसे कसे सहन करत असतील? अर्थात, समाजमाध्यमात काहीच पर्मनण्ट नसते. या जगात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा कुणी रातोरात काही लाख डिसलाइक्सचाही धनी होतो. कालचे व्हायरल हा आजचा कचरा असतो. - मात्र ज्यांना अशी प्रसिद्धी, व्हायरल पूश नको असेल, त्यांचे काय? जे लोकप्रिय होण्यासाठीच असे अतरंगी व्हिडीओ बनवतात त्यांचे एकवेळ ठीक ! ते स्वयंनिर्णयाने ही माध्यमे निवडतात. मात्र कुणाच्या नकळत त्यांच्या जगण्यातले खासगीपण असे चव्हाट्यावर मांडणे रास्त आहे का? माणसांच्या जगण्यातले खासगीपणच खाऊन टाकायला निघालेली समाजमाध्यमे हा खादाड राक्षस आहे. त्याला रोज नवीन काहीतरी हवे असते. माणसांचे खासगीपण हे त्याचे प्रिय भक्ष्य ! आज विनोद म्हणून लोक काकूंवर हसले, उद्या त्यांच्याजागी आपल्यापैकीच कुणी नसेल याची काय खात्री आहे? समाजमाध्यमातला व्हायरल खेळ क्रूर आहे, कधी कुणावर उलटेल, कुणास ठाऊक!

Web Title: Rs 1,800, Kaku's quarrel and lost privacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.