लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज

By अतुल कुलकर्णी | Updated: July 20, 2025 08:21 IST2025-07-20T08:20:29+5:302025-07-20T08:21:10+5:30

तो काळ रोजगार हमी योजनेचा होता. आताचा काळ आमदार हमी योजनेचा आहे. ज्याच्याकडे जेवढ्या आमदारांची हमी तेवढा त्याचा बोलबाला अधिक. बरोबर आहे ना...

Remember, I say work and money without work; People are upset over the ruckus in the legislature | लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज

लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज

अतुल कुलकर्णी 
संपादक, मुंबई


श्री. राहुल नार्वेकरजी
श्री. राम शिंदेजी,
नमस्कार. 
रोजगार हमी योजना जेव्हा राज्यात लागू झाली तेव्हा, ‘‘मागेल त्याला काम आणि कामाप्रमाणे दाम’’ असे घोषवाक्य त्या योजनेसाठी ठेवले गेले. लोकांना सन्मानाने काम मिळावे, त्याहीपेक्षा सन्मानाने कामाचा मोबदला मिळावा, अशी त्यामागे भावना होती. आता जमाना बदलला आहे. ‘‘मी सांगतो तेच काम आणि मी कामाशिवाय दाम’’ अशी योजना सुरू आहे. हा आजचा मूलमंत्र आहे. तो काळ रोजगार हमी योजनेचा होता. आताचा काळ आमदार हमी योजनेचा आहे. ज्याच्याकडे जेवढ्या आमदारांची हमी तेवढा त्याचा बोलबाला अधिक. बरोबर आहे ना...


हल्ली विधिमंडळात येणाऱ्या नव्या सदस्यांना जुने संदर्भ माहीत नसतील म्हणून रोजगार हमी योजना आली कशी ते सांगतो. १९७२ च्या दुष्काळानंतर या योजनेसाठी १०० कोटी हवे होते. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. राज्याची तिजोरी रिकामी होती. रोजगार हमी योजना चालवण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता. वि. स. पागे सभापती होते. कृष्णराव धुळप, उद्धवराव पाटील असे बडे नेते विरोधी पक्षात होते. रोजगार हमी योजना राबवली तर लोकांना चार पैसे मिळाले असते म्हणून चिंतेत असणाऱ्या सरकारला उद्धवराव पाटील यांनी करवाढीचा प्रस्ताव आणतो, असे सांगितले. सभापती पागे यांनी त्याला मान्यता दिली. विरोधी पक्षाकडून करवाढीचा प्रस्ताव मांडण्याची भूमिका हे देशाच्या संसदीय इतिहासातले एकमेव उदाहरण आहे. असे प्रस्ताव सरकारने आणायचे असतात, त्यामुळे पुढे वसंतराव नाईक यांनी तो प्रस्ताव घेतला आणि सरकारचा प्रस्ताव म्हणून मांडला. राज्यावर संकट आले म्हणून आपापसातील मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले. ‘‘मागेल त्याला काम आणि कामाप्रमाणे दाम’’ अशी भूमिका त्यावेळी सगळ्यांनी घेतली. अशी ती योजना होती. 


ही योजना कळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, वि. स. पागे यांना बोलावून घेतले. ‘‘नाऊ आय एम नॉट अ प्राइम मिनिस्टर... आय एम जस्ट युअर स्टुडंट... आय एम सीटिंग इन फ्रंट ऑफ यू विथ पेन्सिल अँड नोटबुक... प्लीज टेल मी युअर स्किम्स... आय वॉन्ट टू अन्डरस्टॅण्ड द स्किम अँड हाउ टू इम्प्लिमेंट इट इन अवर नेशन...’’ असे त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाल्या. पागे यांनी ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या त्यातून पुढे इंदिरा गांधी यांनी देशभर वीस कलमी कार्यक्रमाची आखणी केली. 


हा झाला इतिहास. असेच आता घडेल, असा विचार चुकूनही डोक्यात आणू नका. कारण आता आमदार हमी योजनेअंतर्गत ‘‘मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम’’ ही योजना सुरू आहे. विधिमंडळात जो काही राडा झाला, त्यावर, ‘‘राज्यातील जनता आज आपल्याला (आमदारांना) शिव्या देत आहे. कोण्या एका व्यक्तीची नाही तर येथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आपल्या सगळ्यांच्या बद्दल बोलले जात आहे की हे सगळे आमदार माजले म्हणून...’’ या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी बोलून दाखवली. अध्यक्ष आणि सभापतीजी, देवेंद्रजींना समजावून सांगा. असा त्रागा करणे योग्य नाही. आमदार माजले आहेत, असे लोक म्हणत नाहीत. उलट आम्ही कसे आक्रमकपणे बोलतो, याचे  नेत्यांना कौतुक आहे. आता बघा, मतदारसंघात गुंडगिरी करणाऱ्यांचे सत्कार होतील. एकमेकांच्या मतदारसंघात विरोधी नेत्यांचे पुतळे जाळणे सुरू झालेच आहे. त्यामुळे सध्या जे काही चालू आहे ते नवनव्या प्रथा परंपरा निर्माण करणारे, विधिमंडळाची उंची आकाश दोन बोटे ठेवणारे कार्य या विधिमंडळाच्या कारकिर्दीत होत आहे, त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन केले पाहिजे. जुन्या काळी काय झाले, त्याची आठवण आता ठेवायची गरज नाही. जुन्या काळी विधिमंडळात येणारे नेते वेडे होते. इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल, तेव्हा आजच्या काळात विधिमंडळात फ्री स्टाईल हाणामारी करणाऱ्या नेत्यांचीच नावे लक्षात ठेवली जातील. (तसाही इतिहास बदलण्याचा आम्हाला छंद आहेच.) तेव्हा बाळासाहेब भारदे, वि. स. पागे, यशवंतराव चव्हाण यासारखे नेते आणि त्यांच्या वागण्याचे संदर्भ पार मोडून, तोडून टाकले पाहिजेत. 


काही वर्षांपूर्वी दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष असताना एका अधिकाऱ्याला विधानभवनात धक्काबुक्की झाली म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आणि विधानभवनाची जाहीर माफी मागितली होती. म्हणून तर वळसे पाटील आज कुठेही नाहीत. त्यांनी जर माफी मागितली नसती तर आज कदाचित ते मंत्री म्हणून दिसले असते... युतीचे सरकार गेल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी विधान भवनात गणपतराव देशमुख यांना थोडी धक्काबुक्की झाली. नाराज झालेले गणपतराव लायब्ररीत जाऊन बसले. तेव्हा विलासराव आणि आबा दोघेही लायब्ररीत त्यांच्याकडे गेले. त्यांची माफी मागून त्यांना ते सभागृहात घेऊन आले. आता विलासराव आणि आबा नाहीत. तेव्हा कोणी कुठे रुसून बसले तर त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही, हे तुम्ही ठणकावून सांगितले पाहिजे. तुम्ही हे कराल याची खात्री आहे. तुम्हाला शुभेच्छा. 
- तुमचाच, बाबूराव

Web Title: Remember, I say work and money without work; People are upset over the ruckus in the legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.