राज्यसभेचा 'महाराष्ट्र पॅटर्न': पवारांची अपरिहार्यता, तावडेंचा संयम अन् पार्थ पवारांसमोर नवे आव्हान

By यदू जोशी | Updated: March 6, 2026 06:36 IST2026-03-06T06:35:29+5:302026-03-06T06:36:05+5:30

सौजन्यमूर्ती मायाताई, संयमाचे बक्षीस मिळालेले तावडे, ओझे पेलायला सज्ज पार्थ, फायरब्रँड ज्योतीताई आणि सर्वांत ज्येष्ठ शरद पवार.. ही पाचांची कहाणी!

Rajya Sabha's 'Maharashtra Pattern': Sharad Pawar's inevitability, Tawde's restraint and a new challenge for Parth Pawar | राज्यसभेचा 'महाराष्ट्र पॅटर्न': पवारांची अपरिहार्यता, तावडेंचा संयम अन् पार्थ पवारांसमोर नवे आव्हान

राज्यसभेचा 'महाराष्ट्र पॅटर्न': पवारांची अपरिहार्यता, तावडेंचा संयम अन् पार्थ पवारांसमोर नवे आव्हान

- यदु जोशी,

राजकीय संपादक, लोकमत

शरद पवार वयाच्या ८५ व्या वर्षी राज्यसभेवर का गेले असावेत? साठ वर्षांच्या दीर्घ संसदीय कारकिर्दीनंतरही ते आणखी सहा वर्षे खासदार का राहू इच्छित असतील? आजारपणाने चौफेर घेरले असताना एवढी महत्त्वाकांक्षा का म्हणून, असे प्रश्न विचारले जात आहेत. पवार यांनी स्वत:च्या दृष्टीने आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उरलेल्या पक्षाच्या दृष्टीने आवश्यक असाच निर्णय घेतला. पक्षातील फूट आणि आता अजितदादांचे जाणे या धक्क्यांतून आपल्या पक्षसहकाऱ्यांचे काहीएक राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवायचे तर पवारसाहेबांचे खासदार होणे आवश्यक आहे असे त्यांच्या पक्षातील शिलेदारांना वाटत होते. शरद पवार एकेकाळी काँग्रेसमध्ये होते, नंतर स्वत:चा पक्ष काढला तरी अनेकदा त्यांनी काँग्रेसला पूरक अशीच भूमिका घेतली. अगदी स्वत:चे दोन आमदार जास्त निवडून आलेले असतानाही त्यांनी काँग्रेसला एकेकाळी मुख्यमंत्रिपद दिले होते. काँग्रेसबाबत पवारांच्या उपकारांची पुंजी यावेळी त्यांच्यासाठी  पाठिंबा घेऊन आली. उद्धवसेनेत आदित्य ठाकरेंचा पवारांना विरोध होता, तो आपल्या पक्षातील कोणाला संधी मिळावी म्हणून; पण संजय राऊत त्यांच्यावर भारी ठरले.

भाजपने दाखविली ‘माया’ 
अनेक दिग्गज राज्यसभेसाठी इच्छुकांच्या रांगेत असताना भाजपने नागपूरच्या माजी महापौर, नगरसेविका माया इवनाते यांना संधी दिली. लाकडे गोळा करून विकणाऱ्या आदिवासी आईची ही मुलगी. त्यांचे पती चिंतामण पैलवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर कार्यकर्ते होते. ते आज हयात नाहीत; पण देवाभाऊंनी मायाताईंना राज्यसभेत बसवून मैत्री जपली. ‘आपल्या’ माणसांची आठवण ठेवून त्यांना पुढे नेण्याचा फडणवीसांचा गुण आहे. मायाताई अतिनम्र अन् शालीन. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बेधडक जाणारे, सरळ त्यांच्या केबिनमध्ये घुसणारे नागपुरात अनेकजण आहेत. मायाताई मात्र आजही पीएला चारवेळा विनंती करूनच फडणवीसांना भेटतात. सौजन्य आणि पक्षनिष्ठेच्या माया इवनाते पॅटर्नचे प्रशिक्षण केवळ नागपुरातीलच नाही, तर राज्यातील नवथर भाजप नेते/नेत्या अन् कार्यकर्त्यांना देण्याची गरज आहे.

तावडेंना संयमाचे बक्षीस
विनोद तावडेंची आमदारकी अन् त्यातून मिळू शकणारे मंत्रिपद कापले गेले, पण नंतर पक्षाचे सरचिटणीस म्हणून राज्याराज्यांमधील मंत्री, मुख्यमंत्री ठरविणाऱ्यांच्या वर्तुळात ते जाऊन बसले. नजीकच्या काळात केंद्रात मंत्रीही होतील. दिल्लीच्या राजकारणात मितभाषी असावे लागते. अर्ध्या गोष्टी मान हलवून आणि हसूनच टाळायच्या असतात. तावडेंना ते बरोबर साधते. दिल्लीत अनेक संवेदनशील विषय, रहस्ये पोटातच ठेवावी लागतात. पंतप्रधान कार्यालयात एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, त्याला पहिल्याच दिवशी सांगण्यात आले की इथे जे काही होईल ते बाहेर कुठेही जाता कामा नये, ते तुमच्याबरोबर चितेवरच गेले पाहिजे. जमाना हा असा आहे. जसे सरकारमध्ये तसेच भाजपमध्येही आहे. अशा वातावरणात स्वत:ला सिद्ध करण्याचे कसब तावडे यांनी साधले.

पार्थ यांची नवी इनिंग
पार्थ अजित पवार राज्यसभेची नवी इनिंग सुरू करत आहेत. दिल्लीत खासदार म्हणून छाप पाडायची आणि त्याचवेळी महाराष्ट्रात आई सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे, असे दुहेरी आव्हान सोपे नाही. पार्थ अपयशी व्हावेत अशी अपेक्षा बाळगणारे आत आणि बाहेरही आहेत. पार्थ यांनी मेहनत सुरू केल्याचे कळते. वडिलांचे काही गुण आपल्यात आणण्याची धडपड ते करत आहेत. आपल्या पक्षातील नेत्यांची मने आणि मते जाणून घेत आहेत. त्यांना योग्य ती संधी दिली पाहिजे. सुप्रिया सुळे यांना नाही का माध्यमांनी आतापर्यंत संधी दिली? दिल्लीच्या क्लबकल्चरमध्ये देशातील अनेक बड्या नेत्यांची मुले रमलेली असतात. पार्थ यांनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवण्याचे ठरविले आहे. वारशापेक्षा अपेक्षांचे ओझे अधिक जड असते; पार्थ ते घेऊन निघाले आहेत.

फायरब्रँड ज्योतीताई
एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारे यांना थेट राज्यसभेवर पाठवले. पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या ज्योतीताई मुलुखमैदानी तोफ. सुरुवातीच्या काळात सोलापुरात पत्रकार होत्या. काही काळ प्राध्यापिका होत्या. आंबेडकरी विचार मानणाऱ्या वडिलांच्या कन्या आहेत. त्यांचे वडील बांधकाम मजूर होते, हॉटेलमध्ये वेटर होते. पँथरच्या चळवळीतील कार्यकर्ता म्हणून लोकांनी त्यांना नगरसेवक केले. ज्योतीताई पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. पक्ष बदलला असेल; पण ज्योतीताईंकडे एक विचार आहे. संघर्ष करत पुढे आल्या आहेत. आता त्यांना मोठी संधी मिळाली आहे. ‘आपल्यातली एक जण खासदार झाली’ असे अनेकांना वाटते आहे, ते उगीच नव्हे!
yadu.joshi@lokmat.com

Web Title : महाराष्ट्र राज्यसभा: पवार की अनिवार्यता, तावड़े का धैर्य, पार्थ पवार की चुनौती।

Web Summary : शरद पवार का राज्यसभा प्रवेश पार्टी के हितों की रक्षा करता है। बीजेपी ने वफादार माया इवनाते को पुरस्कृत किया। तावड़े के धैर्य का फल उन्हें पार्टी में एक महत्वपूर्ण भूमिका के साथ मिला। पार्थ पवार दिल्ली और महाराष्ट्र में दोहरी चुनौतियों का सामना कर रहे हैं। एकनाथ शिंदे ने फायरब्रांड ज्योति वाघमारे को आगे बढ़ाया।

Web Title : Maharashtra Rajya Sabha: Pawar's necessity, Tawde's patience, Parth Pawar's challenge.

Web Summary : Sharad Pawar's Rajya Sabha entry safeguards party interests. BJP rewarded loyalist Maya Ivnate. Tawde's patience paid off with a key party role. Parth Pawar faces dual challenges in Delhi and Maharashtra. Eknath Shinde elevated firebrand Jyoti Waghmare.