पंजाब ऑपरेशन : ...म्हणून काँग्रेसनं पंजाबमध्ये केलेली शस्त्रक्रिया गरजेचीच होती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:41 PM2021-09-20T12:41:31+5:302021-09-20T12:41:55+5:30

पंजाबचे सरकार नोकरशाहीकडूनच चालविले जाते अशा तक्रारीही वारंवार आमदारांकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्या होत्या. अमरिंदरसिंग असो किंवा अन्य एखादा काँग्रेस नेता असो, हे नेते जेव्हा मुख्यमंत्रीपदी बसतात तेव्हा त्यांना जनतेमध्ये नेमके काय चालले आहे, लोक काय बोलतात हे कळत नाही.

Punjab Operation: the surgery performed by the Congress in Punjab was necessary | पंजाब ऑपरेशन : ...म्हणून काँग्रेसनं पंजाबमध्ये केलेली शस्त्रक्रिया गरजेचीच होती 

पंजाब ऑपरेशन : ...म्हणून काँग्रेसनं पंजाबमध्ये केलेली शस्त्रक्रिया गरजेचीच होती 

Next

भारतीय जनता पक्षाने आपले मुख्यमंत्री विविध राज्यांमध्ये बदलले. मात्र  ज्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यांनी बंडखोरीची भाषा केली नाही. पंजाबमध्ये आता काँग्रेसला कॅप्टन बदलावा लागला. अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा लागला, पण सिंग यांनी मुकाट्याने पद सोडले नाही. त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अजून ते थेट काँग्रेसविरुद्ध काही बोललेले नाहीत. पण आपण फार अवमानीत झालोय असे अमरिंदरसिंग यांनी नमूद केले आहे. शिवाय आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत, योग्यवेळी योग्य पर्याय वापरायचा असतो, पण तूर्त आपण काँग्रेससोबत आहोत, अशा अर्थाचीही विधाने सिंग यांनी केली. देशात अगोदरच गलितगात्र झालेल्या काँग्रेससाठी एवढा इशारा पुरेसा आहे. देशातील काँग्रेसविरोधी शक्तींचे बळ वाढविणारा हा इशारा आहे. अमरिंदरसिंग योग्यवेळ साधून काँग्रेसला पंजाबमध्ये अडचणीत आणू शकतात. यापुढे गोव्यासोबतच पंजाब विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. अशावेळी मुख्यमंत्री बदलणे हे काँग्रेसचे पंजाबमधील मोठे ॲापरेशन आहे. काँग्रेसला ही शस्त्रक्रिया करताना देखील भाजपसारखी शांतता पाळता आली नाही किंवा भाजपसारखे कौशल्य दाखविता आले नाही. अर्थात भाजपकडे केंद्रात सत्ता असल्याने त्या पक्षाचे कोणतेच मावळते मुख्यमंत्री भाजपला आव्हान देण्याची भाषा करू शकत नाहीत.

काँग्रेस हा अजूनही देशातील प्रमुख विरोधी पक्ष असला तरी, तो पक्ष असाहाय्य स्थितीत आहे. त्यामुळेच अमरिंदरसिंग हे काँग्रेसला योग्यवेळी योग्य तो धक्का देऊ शकतात. आपल्या अवमानाचा बदला ते घेतील असेच संकेत मिळतात. अमरिंदरसिंग यांना पद सोडावे लागेल याचे संकेत गेले काही महिने मिळतच होते. कारण तेथील काँग्रेसमध्ये प्रचंड वाद सुरू होता. प्रदेश काँग्रेस समिती त्यांच्यासोबत नव्हती, शिवाय आमदारांमध्येही गट निर्माण झाले होते. काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी शेवटी आमदारांचे व प्रदेश काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आदींचे मत मान्य करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. अमली पदार्थ व्यवहारांपासून पंजाबला मुक्ती देण्याचे आश्वासन देत काँग्रेस पक्ष तिथे सत्तेवर आला होता. २०१७ साली विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतानाच तेथील काँग्रेसने पंजाबमधील ड्रग्सच्या व्यवहारांना पूर्णपणे मूठमाती दिली जाईल असे जाहीर केले होते. स्वत: अमरिंदरसिंग यांनी तशी शपथही घेतली होती. मात्र गेल्या चार वर्षांत पंजाबमध्ये ड्रग्सचा राक्षस ते पूर्णपणे नियंत्रणात आणू शकले नाहीत. अमली पदार्थ व्यवहारांमधील अनेक गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करून खटले भरले गेले. पण बडी धेंडे मोकळीच राहिली अशा प्रकारची जनभावना पंजाबमध्ये निर्माण झाली. जनतेमधील हा समज अमरिंदरसिंग दूर करू शकले नाहीत. अमरिंदरसिंग हे हुशार आहेत. ते थेट बोलणारेही आहेत. काँग्रेसची संस्कृती त्यांच्या अंगात भिनलेली आहे. पण त्यांची कार्यपद्धत अनेक आमदारांना मान्य नव्हती. अमरिंदसिंग यांना भेटणे म्हणजे मोठे अग्निदिव्य आहे अशी तक्रार अनेक आमदार करत असत. अमरिंदरसिंग चंदिगढमध्ये सचिवालयात देखील जात नसत. त्यांच्याभोवती त्यांचाच एक कंपू असायचा व त्यामुळे ते आमदारांपासून व जनतेपासून तुटले असल्याची भावना निर्माण झाली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घेण्यापूर्वी ह्या जनभावनेचाही विचार केला असेल.

पंजाबचे सरकार नोकरशाहीकडूनच चालविले जाते अशा तक्रारीही वारंवार आमदारांकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्या होत्या. अमरिंदरसिंग असो किंवा अन्य एखादा काँग्रेस नेता असो, हे नेते जेव्हा मुख्यमंत्रीपदी बसतात तेव्हा त्यांना जनतेमध्ये नेमके काय चालले आहे, लोक काय बोलतात हे कळत नाही. गोव्यासारख्या छोट्या राज्यातही यापूर्वी असे घडलेले आहे. काँग्रेसचे प्रतापसिंग राणे, विल्फ्रेड डिसोझा किंवा भाजपचे लक्ष्मीकांत पार्सेकर हे जेव्हा मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा त्यांना जनभावना कळत नव्हती. त्यामुळेच या नेत्यांच्या काळात कधी काँग्रेस तर कधी भाजपचा निवडणुकांमध्ये पराभव झाला. काँग्रेसने पंजाबमध्ये जी शस्त्रक्रिया केली आहे, त्याचे फळ काय मिळेल हे तूर्त सांगता येत नाही पण ही शस्त्रक्रिया गरजेची होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अमरिंदरसिंग यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. काँग्रेसची हानी होईल अशा प्रकारचे पाऊल अमरिंदरसिंग यांनी उचलू नये, त्यांनी पक्षहित हेच कायम नजरेसमोर ठेवावे असा उपदेश गेहलोत यांनी केला आहे. अशा प्रकारचे उपदेश करणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत, पण जेव्हा स्वत: त्याग करण्याची वेळ येते तेव्हा असे अनेक नेते वेगळा विचार करत असतात हे देखील तेवढेच खरे.

Web Title: Punjab Operation: the surgery performed by the Congress in Punjab was necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.