शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

शारीरिक हल्ला अन् मानसिक आघात !

By सचिन जवळकोटे | Published: April 25, 2020 7:53 AM

दृष्टिकोन..

- सचिन जवळकोटे

सध्या ‘रामराव’ची स्टोरी सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. आयुष्यभर घरात दरारा अन् मान असणारे रामराव जेव्हा तापाने फणफणतात, जोरात खोकू लागतात तेव्हा त्यांच्या पत्नीसह घरातील मुलेबाळेही किती विचित्र पद्धतीने फटकून वागतात, हे या कथेत अत्यंत परखडपणे मांडले गेले आहे. मोती नावाचा कुत्रा सोडला तर कोणीच त्यांच्यासोबत दवाखान्यात येत नाही. मात्र चौदा दिवसांनंतर  ‘निगेटिव्ह रिपोर्ट’ घेऊन रामराव दवाखान्यातून बाहेर पडतात तेव्हा ते शरीरानं ठणठणीत असले तरी मनाने पूर्णपणे खचलेले असतात. एक वेळ कोरोना झाला असता तरी सहन केला असता, परंतु आपल्याच माणसांनी संशयातून निर्माण केलेला हेटाळणीचा जो भयानक आजार पसरविला तो त्यांना सहन होत नाही. म्हणूनच घरची मंडळी आता मोठ्या गाडीत घेण्यासाठी येत असतानाही ते उलट पावली चालत अनोळखी वाट धरतात, कधीही घरी न परतण्यासाठी.

  सोशल मीडियावरची ही पोस्ट कदाचित       काल्पनिक असेलही. मात्र, सध्या गावोगावी असे कैक ‘रामराव’ संशयाच्या रोगाने बाधित झाले आहेत. नजरेतल्या द्वेषापासून ते वाळीत टाकण्याच्या भाषेपर्यंत अनेक कटू प्रसंगांना सामोरे  जाऊ लागले आहेत. ‘कोरोना’ची भीती गावागावात इतकी खोलवर रुजली आहे की, नेहमीप्रमाणे शेजारच्या घरातून येणारी भाजीची वाटीही आता विषाची वाटू लागली. पूर्वी विरजणासाठी दही मागणारी शेजारीणही आता उंबरा ओलांडून बाहेर पडेना झाली. माणसेच माणसाला परकी झाली. माणुसकीची भावनाच पोरकी झाली.

 ‘संसर्ग’ नको म्हणून केवळ ‘संपर्क’ कमी करा, एवढीच या रोगावर मात करण्याची अचूक मात्रा लागू झालेली. मात्र, एकमेकांमधला ‘संवाद’ तोडून टाकण्याची घातक प्रक्रिया सुरू झाली. ज्या तरुण पिढीने आपल्या गावचे नाव पुण्या-मुंबईत जाऊन मोठे केले, तीच आता पुन्हा गावात आली म्हटल्यावर उलट त्यांचा दुस्वास केला गेला. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर विनाकारण संशय व्यक्त झाला. ज्यांनी कधीकाळी गावातील पडीक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पैसे पाठविले त्यांनाच आता गावची वेस पूर्णपणे बंद झाली. रस्त्यावर काटे-कुटे अन् दगडं-लाकडं टाकून त्यांचा प्रवेश रोखला गेला. अनेकांना त्यांच्या घरच्यांवर दबाव आणून गावाबाहेर काढले गेले. केवळ ‘बाहेरून आलेला’ या भीतीपोटी गावातूनच बहिष्कृत करण्याचा अन् समाजातून वाळीत टाकण्याचा नवा पायंडा कैक ठिकाणी पाडला गेला.

केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी परिसरातही असाच विचित्र प्रकार दिसून आला. ज्या पेठेत          एखादा इसम ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळून आला त्या टापूतही आपापले छोटे-मोठे रस्ते स्थानिक लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केले. शेजारच्या गल्लीबोळातील रहिवाशांनाही जाण्या-येण्यासाठी प्रवेश रोखला गेला. हाती मिळेल त्या वस्तू म्हणजे टायर, भंगारातील मोडके-तोडके इलेक्ट्रॉनिक पाटर््स, बांबू अन् फाटक्या पोती यांचा यासाठी वापर केला गेला.

 ‘हातावर क्वारंटाइनचा शिक्का म्हणजे तो शंभर टक्के कोरोना रुग्णच’, असाही भ्रम गावागावात पसरला. संशयाचे पिशाच्य विनाकारण बागुलबुवा निर्माण करू लागले. या रोगाशी लढा देण्यासाठी खंबीरपणे साºयांनी एकत्र येणे गरजेचे, हे सांगून-सांगून प्रशासनही हतबल झाले. यामुळे खरा रुग्णही घाबरून दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ करू लागला. तपासणीसाठी दारापर्यंत आलेल्या सरकारी टीमसमोर तोंडही चुकवले जाऊ लागले. त्यामुळेच की काय अनेक ठिकाणी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरच तो बाधित रुग्ण होता, हे उघडकीस येऊ लागले.

कदाचित या रुग्णांनी ‘समाजाला काय वाटेल ?’ ही भीती डोक्यात न ठेवता थेट दवाखान्यात धाव घेतली असती तर कदाचित हा आजार मृत्यूपर्यंतही गेला नसता. त्यांच्या संपर्कात आलेले इतरही आता आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल झाले नसते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, एकीकडे ‘कोरोनाचा शारीरिक हल्ला’ परतवून लावत असतानाच दुसरीकडे ‘समाजाचा मानसिक आघात' सहन करण्याची वेळ कृपया कोणावरही आणून देऊ नका.

 

 ( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस