आखातात पेटलेल्या युद्धामुळे दुबईतले पाळीव प्राणी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:33 IST2026-03-19T10:32:27+5:302026-03-19T10:33:27+5:30

दुबई सोडून मायदेशी परतणाऱ्या अनेक कुटुंबांनी आपल्या पाळीव प्राण्यांना मात्र तिथेच ‘सोडून’ दिलं आहे. त्यांच्या देखभालीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Pets in Dubai on the streets due to Gulf war | आखातात पेटलेल्या युद्धामुळे दुबईतले पाळीव प्राणी रस्त्यावर

आखातात पेटलेल्या युद्धामुळे दुबईतले पाळीव प्राणी रस्त्यावर

शिल्पा मोहिते, दुबईस्थित अभियंता तंत्रज्ञान, संस्कृती यावर लेखन

त्या दिवशी सकाळी मी घरात फिरत फोनवर बोलत होते. काही सेकंदांनी अचानक आमच्या खिडकीच्या काचेवर काहीतरी आदळल्यासारखा मोठा आवाज झाला. फोनवरचं बोलणं आवरतं घेऊन मी वरच्या मजल्यावर झोपलेल्या ‘सिलो’ या आमच्या मनीमाऊकडे धावले. अचानक झालेल्या आवाजामुळे तो घाबरला होता. त्याला उचलून खाली आणलं आणि टीव्हीवर बातम्या बघत बसले. युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली हे माणसांना बातम्यांमधून कळलं, पण मुक्या जिवांना ते कसं कळावं? काचेवरचा आवाज थांबून बराच वेळ झाला, तरी सिलो घाबरलेल्या नजरेने बाहेर बघत होता. सध्याच्या परिस्थितीत येणाऱ्या ‘अलर्ट्स’ ना आम्ही सरावलो आहोत, पण सिलो मात्र त्या दिवसापासून सतत कुठल्यातरी दडपणाखाली असल्यासारखा दिसतो. थोड्या आवाजानेही तो दचकतो आणि आमच्या आसपास घुटमळत असतो. 

यूएईमध्ये सुरू झालेल्या संघर्षानंतर अनेक कुटुंबांनी आपापल्या मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यातल्या काहींनी आपल्या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे कितीतरी पाळीव प्राणी बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत. अनेकदा पाळीव प्राण्यांच्या लसीकरणाचं वेळापत्रक सांभाळणं, त्याची ओळख पटवण्यासाठी मायक्रोचिप बसवणं, स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी या गोष्टी केलेल्या नसतात. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे दुसरा पर्यायही उरत नाही.

अलीकडेच एका कुटुंबाने आपली दोन मोठी कुत्री घरातील मदतनीसांच्या भरवशावर सोडली आणि ते देश सोडून गेले. काही दिवसांनी जागा आणि पैशांच्या अभावामुळे मदतनीसांनाही त्यांना सांभाळणं अवघड झालं. त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली. आता दिलेल्या मुदतीत त्या कुटुंबाने योग्य व्यवस्था केली नाही, तर हे मुके जीव रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. अशा प्राण्यांना काही प्राणीप्रेमी संस्था, व्यक्ती तात्पुरता आसरा देतात. मात्र, त्यांच्यावर होणारा खर्च आणि पुनर्वसनाची जबाबदारी मोठी असते.

 प्राण्यांना मागे ठेवून स्थलांतर करणाऱ्यांची परिस्थिती समजून न घेता त्यांच्यावर सरसकट टीका करणं योग्य नाही, हे मात्र खरं आहे. एखाद्या प्राण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया खर्चिक आणि गुंतागुंतीची असते. आरोग्य प्रमाणपत्रं, लसीकरण, विमान कंपनीची परवानगी, क्वारंटाईनच्या अटी, अशा अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते. घाईघाईत देश सोडावा लागतो, तेव्हा मर्यादित वेळ, आर्थिक साधनं आणि स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव यांमुळे लोकांना काय करावं, हे कळत नाही. कधी-कधी त्यामुळे ते काहीच करत नाहीत. पण, त्याची किंमत मात्र मुक्या प्राण्यांना चुकवावी लागते.

आज दुबईमधील बहुतांश पेट-बोर्डिंग्स ‘फुल’ आहेत. दुबई महानगरपालिकेने भटक्या प्राण्यांसाठी ‘एहसान स्टेशन’ या नावाचा उपक्रम सुरू केला आहे, त्यासाठी ‘एआय-बेस्ड’ यंत्रणाही निर्माण केली आहे. पण, आता लवकरच यूएईमध्ये तापमान वाढ सुरू होईल, तेव्हा तापलेल्या रस्त्यांवर या मुक्या जिवांचं कसं निभावेल हा विचारही अस्वस्थ करून जातो. 
Shiloo75@gmail.com

Web Title : खाड़ी युद्ध: दुबई में पालतू जानवर सड़कों पर बेसहारा छोड़े गए

Web Summary : खाड़ी संकट के चलते परिवार दुबई से पलायन कर रहे हैं, जिससे पालतू जानवर बेसहारा हो गए हैं। आश्रय स्थल भरे हुए हैं। उच्च स्थानांतरण लागत और समय की कमी से जानवर असुरक्षित हैं। दुबई नगरपालिका इन जानवरों का समर्थन करने की कोशिश कर रही है, लेकिन बढ़ता तापमान एक खतरा है।

Web Title : War in Gulf: Dubai Pets Abandoned, Left to Fend on Streets

Web Summary : Gulf conflict forces families to leave Dubai, abandoning pets. Shelters are full. High relocation costs and lack of time leave animals vulnerable. Dubai municipality is trying to support these animals, but rising temperatures pose a threat.