त्याग, क्षमाशीलतेचे पर्युषणपर्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:35 AM2020-08-22T00:35:13+5:302020-08-22T00:35:21+5:30

त्या सर्वांना आपलं मानायलाचं हवं म्हणजेच सर प्राणी, जीवजंतू, वनस्पती, जलचर या सर्वांना आपलं मानायला हवं आणि आपुलकीनं वागवायला हवे.

Paryusanparva of renunciation, forgiveness | त्याग, क्षमाशीलतेचे पर्युषणपर्व

त्याग, क्षमाशीलतेचे पर्युषणपर्व

Next

-अ‍ॅड. एस. के. जैन
सातत्याने विचारणा केली जाते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पर्युषणपर्व जैन धर्मीय मंडळी जरी साजरा करीत असली तरी हा एक जगण्याचा ‘सिद्धांत’ आहे. भगवान महावीर यांनी संदेश दिला होता की ‘सर्वांनाच आपलं मानायला हवे. सर्वांमध्ये आपलं कुटुंब, नातेवाईक किंवा ज्याच्याशी आपले व्यावहारिक संबंध आहेत अशांपुरताच हा संदेश मर्यादित नाही. सर्व म्हणजे या ब्रम्हांडात जे राहतात. त्या सर्वांना आपलं मानायलाचं हवं म्हणजेच सर प्राणी, जीवजंतू, वनस्पती, जलचर या सर्वांना आपलं मानायला हवं आणि आपुलकीनं वागवायला हवे. आपल्या माणसांवर आपण प्रेम करतोच. उलट आपले नसले तर त्यांना लांब ठेवतो. त्यामुळं सर्वांनाच आपले मानायला हवे. एकदा सर्वांना आपले मानले की आपल्या मनात त्यांच्याप्रति प्रेम, भावना निर्माण होते. आज विश्वात ज्या समस्या उद्भवल्या आहेत, त्यापासून निश्चितच सुटका होऊ शकेल. प्रत्येक ठिकाणी मग ती भारत-पाकिस्तान किंवा भारत-चीन असो लढाईची भाषा वापरली जात आहे. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती उद्विग्न आहे. कोणत्या क्षणी काय होईल, मानवतेचा ºहास केव्हा होईल, मानवता केव्हा संपेल, याची कुणीच शाश्वती देऊ शकत नाही; पण आपण ‘अहिंसा परमो धर्म’ याचा आयुष्यात अवलंब केला म्हणजेच प्रत्येकाला मी दुखावणार नाही, हा व्यक्ती माझाच आहे, अशी भावना निर्माण केली तर लढायची इच्छा आणि मनात लढण्याची जी खुमखुमी आहे ती दूर होऊ शकेल.


धर्म, जात, प्रांत, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला आपलं मानायला हवं. या जगात मग तो कुणीही असो तो आपलाच आहे ही भावना निर्माण झाली तर जगातील दु:ख एका क्षणात संपू शकतील. पर्युषण पर्वाच्या निमित्ताने अजून एक शिकवण दिली आहे की राग, लोभ, मोह, माया याचा त्याग केला पाहिजे. त्याग करा म्हणजे काय करा तर आपल्या आवडीनिवडी मर्यादित ठेवायल्या हव्यात. जर सुरुवात करायची म्हटली तर घरामध्ये केला जाणारा ‘पाण्याचा वापर’. आपल्याला प्रत्यक्षात पाणी किती लागते आणि आपण त्याचा किती अपव्यय करतो, याचा कधी कुणी विचार केला आहे का? कदाचित नाही. माझी आई नेहमी सांगायची की पाणी हे तुपासारखं वापरायला हवं. आपण तूप कधी खाली सांडवतो का? नाही ना. मग जमिनीवर पडलेला पाण्याचा थेंब तरी का वाया घालवायचा? आज आपल्याकडे पाण्याचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्या समस्यांचे मूळ कदाचित याच तत्त्वामध्ये दडले आहे. मुळातचं आपल्या मूलभूत गरजा किती आहेत, हे समजून घेतल्या पाहिजेत.
अन्न, वस्त्र, निवारा याबाबतच्या आपल्या आवडी-निवडी प्रत्येक व्यक्तीने मर्यादित ठेवल्या तर कदाचित काही प्रश्न नक्कीच सुटू शकतील आणि कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवणार नाही. मला ज्या गोष्टींची गरज आहे. त्याच गोष्टी इतर बांधवांनादेखील हव्या आहेत. पशुपक्ष्यांना देखील अन्नपाणी आणि इतर गरजा आहेत. म्हणूनच आपण गरजेपेक्षा जर अधिक आहाराचे सेवन करत असू तर तो इतरांवर अन्याय आहे. त्याकरिता ‘उपवासा’ची शिकवण दिली आहे. आपल्या शरीराला जितकी गरज आहे त्यापेक्षा मनुष्याने अधिक सेवन करू नये. त्यापेक्षा माणसाने अधिक परिग्रह करू नये. यामागे त्यागाची भावना आहे. तिसरी गोष्ट आहे ती ‘क्षमा’. कुणाचीही क्षमा मागताना लाज वाटता कामा नये. क्षमा म्हणजे मनात कोणतेही दुराग्रह ठेवता कामा नये. क्षमा मागतानासुद्धा ती उदार अंत:करणाने मागता आली पाहिजे. क्षमा मागताना मनात कोणताही किंतु असता कामा नये. क्षमा मागणे हा जैन धर्माच्या संस्काराचाच एक भाग आहे. बालपणापासूनच आपली चूक झाली असेल तर ती स्वीकारायची आणि कुणाबद्दलही मनात राग, लोभ न ठेवता मोठेपणा दाखवून क्षमा करायची व आपली चूक झाल्यास माफी मागायची, अशा संस्काराची बीजे रुजवली जातात. केवळ पर्युषणपर्वाच्या आठ दिवस हे तत्त्व पाळायचे नाही तर आयुष्यभर त्या तत्त्वांचे आचरण करीत राहायचे. आयुष्यात हे तत्त्व व्यवहारात आणले तर कधीच खोटेपणाने वागण्याची गरज लागणार नाही. आयुष्यात कधी-कधी मोहमायेमुळेसुद्धा अनेक समस्या उद्भवतात. एकावर अपार प्रेम करताना दुसऱ्यावर एकप्रकारे अन्यायच करतो. याकरिता पर्युषणपर्वामध्ये दिवसभरात परोक्ष-अपरोक्ष झालेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी देवासमोर माफी मागितली जाते. केवळ माफी मागायची नाही पण त्याबरोबरच संकल्प करायचा की पुन्हा माझ्या हातून ही चूक होणार नाही. हे केवळ पर्युषणपर्वाचे आठ दिवस अथवा ‘संवत्सरी’पुरते मर्यादित न ठेवता ३६५ दिवस देवाला साक्ष ठेवून त्या लोकांची अथवा प्राणीमात्रांची माफी मागावी.

ज्यांना आपल्यामुळे त्रास झाला असेल, असे माझ्या हातून पुन्हा घडणार नाही, असा निश्चय करावा लागतो. यातून जे वैयक्तिक हेवेदावे असतील, एकमेकांबद्दल मनात द्वेष असेल तर तो निघून जाईल. पर्युषणपर्वाचा उपयोग केवळ जैन धर्मियांना नव्हे तर संपूर्ण मानवसमाजाला झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा पर्युषणपर्वानिमित्त ‘संवत्सरी’मध्ये क्षमाशीलता दाखवितात. त्यांनाही याची जाणीव आहे. समाजाला याची जाणीव करून दिली तर सर्व समस्या दूर होतील. पर्युषणपर्व हे समस्त मानवसमाजासाठी आहे. यानिमित्तानं मानवतेच्या दृष्टिकोनातून हे पर्व साजरे केले तर राष्ट्राचे सर्व प्रश्न सुटू शकतील. ‘अहिंसा’ कुणाला मारले म्हणजेच होते असे नाही. कुणाचे मन दुखावले तरी ती होते. माझ्या हातून हिंसा का होते? मग ती कशी होणार नाही, याचा विचार व्हायला हवा. इतरांचा विचार न करणे हीदेखील हिंसा आहे. पर्युषणपर्व हे त्याग, क्षमाशीलतेसाठी आहे. विश्वाला हा दिला गेलेला एक संदेश आहे.
(ज्येष्ठ विधिज्ञ, पुणे)

Web Title: Paryusanparva of renunciation, forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.