विशेष - डॉ. स्वप्ना पाटकरनुकतीच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ने अवघ्या २४ व्या वर्षी आपले आयुष्य संपवून टाकले. जिया खान हे त्यातलंच अजून एक उदाहरण... यांच्या आयुष्याला भेडसावत असलेला हा प्रश्न कोणता की, ज्याचे उत्तर केवळ आत्महत्या..? या जगात संवाद साधल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. फक्त तो साधणे खूप महत्त्वाचे आहे. दुरून डोंगर साजरे या उक्तीला साजेशी आहे ही ताऱ्यांची दुनिया... या चंदेरी जगाच्या शोधात कित्येक पावलं या दिशेने चालायला लागतात आणि मग एक-एक करून समोर येणाऱ्या आव्हानांपुढे गुडघे टेकतात. 'नेम आणि फेम' कमावण्याच्या उद्देशाने छोट्या शहरातल्या हजारो तरुण-तरुणी या मुंबापुरीत येऊन थडकतात... आपली स्वप्न हे मुंबई शहर नक्की पूर्ण करेल या विश्वासाने या शहरात पाऊल टाकतात. कसेतरी पैसे जमवून मोठाल्या अॅक्टिंग स्कूल्समध्ये दाखला घेतात. छोटासा रोल मिळवण्यासाठी कित्येक प्रोडक्शन हाउसच्या पायऱ्या झिजवतात. पार्टीजमध्ये उपस्थित राहून अचूक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. अशी ही रोजची धावपळ... या स्पर्धेत यशस्वी होण्याचा अट्टाहास कित्येकांच्या जिवावर बेतला आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने, नैराश्य आणि त्या नैराश्यातून आत्महत्या...आयुष्यात प्रसिद्धीबरोबर जबाबदारी येते. लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्यात आपला रोल मॉडेल शोधतात, तेव्हा आपण एक उत्तम उदाहरणाच्या रूपात लोकांसमोर येणे महत्त्वाचे... अनेक प्रसंगात नैराश्य येते. ते स्वाभाविकही आहे, पण या सगळ्यात संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. कुटुंबातल्या जवळच्या सदस्याशी किंवा एखाद्या चांगल्या मित्राशी साधलेला संवाद बऱ्याच संकटांवर उपाय ठरू शकतो. काही वेळा मनोवैज्ञानिकाची मदत घेता येऊ शकते. कुटुंबाशी बांधिलकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक कुटुंबाने याचा विचार करावा. आपल्या पाल्याला, ‘आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर आहोत,' हा विश्वास पालकांना देता आला पाहिजे. चांगल्या किंवा वाईट विषयावर झालेली चर्चा बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला देऊन जातील.'सशक्त मन'...सशक्त शरीर सुंदर जीवनाचा पाया आहे. स्वत:वर विश्वास ठेवून आपल्या जीवनाची वाट चालावी. भविष्याची आखणी करताना वर्तमानात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेता आला पाहिजे. नकारात्मक दृष्टी असणाऱ्या माणसांपासून शक्य तितके लांब राहा. कोणत्याही समस्येने निराश होऊ नका. आत्महत्येच्या विचारावर मात करण्यात शहाणपण आहे. आपल्या आयुष्याचा आनंद हा आपल्याच हातात आहे, तेव्हा तुमच्या आनंदाची सूत्र दुसऱ्या कोणाच्या हाती न देता, छोटे-छोटे आनंदाचे क्षण नक्की साजरे करा. आरशासमोर उभे राहिल्यानंतर आरशात असणारी ती व्यक्ती तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी समर्थ आहे, त्या माणसाशी साधलेला संवाद अनेक समस्यांचे निराकरण करेल. तेव्हा आपल्या कोणत्याही समस्येसाठी एकदा स्वत:शी बोलून तर बघा... (लेखिका मनोचिकित्सक आहेत.)
एकदा स्वत:शी बोलून तर बघा!
By admin | Updated: April 10, 2016 02:37 IST