नितीन गडकरींचा रोख कुणावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:11 AM2019-02-06T06:11:36+5:302019-02-06T06:12:36+5:30

मोदींच्या तुलनेत गडकरी संघाच्या जवळ आहेत. अडवाणींनंतर अनेक ज्येष्ठ पक्षनेत्यांना बाजूला सारत त्यांना भाजपाचे अध्यक्षपद दिल्याने संघाची निवड देशाला ठाऊक आहे. त्यामुळे गडकरींच्या तोंडून संघच बोलत असतो, असे समजणारे समजतात.

Nitin Gadkari's cash? | नितीन गडकरींचा रोख कुणावर?

नितीन गडकरींचा रोख कुणावर?

Next

आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश कसा सांभाळणार, हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा टोलेवजा प्रश्न नेमका कुणाला उद्देशून आहे? काँग्रेसवाल्यांची घरे शाबूत आहेत, सोनिया गांधींचा संसार झाला आहे, राहुलने अद्याप आपले घर वसवले नाही आणि प्रियंकाचे चांगले चालले आहे. काँग्रेसमधील जुनी व नवीही माणसे आपल्या घरात समाधानी आहेत. त्यांच्यातल्या कुणी आपल्या बायका सोडल्या नाहीत आणि एकटे राहण्याचे व्रतही घेतले नाही. बायका, मुले, घर-दार, नोकरपाणी असे सारे सांभाळून किंवा ते नसेल तर आहे त्या अडचणीत त्यांचे व्यवहार चालू आहेत. त्यामुळे गडकरी यांच्या डोळ्यासमोर घर न सांभाळू शकणारा तो देश चालविणारा पुढारी नेमका कोण असावा, या प्रश्नाने भाजपाच्या अनेक व संघाच्या सर्वच सभासदांच्या मेंदूला घाम आणला आहे. या साऱ्यांसमोर स्वत:चे घर न सांभाळणारा, आपल्या पत्नीला व आईलाही आपल्यापासून दूर ठेवणारा, क्वचितच कधी त्यातल्या आईला भेटणारा नेता एकच आहे.

नरेंद्र मोदी. फार वर्षांपूर्वी आपण देशाची सेवा करणार आणि त्या सेवेतून आपल्याला वेळ मिळणार नाही म्हणून आपण वेगळे राहू, असे त्या सत्पुरुषाने आपल्या नवविवाहित पत्नीला ऐकविले, असे सांगतात. त्याप्रमाणे यशोदाबेन या बिचाºया स्वत:ला आणि नवºयाच्या प्रतिष्ठेला सांभाळत कुठेतरी एकट्या राहतात. मोदींनी दिलेले संरक्षणही त्यांनी नाकारल्याचे मध्यंतरी प्रकाशित झाले. मोदींच्या मातोश्रीही गुजरातेत एकट्या राहतात. मोदी त्यांना भेटतात तरी. यशोदाबेन यांचे नशीब तेवढेही मोठे नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक माणसे वेगवेगळ्या कारणांनी निकामी झाली. पर्रीकर, जेटली, प्रभू ही माणसे असून नसल्यासारखी आहेत आणि सुषमा व राजनाथ यांची नावे केवळ त्यांच्या मंत्रिपदांवर देशाला ठाऊक आहेत.

संरक्षणमंत्री पदावर असलेल्या निर्मला सीतारामन यांचे नाव कमी तर त्यांच्या अधिकाºयांचीच नावे वृत्तपत्रात जास्तीची झळकतात. त्यामुळे गडकरी यांच्या प्रश्नाच्या दुसºया भागाचे उत्तर लगेच मिळते. मंत्री नसले आणि असले ते कामाचे नसले तरी मोदी आपले सरकार रेटून नेतात. गडकरी यांच्या प्रश्नाचा पहिला भाग यशोदाबेन यांना उद्देशून असेल असे वाटत नाही. कारण तसे न विचारण्याएवढा तो सभ्य कार्यकर्ता आहे. शिवाय तो संघाच्या शिस्तीत वाढलेला आहे. मोदी त्यांना फारसे जवळ करीत नाहीत. रस्ते बांधत तुम्ही दिल्लीपासून शक्य तेवढे दूरच राहा हा मोदींचा मनसुबा कळण्याएवढे गडकरी खचितच हुशारही आहेत. गेल्या चार महिन्यांत मोदींच्या नेतृत्वात भाजपाला मोठे पराभव पाहावे लागले. हिंदीभाषी राज्यात त्यांच्या झालेल्या पिछेहाटीमुळे भाजपा व संघ यांनाच मोठी जखम झाली आहे. परंतु संघ मोदींवर टीका करायला धजावत नाही. कारण ती त्याची परंपरा नाही आणि भाजपा ती करीत नाही, कारण त्या पक्षात स्वातंत्र्य कमी आणि नेतृत्वाची शिस्त अधिक आहे. त्यामुळे गडकरी यांना अभिप्रेत असलेले घर हे व्यापक कुटुंब असावे, हे मानण्यास जागा आहे. एक गोष्ट मात्र साºयांनी लक्षात घ्यावी अशी आहे. मोदींच्या तुलनेत गडकरी संघाच्या अधिक जवळ आहेत. अडवाणींना भाजपाच्या

अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर संघाने नितीन गडकरींना ते पद दिले आणि ते देताना अनेक जुन्या व ज्येष्ठ पक्षनेत्यांना बाजूला सारले. तेव्हापासून संघाची नेतृत्वासाठीची पहिली निवड देशाला ठाऊक झाली आहे. त्यामुळे गडकरी बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडून संघच बोलत असतो, असे समजणारे समजतात. या समजण्यात सत्याचा अंश मोठाही आहे. अच्छे दिन ही गले की हड्डी बनली आहे, पराभवाची जबाबदारी नेतृत्वाने घ्यायला हवी, सत्यात उतरतील अशीच स्वप्ने जनतेला दाखवायला हवीत; अन्यथा लोक फटकवायला कमी करणार नाहीत, या आशयाची त्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये हा त्यामुळेच अनेकांना परिवाराने वेगवेगळ्या माध्यमातून भाजपाला दिलेला संदेश वाटतो. त्या स्थितीत गडकरींच्या टोल्याला कुणी उत्तर देणार नाही आणि त्यामुळे मनातून प्रसन्न झालेली परिवारातील माणसे आपला आनंद बोलूनही दाखविणार नाहीत. पण ज्यांना संदेश पोहोचायला हवा, त्यांना तो पोहोचत असल्याने गडकरींच्या वक्तव्याचा रोख कुणावर याचे नेमके उत्तर लगेचच मिळणार नाही.

Web Title: Nitin Gadkari's cash?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.