- प्रशांत दीक्षित 
देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीला मंदी हा शब्द लावणे योग्य नाही असे जाणकार अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मंदी कशाला म्हणायचे याचे काही निकष अर्थशास्त्राने निश्चित केले आहेत. सध्याची परिस्थिती त्या निकषात बसत नाही असे ते म्हणतात. मंदी ऐवजी स्लो डाऊन हा शब्द योग्य आहे असे त्यांचे म्हणणे.इंग्रजीमध्ये स्लो डाऊन, रिसेशन, डिप्रेशन असे स्वतंत्र शब्द विशिष्ट आर्थिक परिस्थितीची ओळख करून देताना वापरतात. मराठीत असे स्वतंत्र शब्द नाहीत.तथापि, कुठलाही समाज काटेकोर व्याख्येत बोलत नाही. अगदी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत देशातही शब्दापेक्षा त्यामागची भावना लक्षात घेऊन लोकव्यवहार चालतो. स्वत:ची आर्थिक स्थिती अपेक्षे इतक्या वेगाने सुधारत नसली तर मंदी आली आहे, असेच सामान्य माणूस म्हणतो, हे भावनात्मक वर्णन असते.समाजाची ही सवय लक्षात घेतली तर सध्याच्या परिस्थितीचे वर्णन मंदी असेच करावे लागते.या मंदीचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होईल का हा चर्चेचा विषय आहे...


महाराष्ट्राचा विचार केला तर मागील पाच वर्षांत लोकांच्या जीवनमानात लक्षणीय फरक पडला असे काहीही फडणवीस सरकारकडून झालेले नाही. परकीय गुंतवणुकीसारख्या काही क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी ही आघाडी गेल्या कित्येक वर्षांतील कारभाराचा परिणाम आहे.त्यात फडणवीस सरकारचे कर्तृत्व फार नाही. उलट गुंतवणुकीचे प्रमाण घटलेले आहे. महाराष्ट्रातील राहणीमान सुधारले, त्याचा दर्जा वाढला, मूलभूत सोयीसुविधा मुबलक व सुलभ मिळू लागल्या असा नागरिकांचा अनुभव नाही.रोजगार वाढलेला नाही. गावातील तरूण शहरात आले तर त्यांना नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. शहरातील तरूणांनाही नोकरी मिळविणे सुलभ झालेले नाही. शहरात नवे घर घेणे अशक्य झाले आहे. पाणीपुरवठा, शहरी वाहतूक, आरोग्यसेवा यामध्ये गुणात्मक फरक पडलेला नाही. शेतीचे उत्पादनवा शेतमालाचे भाव यामध्ये फार वाढ झालेली नाही. जलशिवारसारख्या काही योजनांमध्ये फडणवीस सरकारने चांगली कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या प्रचारसभेत केलेल्या कामांची जंत्री देतात आणि महाराष्ट्र कसा आघाडीवर आहे हे कळकळीने सांगतात. तरीही शहरी मध्यमवर्गाच्या डोळ्यात भरेल अशी कोणतीही कामगिरी फडणवीस सरकारला करता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात अलिकडे आलेली मोठी गुंतवणूक सांगा, असा प्रश्न 'लोकमत' कडून विचारला गेला असता मुख्यमंत्र्यांना उत्तर देता आले नव्हते.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कालखंडाचे चित्र याहून वेगळे नव्हते. त्यावेळीही काही चांगली कामे होत असली तरी सरकारने रेटा लावून काही बदल घडवून आणला अशी उदाहरणे नव्हती. काहीशा तशाच पद्धतीने फडणवीस सरकारने गाडा पुढे चालू ठेवला.मात्र दोन गोष्टींमध्ये मागील सरकार व फड़णवीस सरकार यांच्यात फरक करता येतो आणि याच फरकावर भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा जोर असणार आहे हे नाशिकच्या सभेतून लक्षात येते. या दोन गोष्टी म्हणजे राष्ट्रवादाचा प्रभावी परिणाम आणि भ्रष्टाचाराचा कलंक नसलेले सरकार. याच दोन अस्त्रांचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक भाजपाला अनुकूल करून घेतली. आता तीच दोन अस्त्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात वापरीत आहेत.

सरकारवर डाग पडता कामा नये असे नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितले होते आणि मी तसा कारभार करून दाखविला, असे फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत जनसमुदायाला सांगितले. फडणवीस यांनी नेत्रदिपक कामगिरी करून दाखविली नसली तरी त्यांच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही बाब लोकांसाठी फार महत्वाची आहे. 

मोदी, शहा, फडणवीस या नेत्यांबद्दल लोकांशी बोलताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते. हे नेते कारभारात अनेकदा कमी पडतात हे लोकांना जाणवते, पण हे नेते स्वत:ची धन करून घेत नाहीत, जे काही करतात ते देशासाठी किंवा पक्षासाठी प्रामाणिकपणे करतात, अशी बहुसंख्य नागरिकांची भावना आहे.

Web Title: narendra modi given mi one Advice and i did it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.