नेपोलियन, महाराणी जोसेफिनच्या दागिन्यांची चोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:54 IST2025-10-24T07:53:55+5:302025-10-24T07:54:44+5:30
म्हणूनच इथे जगातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था आहे.

नेपोलियन, महाराणी जोसेफिनच्या दागिन्यांची चोरी!
संपूर्ण जग पादाक्रांत करण्याची इच्छा असलेला एक फ्रेंच लढवय्या ‘सम्राट’ म्हणून नेपोलियन बोनापार्टला ओळखलं जातं. त्यानं युरोपात मोठ्या प्रमाणावर फ्रान्सच्या साम्राज्याचा विस्तार केला. नेपोलियन आणि महाराणी जोसेफिन यांच्या प्रेमाच्या कहाण्याही मोठ्या कौतुकानं सांगितल्या जातात, पण या प्रेमालाही दु:खाची एक किनार होती.
महाराणी जोसेफिन या नेपोलियनच्या पहिल्या पत्नी. नेपोलियन सम्राट झाला तेव्हा फ्रान्सच्या त्या पहिल्या महाराणी झाल्या. दोघांचं एकमेकांवर अपार प्रेम, पण जोसेफिनला अपत्य होत नव्हतं, त्यामुळे नेपोलियनने १८१० साली त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. तरीही आपण आयुष्यभर जोसेफिनवर प्रेम केलं, असं नेपोलियननं मान्य केलं आहे.
फ्रान्सच्या लूव्र म्युझियममध्ये या दाम्पत्याचे अनेक मौल्यवान दागिने जतन करून ठेवले आहेत. पण काही चोरट्यांनी नुकतेच हे मौल्यवान ऐतिहासिक दागिने लंपास केल्याने संपूर्ण फ्रान्सला धक्का बसला आहे. चोरट्यांचा प्लॅनही अतिशय अफलातून होता. ते ट्रकवर एक मोठी शिडी घेऊन आले. या शिडीनं ते वर चढले. त्यानंतर डिस्क कटरनं खिडकी फोडून ते आत गेले. म्युझियममध्ये सुरू असलेल्या बांधकामासाठी आणलेल्या मालवाहू लिफ्टचाही त्यांनी वापर केला. ही लिफ्ट थेट त्या गॅलरीत जात होती जिथे हे दागिने ठेवलेले होते. चोरट्यांनी चेनसॉसारख्या साधनांनी काच आणि कुलूप दोन्ही फोडली.
चोरीतील दागिन्यांत १८५५मध्ये बनवलेला ऐतिहासिक ‘यूजनी क्राउन’ही होता, जो हजारो रत्नांनी मढवलेला आहे. या मुकुटाचे काही भाग मोडलेल्या अवस्थेत सापडले. चोरीच्या गडबडीत हा मुकुट तुटला असावा. केवळ चार मिनिटांत ही चोरी झाली. फ्रान्समध्ये आतापर्यंत ज्या मोठ्या चोऱ्या झाल्या, त्यातील ही मोठी चोरी मानली जात आहे.
चोरीस गेलेल्या दागिन्यांत नेपोलियन आणि महाराणी जोसेफिन यांच्या संग्रहातील नऊ अतिशय मौल्यवान दागिन्यांचाही समावेश आहे. त्यात एक हार, ब्रोच आणि टियारा होते. सगळ्यात मौल्यवान होता १८५५मध्ये नेपोलियन यांनी महाराणी जोसेफिन यांच्यासाठी बनवलेला क्राउन. त्याची भव्य रचना आणि त्यातील हिऱ्यांसाठी तो प्रसिद्ध आहे. या संग्रहातील काही वस्तू फ्रेंच क्रांतीदरम्यान राजघराण्यांकडून लुटल्या गेल्या होत्या तर काही नेपोलियन साम्राज्याकडून जप्त केल्या गेल्या होत्या. चोरी झालेल्या वस्तूंची अचूक किंमत अद्यापही सांगता आलेली नाही. काही सूत्रांच्या मते कोणत्या तरी श्रीमंत कलेक्टरच्या सांगण्यावरून ही चोरी झाली असावी, जेणेकरून दागिने काळ्या बाजारात न विकता थेट खासगी ताब्यात ठेवता येतील!
चोरीची बातमी कळताच संपूर्ण म्युझियममध्ये गोंधळ उडाला. हजारो पर्यटक सकाळीच दर्शनासाठी आले होते, पण त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि म्युझियम दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आलं. जगातील सर्वाधिक पाहिलं जाणारं म्युझियम, अशी या म्युझियमची ख्याती आहे.
लूव्र म्युझियममध्ये एकूण ३,८०,००० मौल्यवान वस्तू आहेत, त्यापैकी ३५,००० प्रदर्शनात ठेवलेली आहेत. मोनालिसा आणि वीनस डी मिलो ही या म्युझियमची मुख्य आकर्षणं. मेसोपोटामिया, इजिप्त आणि युरोपियन कलाकारांच्या प्राचीन वस्तू, शिल्पं आणि चित्रंही इथे पाहायला मिळतात. रोज तीस हजार लोक या म्यझियमला भेट देतात. म्हणूनच इथे जगातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था आहे.