Mr. Chief Minister, do at least this much for Marathi! | मुख्यमंत्री महोदय, मराठीसाठी एवढे तरी करा!

मुख्यमंत्री महोदय, मराठीसाठी एवढे तरी करा!

- भक्ती चपळगावकर

प्रति, 
माननीय उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
सप्रेम नमस्कार!

माझी मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. माझ्या मुलांचे मराठी उत्तम असावे अशी माझी इच्छा आहे. - ही दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत, असा कधीकधी माझाच समज होतो. या समजाला अनेक कारणे आहेत. मुलांच्या शिक्षणाचे माध्यम इंग्रजी निवडलेल्या लाखो पालकांपैकी मी एक आहे; पण, त्याचबरोबर मराठी भाषेला मनात मोठे स्थान असलेल्या अगणित पालकांपैकीसुद्धा मी एक आहे. आज आपले सगळ्यांचेच कुठेतरी काहीतरी चुकते आहे. मराठी उत्तम हवे असेल तर मराठी माध्यमाची निवड केली पाहिजे हे जितके खरे आहे, तितकेच इंग्रजी माध्यमांत  शिकत असलेल्या मुलामुलींचे मराठी उत्तम व्हावे यासाठी खोलवर प्रयत्न झाले पाहिजेत हेही  खरे आहे.

मी आणि माझ्या आजूबाजूला असलेल्या मराठी पालकांमध्ये काही समान दुवे आहेत. आमच्यापैकी बहुतेक जण मराठी माध्यमात शिकलेले आहेत, आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्ही घरी मराठीत बोलतो आणि आम्हां सर्व पालकांच्या मुलांची मराठीशी गट्टी व्हावी म्हणून आमचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. “तुमच्या मुलांचे मराठी कच्चे असेल तर त्या परिस्थितीला  तुम्ही जबाबदार आहात; कारण त्यांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा निर्णय तुमचा होता,” असा काहिसा सूर हल्ली ऐकू येतो. त्यात तथ्यही आहे. मुले ज्या भाषेत शिक्षण घेतात, त्याच भाषेत सहज संवाद साधतात.

इंग्रजी जगाची ज्ञानभाषा आहे, त्याही भाषेवर माझ्या मुलांनी मनापासून प्रेम करावे असे मला वाटते. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी मध्यंतरी एक सूचना केली होती. ते म्हणाले, “इंग्रजी किंवा हिंदी भाषेत संवादाची गरज असेल तर अवश्य करावा. रोजच्या व्यवहारात मात्र कुणा अगंतुकाशी बोलत असाल तर संवादाची सुरुवात नक्की मराठीत करा. जर त्याने मराठीत उत्तर दिले तर संवाद आपोआप मराठीत होईल!” - असे साधे उपाय अंमलात आणले तर मराठीचे संवर्धन होईल अशी आशा त्यांना आहे. अशाच काही साध्या उपायांची चर्चा करण्याचा या पत्राचा उद्देश आहे. 

आम्ही मुलाला शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा घराजवळ असलेली उत्तम शाळा हा एकमेव निकष होता. त्याची द्वितीय भाषा मराठी आहे, तो घरी मराठीत बोलतो; पण तरीही त्याने मराठीला म्हणावे तसे आत्मसात केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी काही बाबतींत मी जबाबदार आहे. पालक म्हणून माझी सर्वांत मोठी चूक ही झाली की मी घरी मुलाकडून मराठीचा सराव करून घेतला नाही. मुले शाळेत दिवसभर असतात त्यामुळे त्यांना कोणतीही शिकवणी लाऊ नये या मताची मी होते. एकवेळ गणित, विज्ञानाचा अभ्यास केला नाही तरी चालेल; पण घरी मराठी आणि शाळेत इंग्रजी असेल तर मराठीचा सराव अत्यावश्यक आहे. 

आम्ही घरी मराठीत बोलतो. आम्ही दोघेही (मी आणि माझा नवरा) मराठी माध्यमात शिकलो आहोत. मराठी भाषेत व्यवहार करतो, आमच्या व्यवसायाची भाषा मराठी आहे. मराठीवर प्रेम आहे, मराठी गाणी, कविता, कथा, कादंबऱ्या या सगळ्यांचा रसास्वाद घेतो. पालक म्हणून झालेली दुसरी चूक म्हणजे हे मराठी प्रेम जसे आमच्या पालकांकडून आपसूक आमच्याकडे आले तसेच आमच्याकडून आमच्या मुलांकडे जाईल असा समज बाळगला. 

शाळांकडून अपेक्षा

ही अपेक्षा फक्त माझ्या मुलांच्या शाळेकडून नाही, तर इंग्रजी माध्यमाच्या विविध अभ्यासक्रमाच्या शाळांकडून आहे. बहुतेक सगळ्या इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजीशिवाय इतर भाषांत बोलण्यास मनाई असते. सगळ्या मुलांनी एका भाषेत संवाद साधावा आणि ज्या माध्यमात त्यांना शिकवले जात आहे त्यावर त्यांचे प्रभुत्व असावे हा उद्देश या नियमामागे आहे. शिक्षण सुकर होण्यासाठी ते आवश्यक आहे; पण यामुळे कुठेतरी मातृभाषेत बोलणे कमी दर्जाचे आहे, असा समज मुलांचा होतो आणि त्यांचे हे फार संस्कारक्षम वय आहे. त्यामुळे सगळीकडे इंग्रजीतच बोला; पण एखादे असे ठिकाण (वाचनालय, प्रयोगशाळा) किंवा दिवस/वेळ (मधली सुट्टी, आठवड्यातला एखादा वार) ठेवावे, ज्या ठिकाणी मुलांनी मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. याचा फायदा फक्त मराठीलाच मिळणार नाही, तर गुजराती, तमीळ, कानडी, सिंधी अशा अनेक भाषांतला संवाद वाढेल.

अवघड शब्दांच्या जागी सोप्या शब्दांचा वापर वाढला पाहिजे, तसेच नवे प्रतिशब्द आले पाहिजेत. भाषा शुद्धीच्या नादात मुलांना न कळणारे अगम्य शब्द त्यांच्याकडून पाठ करून घेतले जातात. त्याऐवजी सोपे आणि वापरात असलेले शब्द असतील तर ते मुलांना लवकर कळू शकेल. साध्या संवादामध्ये दर्जेदार भाषेचा आग्रह धरला पाहिजे.  इथे मी काही ‘आळशी’ क्रियापदांचा उल्लेख करू इच्छिते. अशी क्रियापदे आळशी यासाठी म्हणावी लागतील कारण अर्थाच्या बारीक छटांकडे दुर्लक्ष करून फक्त याच क्रियापदांचा वापर शिकवताना होतो. उदाहरणार्थ बोलणे हे क्रियापद अनेक क्रियापदांच्या ऐवजी सर्रास वापरले जाते.

कवितेचे आणि गाण्याचे बोल असतात, पण गाणे गातात आणि कविता वाचतात हा फरक जवळपास नष्ट झाला आहे. गाणे, वाचणे, रागावणे, प्रश्न विचारणे, उत्तर देणे आणि इतर अनेक असंख्य उद्गारांसाठी बोलणे हे क्रियापद वापरले जाऊ लागले आहे. उदाहरणार्थ गाणे बोल, कविता बोल इत्यादी. हे थांबले नाही आणि सोपी तरीही योग्य भाषा वापरली गेली नाही तर अनेक शब्द काळाच्या ओघात हरवतील. या सगळ्या बाबींचा एकत्रित विचार होऊन भाषेच्या संवर्धनासाठी भाषा तज्ज्ञांकडून खास शाळकरी मुलांसाठी एक  मराठीव्यवहार पुस्तिका (स्टाईलबुक) तयार केली पाहिजे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांवर मराठी भाषेचे उत्तम संस्कार झाले तरच उद्याचे उत्तम लेखक, कवी, साहित्यिक, अनुवादक, चित्रपट - मालिका निर्माते, कलाकार बनणार आहेत. मराठी भाषेवर अनेक आक्रमणे झाली; पण त्या प्रत्येक आक्रमणांतून ती तावून-सुलाखून निघाली. सध्याचे आक्रमण आपणच आपल्या भाषेवर करीत आहोत अशी भीती मनात दाटली आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माझ्या या प्रकट चिंतनात लक्ष द्यावे ही विनंती.
 

Web Title: Mr. Chief Minister, do at least this much for Marathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.