मोबाइल 'बोलण्यासाठी' ? - नव्हे, 'टाळण्यासाठी'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:31 IST2025-08-29T09:31:07+5:302025-08-29T09:31:20+5:30
Mobile News: मोबाइलचा उपयोग आपण कशासाठी करतो? किंवा कोणत्याही फोनचा प्रमुख उपयोग काय? -तर फोनवर बोलणं, दुसऱ्याशी संवाद साधणं. खरंतर मोबाइलची निर्मितीच त्यासाठी झालीय. त्या जोडीला इतर अनेक गोष्टी मोबाइलमध्ये आल्या आणि त्या डोइजड झाल्या ही गोष्ट वेगळी, पण...

मोबाइल 'बोलण्यासाठी' ? - नव्हे, 'टाळण्यासाठी'!
मोबाइलचा उपयोग आपण कशासाठी करतो? किंवा कोणत्याही फोनचा प्रमुख उपयोग काय? -तर फोनवर बोलणं, दुसऱ्याशी संवाद साधणं. खरंतर मोबाइलची निर्मितीच त्यासाठी झालीय. त्या जोडीला इतर अनेक गोष्टी मोबाइलमध्ये आल्या आणि त्या डोइजड झाल्या ही गोष्ट वेगळी, पण तरुणाई; त्यातही टिनेजर्स मोबाइलच्या स्क्रीनमध्ये सतत डोळे खुपसून असतात, एक मिनीटही ते मोबाइल नजरेआड होऊ देत नाही, तरीही आलेला 'कॉल' ते चटकन उचलत नाहीत, हे एक नवं वास्तव आहे. अगदी मोबाइल हातात असला आणि रिंग वाजत असली तरीही ते कॉल रिसिव्ह करीत नाहीत!
बऱ्याचदा आपल्या जवळच्या मित्राचा किंवा आई-वडिलांचा कॉलही ते घेत नाहीत. अनेक पालकांना आपल्या मुलांची ही 'मोबाइल वर्तणूक' ओळखीची असेल, त्याचा त्यांना त्रास होत असेल आणि चिंताही वाटत असेल; पण आहे हे असं आहे. - का? का करतात टिनेजर्स असं? कारण फोनवर 'बोलणं' ही संवादाची ठरलेली पद्धत त्यांना उपयुक्त वाटत नाही. बरेच टिनेजर्स आणीबाणीच्या, अडचणीच्या क्षणी किंवा जेव्हा त्वरित आधार हवा असतो त्यावेळीच फोन उचलतात. फोनऐवजी टिनेजर्सचा मुख्य भर असतो तो 'टेक्स्ट'वर. तोच त्यांचा 'संवाद' असतो. अर्थातच आळशीपणा त्याला कारणीभूत नाही, तर त्यांच्यासाठी संवादाची हीच प्रचलित रीत आहे. फोन उचलण्याची टाळाटाळ हा केवळ पिढीतला फरक नाही; संवादाच्या पद्धती, सामाजिक नियम आणि डिजिटल शिष्टाचारांमध्ये झालेल्या बदलांचं हे लक्षण आहे.
फोन उचलणं म्हणजे संबंधित ठिकाणी आत्ता, लगेच 'उपस्थित' राहणं, कोणतीही तयारी न करता थेट संवाद साधणं. याउलट टेक्स्ट स्वरूपातील संवादात अधिक नियंत्रण असतं. त्यामुळेच टिनेजर्स मोबाइलचा उपयोग बोलण्यासाठी नव्हे, तर बोलणं 'टाळण्यासाठी' करतात कधी, कोणाशी आणि कसा संवाद साधायचा, नात्यांतला समतोल कसा राखायचा, यासाठी त्यांना 'टेक्स्ट' किंवा व्हॉइस नोट अधिक महत्त्वाच्या वाटतात.