Maharashtra Election 2019 : Seasonal elections ... forget all for while | हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं

हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं

- सुधीर महाजन

खिल्लारे गुरुजी वैतागले होते. प्रचंड निराशेच्या गर्तेत ते सापडले होते. परिस्थितीसमोर हतबल झाले होते. ही अवस्था त्यांची एकट्याची नव्हती, तर नवजीवन शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी, भवानीमाता साखर कारखान्याचे नोकरदार, बाळराजे पतसंस्थेतील कर्मचारी, संग्रामराजे महाविद्यालयातील सर्वांचीच ही अवस्था होती. खिल्लारे गुरुजींची झोप उडाली होती, जेवण जात नव्हते. एकूण जगण्यावरची वासनाच उडाली होती. कारणही तसेच होते. पोरगा पुण्यात शिकत होता. मुलगी शाळेत होती. घरी आजारी आई, बेरोजगार भाऊ, असा कुटुंबाचा गाडा एकट्याच्या पगारावर ओढत असतानाच आदेश निघाला. या महिन्याचा पगार मिळणार नाही. आपले साहेब निवडणुकीला उभे असल्याने त्यांना मदत करण्यासाठी एक महिन्याचा पगार देण्याचा हा फतवा होता. दसरा, दिवाळी तोंडावर होते. पोराला पैसे पाठवायचे होते. आजारी आईची तब्येत खालावली होती. शिवाय कर्जाचा हप्ता, हातउचल, अशी तोंडमिळवणी करताना ते आधीच घायकुतीला आलेले. हे कमी की काय, तर साहेबांच्या मदतीसाठी पतसंस्थेतून प्रत्येकाच्या नावावर दोन-दोन लाखांचे कर्ज उचलले होते. त्या फॉर्मवर सह्या करताना त्यांच्या डोळ्यासमोर अंधारीच आली; पण उपाय नव्हता. पंधरा वर्षे विनाअनुदान काम केल्यानंतर आता कुठे हाती पगार पडायला सुरुवात झाली होती. कमी-अधिक प्रमाणात तालुक्यातल्या नोकरदारांची हीच अवस्था होती.

सविताबार्इंचा जीव टांगणीला लागला होता. बाई पतसंस्थेत कामाला होत्या. नवरा संस्थेच्या शाळेत २५ कि़मी.वर होता. घरात दोन चिल्ली-पिल्ली निवडणुकीची धमाल उडाली आणि साहेबांनी सगळ्यांनाच कामाला लावले. बाईच्या नवऱ्यावर तिकडेच पाच-गावांच्या प्रचाराची व बंदोबस्ताची जबाबदारी टाकली. मतदान झाल्याशिवाय गाव सोडायचे नाही, अशी सूचना दिली. इकडे बाईकडे नवरात्रामुळे गावागावांत हळदी-कुंकवाचे आणि ओटी भरण्याचे कार्यक्रम आखून ते पार पाडण्याची जबाबदारी टाकली. दिवसभरातल्या एका कार्यक्रमाला बाईसाहेब किंवा वहिनीसाहेब हजेरी लावत होत्या, म्हणून प्रत्येक कार्यक्रमात गर्दी जमवावी लागत होती. पार सकाळी जीप आली की, दिवसभरात पास-सात गावांत हळदी-कुंकू करून याव लागे. बायकांना हाता-पाया पडून गोळा करावे लागे. घरात आबाळ सुरू झाली. लहान पोरांकडे दुर्लक्ष व्हायला लागले. त्यांना सांभाळायला बाई ठेवली; पण रोजचा उशीर ठरलेला तशात पोरगी आजारी पडली; पण ओटी भरण्याचे काम थांबवता येत नव्हते आणि पोरगी आजारी पडली, अशी सबब सांगण्याची हिंमत नव्हती. कारण प्रश्न नोकरीचा होता. सिरसगावचा कार्यक्रम संपायला ४ वाजले. आता देशगव्हाण आणि बोरामणीचे हळदी-कुंकू आटोपूनच घरी जायचे होते. रात्री उशीर होणार. तापाने फणफणलेली पोरगी, वाट पाहून दमून झोपलेला पोरगा आणि वैतागलेली सांभाळणारी बाई, हे चित्र सविताबार्इंच्या डोळ्यासमोर आले आणि त्यांचा जीव गलबलला. डोळे भरून आले. मोठ्या कसोशीने त्यांनी हुंदका रोखला; पण रामू शिपायाच्या नजरेतून बार्इंची अवस्था लपली नाही. ‘आपण काय करू शकतो ताई; आपले भोग आपणच भोगले पाहिजेत.’ साहेबांची नाराजी काय असते, याची सर्वांना कल्पना होती. हळूच डोळे टिपत त्या जीपमध्ये बसल्या आणि देशगव्हाणकडे रवाना झाल्या.
———————-
संपतराव बँकेचे मॅनेजर; पण सगळीकडे भाऊसाहेब नावाने ओळखले जातात. रमेश शिरपे हा क्लार्क त्यांना विनवणी करीत होता. साहेब. ‘बाप सिरिअस आहे.’ दोन दिवस दवाखान्यात जाऊन येतो. भाऊसाहेबांनाही त्याची अवस्था पाहून भरून आले; पण नाइलाज होता. रमेशला सुटी देता येत नव्हती. कार्यकर्त्यांच्या रोजच्या खर्चाचा हिशेब ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी रमेशवर होती. निवडणूक म्हणजे आणीबाणीच्या प्रसंग. अशावेळी सगळं विसरावं लागतं बाबा, असे ते मनातल्या मनात म्हणत होते; पण बोलण्याची हिंमत नव्हती. ‘रजा मिळणार नाही.’ हे तीन शब्द अतिशय कोडरेपणाने त्यांनी कसेबसे उच्चारले आणि तेथून उठले.
————————
स्टाफरूममध्ये प्रत्येक जण अडचणीचा पाढा वाचत होता. आजूबाजूला कोणी नाही ना. याचा कानोसा घेत घाटगे, कांबळे, शिंदे, सोनवणे, राजपूत बाई यांचे बोलणे चालले होते. प्रत्येक निवडणुकीत गड्यासारखं राबावं लागतं आणि एक महिन्याचा पगारही द्यावा लागतो, अशी दबक्या आवाजातील चर्चा सुरू होती. तिकडे कोपऱ्यात जोशी गुरुजी खाली मान घालून गृहपाठाच्या वह्या तपासत होते. ‘जोशा, तू काहीच बोलत नाही?’ कांबळेच्या या प्रश्नावर जोशी म्हणाले ‘तुमचं ठीक आहे, माझ्या मागे आहे कोण?’
 

Web Title: Maharashtra Election 2019 : Seasonal elections ... forget all for while

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.