By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 05:49 IST
सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या पोटात काय, हे समजत नाही आणि तिकडे दिल्लीवाले थांग लागू देत नाहीत, ही भाजपवाल्यांची खरी गोची आहे!
बिरबलाची खिचडी; कधी पकेल कोण जाणे?
- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमतभाजपचे राज्यातील आठ-दहा बडे नेते तीन दिवस दिल्लीत जाऊन आले. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ताबदल होणार का याची लगोलग चर्चा सुरू झाली. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना अलीकडेच भेटले असल्याने त्यांच्या त्या भेटीचा संबंध भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीशी जोडला गेला. प्रदेशाध्यक्ष पदावरून चंद्रकांत पाटील यांना हटविणार अशाही बातम्या झळकल्या. त्या निमित्ताने काही नावे उगाच चर्चेत आली. संक्रांतीच्या आसपास पतंग आकाशात दिसतात, मीडियाचे पतंग मात्र वर्षभर उडत असतात आणि मग यथावकाश कटतातदेखील. दिल्लीला गेलेले नेते कोण, ते कोणाकोणाला व का भेटले याचा तपशील नीट तपासला असता तर पतंगबाजीची वेळ आली नसती. सत्ता बदलाची चर्चा अशी सगळ्यांसमोर होत नसते.चंद्रकांत पाटील पदावरून जावेत, अशी भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे आणि ते त्यांचा अजेंडा राबवत असतात; पण पाटील हे अमित शहा यांचा मजबूत खांब आहेत आणि जे त्यांना हटविण्यासाठी खरेच काही करू शकतात ते देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. फडणवीस आणि पाटील यांच्यातील कोणतेही मतभेद अद्याप समोर आलेले नाहीत. काही मुद्यांवर खटपट होते; पण फडणवीस त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते ती चेहऱ्यावरही येऊ देत नाहीत आणि दादा त्यांच्या चिरपरिचित हास्यातून कुठल्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू देत नाहीत. त्यामुळे दोघांचे प्रेम कायम असल्याचे दिसते. पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष असणे फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या अतिशय परवडणारे आहे. आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुटे, अशी काही नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चालविली गेली; पण ती चालविण्यापुरतीच होती. चंद्रकांत पाटीलच प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. खाली हाथ आये थे हम...राज्यातील भाजप नेते हे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रभारी सी.टी. रवी यांना भेटले. एका माहितीनुसार, महाराष्ट्रात सत्ताबदल व्हायला हवा, असा आग्रह मुंबईहून गेलेल्यांनी धरला. दिल्लीने त्यासाठी काहीतरी मदत करायला हवी, अशी भावनादेखील मांडली गेली; पण त्यांना स्पष्टच सांगण्यात आले की, ‘सत्ताबदलाचा कोणताही फॉर्म्युला आम्ही तयार करणार नाही वा तुम्हाला सुचविणार नाही. तुमची इतकीच इच्छा असेल तर तुम्हीच फॉर्म्युला तयार करा, आम्हाला सुचवा मग बघू. एक लक्षात ठेवा की, गेल्यावेळी (फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी) जसे तोंडावर आपटलात तसे पुन्हा आपटण्याची वेळ येऊ देऊ नका. पुन्हा आपटलात तर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था अन् नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील!’- त्यामुळे राज्यातील सत्ताबदलासंदर्भात या दिल्ली भेटीतून काही हाती लागते का, अशी आस राज्यातील भाजपच्या ज्या नेते-कार्यकर्त्यांना असेल त्यांनी तूर्त, ‘खाली हात आये थे हम, खाली हाथ जाएंगे’ हे गाणे गुणगुणायला हरकत नाही. राज्यातील सत्ताबदल ही बिरबलाची खिचडी होत चालली आहे. ती पकेल तेव्हा पकेल. कुण्यातरी भाजप नेत्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त दिला होता, ते आठवून हसू आले, एवढेच! भाजपच्या राज्यातील नेत्यांची जरा कुचंबणाच होते. फडणवीसांचा तळ त्यांना समजत नाही, त्यांच्या पोटात काय आहे हे इकडूनतिकडून खूप प्रयत्न करूनही कळत नाही. बरेच जण ‘सागर’वर जातात अन् निराश होऊन परततात. परवा चंद्रकांतदादा पत्रकारांना सांगत होते की, दिल्लीतील आमचे श्रेष्ठी जास्त बोलत नसतात. बघू, विचार करू, आणखी एकदा बसू एवढेच सांगतात. इकडे फडणवीस मनातले काही समजू देत नाहीत अन् तिकडे दिल्लीवाले थांग लागू देत नाहीत. अशा परिस्थितीत भडाभडा बोलण्याची सवय असलेल्या चंद्रकांतदादांना मात्र कसनुसे होत असेल. ते नेते आहेत; पण राजकारणी नाहीत, ही खरी अडचण आहे. एक मात्र नक्की की, महाराष्ट्रातील भाजपचे नेते यापुढे सातत्याने दिल्लीत जात राहतील. परवाची युनिट टेस्ट होती. पक्षवाढीसाठी काय काय केले जात आहे, केंद्रातील सत्तेचा फायदा राज्यात पक्षवाढीसाठी कसा करवून घेतला जात आहे, यासाठीची परीक्षा नियमितपणे घेतली जाईल. महाराष्ट्र युनिटकडून नियमितपणे ‘फीडबॅक’ घेतला जाईल. इथल्या नेत्यांचे होमवर्क वाढेल. केंद्रात असलेल्या राज्यातील मंत्र्यांना पक्षवाढीसाठी अधिक उत्तरदायी केले जाईल. परवा सगळे नेते नारायण राणे यांना भेटले तेव्हा राणेंनी ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांच्या विभागाचे कामकाज समजावून सांगितले त्यावरून काही वर्षांपासून तेच हे खाते सांभाळत आहेत की, काय असे नेत्यांना वाटले, महाराष्ट्रातील चारही नवीन मंत्री ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत. नारायण राणेंना कोकणात, कपिल पाटलांना कोकणातील आगरी-कोळी समाजाच्या पट्ट्यात, भारती पवार यांना आदिवासी भागात तर डॉ.भागवत कराड यांना मराठवाड्यात फिरविले जाईल. कराडांमुळे प्रीतम मुंडेंचे मंत्रीपद गेले म्हणून कराडांना बीड जिल्ह्यात घुसू देणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या; पण त्यात तथ्य नाही. कराड गोपीनाथ गडापासून यात्रा सुरू करणार असून, स्वत: पंकजा मुंडेच त्यांच्यासोबत असणार आहेत. एक आणखी बातमी अशी की, फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील दरी मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. डोळा मारला; पण प्रेम जमेल का? राज ठाकरे यांच्या मनसेला मुंबई, ठाण्यासह अन्य महापालिका निवडणुकीत सोबत घ्यायचे की नाही, यावरही दिल्लीत चर्चा झाली. त्यात असे ठरले की, मनसेला सोबत घेतल्याने अधिक फायदा होईल की, मनसे वेगळी लढल्याचा अधिक फायदा होईल, याचे वेगवेगळ्या पद्धतीने सर्वेक्षण केले जाईल आणि त्यातील निष्कर्षांच्या आधारे निर्णय घेतला जाईल. भाजपने मनसेला डोळा मारून ठेवला आहे; पण प्रेम जमेलच की नाही, याची काही खात्री नाही.