A Lesson for a Man Who Learned by Coronavirus | कोरोनाने शिकविला माणसाने लीन होण्याचा धडा

कोरोनाने शिकविला माणसाने लीन होण्याचा धडा

-डॉ. अश्विनी कुमार

सध्या देशापुढे उभ्या ठाकलेल्या कोरोना संकटावर मनातील विचार कागदावर उतरविताना सर्वात प्रथम ठळकपणे जाणवते ती निसर्गापुढे माणसाची हतबलता. सर्व पृथ्वी मुठीत आल्याचा टेंभा मिरविण्याच्या बेतात मानवी समाज असतानाच निसर्गाने माणसाला त्याची जागा दाखवून दिली आहे. एका अतिसूक्ष्म विषाणूपुढे संपूर्ण जगातील माणसांची सामूहित हतबलता मानवी क्षमतांच्या अमर्यादपणाबद्दलच्या गृहितकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण मानवी समाजाने अत्यंत लीनतेने घ्यावा असा फार मोठा धडा शिकविला आहे. तो म्हणजे निसर्ग आणि दैवी शक्त्तींपुढे माणसाचा टिकाव लागू शकत नाही.

‘कोविड-१९’च्या साथीने आपल्याला दिलेला दुसरा धडाही तेवढाच अस्वस्थ करणारा आहे. तो म्हणजे भविष्याचा व सुरक्षा आणि विकासासाठी अत्यावश्यक मानल्या गेलेल्या सामाजिक स्थैर्याचा काही भंरवसा देता येत नाही. या साथीने ज्या वेगाने व ज्या प्रमाणात विस्कोट केला आहे तो पाहता प्रस्थापित जागतिक व्यवस्थेच्या भक्कम पायाविषयीच शंका उपस्थित होते. त्याच बरोबर निसर्गाचा समतोल राखणे हा वाटाघाटी व वादांचा विषय असूच शकत नाही, या वास्तवाचे स्मरणही यामुळे आपल्याला होते.

हा विषाणू आपल्याला असेही सांगतो की, मानवी हालअपेष्टांची वाटणी होऊ शकत नाही. याने कोणा एकाची हानी न होता सर्वांचीच अधोगती होते. दारिद्र्य व प्रतिष्ठा एकत्र नांदू शकत नाहीत आणि न्याय व करुणा हिच समाजाची लायकी मोजण्याची खरी फूटपट्टी आहे. अजूनही जगात बंधुभाव, माणुसकी आणि मैत्रीभाव शिल्लक आहे व संकटाच्या काळातच माणुसकीची वीण अधिक घट्ट होते,याचीही जाणीव या निमित्ताने आपल्याला पन्हा एकदा झाली आहे. अशा प्रकारचे संकट कोणताही भेदभाव करत नाही. त्यामुळे अशा गंभीर संकटाच्या वेळीच प्रार्थनेवरील आपली श्रद्धा व एकोप्यावरील विश्वास दृढमूल होतो. म्हणूनच या संकटातून मानवी समाजाला बाहेर पडायचे असेल तर निरीच्छपणे दूर उभे राहून कोणीही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही.

देशवासीयांच्या समग्र सुखाचे मोजमाप करण्याऐवजी केवळ ‘जीडीपी’ वाढीचा हव्यास धरत राहणे यापुढेही चालू शकेल का, या प्रश्नावरही आपल्याला या संकटाच्या निमित्ताने अपरिहार्यपणे विचार करवा लागेल. आर्थिक विकास आणि ऐहिक सुबत्तेचा मानवी सुखात नक्कीच वाटा असतो. पण समग्र मानवी उत्कर्षांचे केवळ हेच मापदंड मानणे कितपत योग्य आहे? सध्याच्या टप्प्याला माणसाने ज्ञात इतिहासातील सर्वाधिक ऐहिक प्रगती केलेली असूनही आणि न भूतो अशा वेगाने व स्वरूपात तंत्रशास्त्रीय प्रगती झालेली असूनही ती अशा वेळी कुचकामी ठरत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या सामायिक भविष्याच्या मार्गाविषयी व जागतिकीरण हा सर्व अडचणींवरचा रामबाण उपाय आहे या गृहितकावर गांभीर्याने फेरविचार करण्याची वेळ आली आहे.

आर्थिक, राजकीय आणि तांत्रिक सामर्थ्यांच्या बाबतीत विषम पातळीवर असलेल्या राष्ट्रांच्या मिळून स्थापन झालेल्या बहुराष्ट्रीय संस्था न्याय्य अशी जागतिक व्यवस्था स्थापन करण्यासाठी परिणामकारक ठरू शकत नाहीत. शेवटी वंचितांच्या वाट्याला काय येते यावर जागतिकीकरणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पण म्हणून नितीमत्ता सोडून शासनाचे अधिकार अनिर्बंधपणे वापरण्याचे समर्थन करावे का, असाही प्रश्न पडतो. तसे होऊ दिले तर उदारमतवादी लोकशाही समाजाच्या उभारणीसाठी ज्या संवैधानिक संस्था मोठ्या कष्टाने उभारल्या त्या वाऱ्यावर सोडायच्या का, याचाही विचार करावा लागेल. सध्याचे संकट हे मानवी कल्पनाशक्तीचा थिटेपणा उघड करणारे आणि आपण आपले आयुष्य हवे तसे घडवू शकतो, ही आशा फोल ठरविणारे आहे.

अशा या हताशपणा व शंकास्पद वातावरणात देशाचे नेते या नात्याने पंतप्रधानांनी राष्ट्रीय भावनेला साद घालण्याची, योग्य दिशा दाखविण्याची, महत्वाचे धोरणात्मक निर्णय नागरिकांना पटवून देण्याची आणि त्यांच्या अंमलबजावणीत मनापासून सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याची गरज आहे. पण हे होण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करायच्या उपायांसोबतच सरकारच्या धोरणांबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल व अन्नपाणी आणि पैशांविना घरांपासून दूरवर अडकून पडलेल्या हजारो लोकांना तात्काळ दिलासा मिळेल यासाठीही सरकारने पावले उचलायला हवीत. धोरणांची अंमलबजावणी करताना नागरिकांची मानवी प्रतिष्ठा पायदळी तुडविली जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल. तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या असहाय लोकांवर पोलीस लाठ्या चालवित असल्याचे चित्र देशाचे हृदय व्याकुळ करणारे आहे.

देशाला अशा वेळी नैतिक धैर्यावर ठाम राहणाºया व मानवी प्रतिष्ठेशी पक्की बांधिलकी ठेवणाºया नेतृत्वाची गरज आहे. या कठीण काळातही देशातील नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी आणि शासन जनतेसाठी असते, जनता सरकारसाठीनाही याची ग्वाही देण्यासाठी देशाचे सर्व प्रकारचे सामर्थ्य पंतप्रधानांनी पणाला लावण्याची गरज आहे. खरे तर या परीक्षेच्या घडीला पूर्णपणे नव्या स्वरूपाच्या राजकारणाची गरज आहे. भूतकाळ समजून घेण्यासाठी, वर्तमानाचा सामना करण्यासाठी आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहासाचे कोणतेही सिद्धांत तोकडे पडतात, हे आपण जाणतो. पण ‘कोविड-१९’च्या निमित्ताने जगात आमूलाग्र परिवर्तन होईल आणि त्यातून अधिक मानवीय व शांततेची जागतिक व्यवस्था उदयास येईल, अशी अपेक्षा करू या.

Web Title: A Lesson for a Man Who Learned by Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.