ही आहे कायरा.. भारतातली पहिली ‘व्हर्चुअल इन्फ्ल्यूएन्सर’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:12 AM2023-11-09T09:12:56+5:302023-11-09T09:13:19+5:30

ही ‘माणसे’ नाहीत, या आहेत संगणकाने बनवलेल्या माणसाच्या ‘व्हर्चुअल’ प्रतिमा! आता या ‘प्रतिमा’च माणसांनी काय खावे-प्यावे, खरेदी करावे हे सांगू लागल्या आहेत!

Kyra- Indias first Meta influencer | ही आहे कायरा.. भारतातली पहिली ‘व्हर्चुअल इन्फ्ल्यूएन्सर’

ही आहे कायरा.. भारतातली पहिली ‘व्हर्चुअल इन्फ्ल्यूएन्सर’

- साधना शंकर
(लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी)

इन्स्टाग्रामवर तुम्ही कायराला फॉलो करता का? ती मुंबईची असून, स्वतःचे वर्णन ‘स्वप्नांचा पाठलाग करणारी, मॉडेल आणि प्रवासी’ असे करते. तिचे २.५ लाख फॉलोअर्स आहेत. देशातील पहिली आभासी इन्फ्लुएन्सर असल्याचा दावाही ती करते. समाजमाध्यमांच्या जगात तिच्यासारखे बरेच जण आहेत.  ही व्हर्चुअल व्यक्तिमत्त्वे त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करतात, संवाद साधतात आणि वस्तू खरेदी करायला सांगतात. एफ यू टी आर स्टुडिओज तर्फे हिमांशू गोयल यांनी या ‘कायरा’ची निर्मिती केली आहे. अमेरिकन टुरिस्टर, बडवाइजर आणि एमजी मोटर्स यांच्यासह अनेक ब्रॅन्डबरोबर कायराची व्यावसायिक भागीदारी  आहे. 

व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? कोण असतात हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर? - ती अर्थातच खरीखुरी माणसे नसतात. ॲनिमेटेड बार्बीप्रमाणे मनुष्यसदृश कुणी किंवा संगणकाने बनवलेल्या माणसांप्रमाणे दिसणाऱ्या आकृत्या असतात (सीजीआय - कम्प्युटर जनरेटेड इमेजरी). जगभर प्रसिद्ध पावलेले सीजीआय श्रेणीतील प्रतिमा-व्यक्तिमत्त्व म्हणजे लील मिकेला.  २०१६ साली ती लॉस एंजेल्समध्ये जन्माला आली. नायके, कॅल्विन क्लेन आणि सॅमसंगसारख्या ब्रांडशी भागीदारी करून तिने २.८ दशलक्ष फॉलोअर्स मिळवले. कोरियन ओ रोझी ऑगस्ट २०२० मध्ये विकसित करण्यात आली. तिने १०० पेक्षा जास्त प्रायोजकत्वाचे करार मिळाल्याची माहिती मिळते. तिला आता भावंडेही होऊ घातली आहेत. या सगळ्या संगणकाने निर्माण केलेल्या प्रतिमा आहेत. त्या प्रतिमा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर माणसाप्रमाणे वागता-बोलताना, गाता-नाचताना दिसतात.  त्यांची व्यक्तिमत्त्वे लक्ष्य गटाला आकर्षित करू शकतील अशा पद्धतीने ‘तयार’ केली जातात. हे डिजिटल अवतार पूर्णत:  काल्पनिक असतात. ते त्यांच्या प्रेक्षकांशी समाजमाध्यमातील पोस्ट, व्हिडीओ कॉमेन्टस आणि व्हर्चुअली अवतीर्ण होऊन संवाद साधतात.

खऱ्याखुऱ्या इन्फ्लुएन्सर्सपेक्षाही हे अवतार जास्त फायदेशीर ठरत असल्याचे निर्मात्यांच्या लक्षात आले आहे. व्हर्चुअल इन्फ्लूएन्सर्सची बाजारपेठ २०२८ सालापर्यंत २.८ अब्ज  ते ३.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होईल, असा अंदाज आहे. अधिकाधिक ब्रांड त्यांच्याकडे आकृष्ट होत आहेत. ब्रांड निर्मात्यांसाठी हे अवतार स्वस्त पडतात.  वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वापरता येतात आणि कोणत्याही वेळी ब्रांडशी जोडता येतात.  शिवाय, हे व्हर्चुअल इन्फ्ल्यूएन्सर म्हातारे होत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज नसते, व्यक्तिगत आयुष्यात ते नको त्या भानगडीत सापडत नाहीत, नखरे करत नाहीत.
हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर्स आगेकूच करत असल्याने काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. संगणकाने निर्माण केलेल्या या ‘प्रतिमा’ काळजी वाटेल इतक्या ‘खऱ्या’ दिसू लागल्या आहेत. ओह रोझी या व्हर्चुअल इन्फ्लुएन्सरला मानवी स्त्रीचे तब्बल ८०० हावभाव हुबेहूब दाखवता येतात.   अत्याधुनिक होत चाललेल्या तंत्रज्ञानाबरोबर आता हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर्स परस्परांशी संवाद साधू लागले आहेत. ते सोशल मीडियावरील पोस्टना प्रतिसाद देतात. प्रश्नोत्तरांच्या सत्रात सामील होतात.

हे अवतार आणि प्रत्यक्षातील माणसे यांच्यातील फरक ओळखणे दिवसेंदिवस कठीण होत असल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: जाहिरात क्षेत्राला ते जास्त सतावत आहेत. भारतात समाजमाध्यमांवरील इन्फ्ल्यूएन्सर्स तसेच वस्तू आणि सेवा ऑनलाइन विकणाऱ्या व्हर्चुअल अवतारांसाठी काही नियम जानेवारीमध्ये घालून देण्यात आले. ‘आम्ही जाहिरात करीत आहोत’ हे त्यांना सांगावे लागते. हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर्स जे लोक तयार करतात त्यांच्यातील पूर्वग्रह माध्यमातून प्रसारित होण्याचा धोका संभवतो. हुबेहूब माणसासारखे देह आणि जीवनशैली यामुळे तरुण वापरकर्त्यांवर त्यांचा अधिक  प्रभाव पडण्याची शक्यता असते. डिजिटल माणसांची ही यादी वाढत जाईल... म्हणजे मग या क्षेत्रातील ‘खऱ्या’ माणसांना पूर्णपणे बाजूला केले जाईल काय?- या प्रश्नाचे उत्तर देणे सध्यातरी कठीण आहे. पण, माध्यमांमध्ये खऱ्याखुऱ्या माणसांबरोबर हे व्हर्चुअल अवतार जागा व्यापत आहेत.  कृत्रिम बुद्धिमत्तेशी माणसांचा लढा आत्ता कुठे सुरू झाला आहे.

Web Title: Kyra- Indias first Meta influencer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.