कृष्णा-मोहम्मद साथसाथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 08:29 IST2025-08-06T08:25:02+5:302025-08-06T08:29:00+5:30
हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते.

कृष्णा-मोहम्मद साथसाथ!
वनडे किंवा टी-२० लढतींमधील एकेका चेंडूचा थरार, रोमांच फिका पडावा, अशी झुंज सोमवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या व अखेरच्या सामन्यात शेवटच्या दिवशी क्रिकेट रसिकांनी अनुभवली. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते.
शेवटच्या दिवशी विजयासाठी हव्या अवघ्या ३५ धावा इंग्लंडचे पाच फलंदाज सहज काढतील, अँडरसन-तेंडुलकर चषक पटकावतील, असेच अनेकांना वाटत होते. परंतु, क्रिकेटमधील अनिश्चितता सिद्ध करण्यासाठी भारतीय संघ भिडला होता. अकल्पित घडले. भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी, ६ धावांनी विजयाची नोंद झाली. ही मालिका इतिहासात नोंद होईल. पाचही कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत रंगले. आयपीएलचा थरार पाठीवर टाकून भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, तेव्हा अपेक्षा होती की, संघाने किमान स्मरणात राहील, अशी कामगिरी केली तरी भरपूर. कारण, गाैतम गंभीर हा नवा मुख्य प्रशिक्षक, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिल नवा कर्णधार. विराट कोहली, रवीचंद्रन अश्विन नाहीत. सगळे तरुण खेळाडू आणि सामना बॅझबाॅल रूपाने प्रत्येक चेंडू धोपटून काढणाऱ्या इंग्लंडशी. तेव्हा, हा दाैरा फारतर अनुभव देणारा असेल, असेच वाटले. मात्र, गाैतम गंभीरने पोरांना सांगितले, ही ‘यंग टीम’ नाही, तर ‘गन टीम’ आहे, ही खूणगाठ बांधा. तसेच घडले. तरुण तोफांनी असा धमाका केला की, इंग्लिश संघ पुरता निष्प्रभ झाला. ही तरुण पोरे पराभवाने खचली नाहीत. उलट अधिक जाेमाने उसळी मारली. परिणामी, लीड्समध्ये इंग्लंड, बर्मिंगहम येथे भारत, लाॅर्डसवर इंग्लंड, मँचेस्टरला सन्मानजनक बरोबरी आणि शेवटी ओव्हलवर भारताचा दिमाखदार विजय, असा विजयाचा लंबक हेलकावत राहिला.
झटपट क्रिकेट, चाैकार-षटकारांची आतषबाजी, गोलंदाजांची कत्तल यामुळे कंटाळवाणे वाटणाऱ्या कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळाली. पाच दिवसांची कसोटी हेच खरे क्रिकेट असे मानणारे आता छाती पुढे काढून चालतील. रोज तीस-तीस षटकांची तीन अशी पाच दिवसांत पंधरा सत्रे, क्रिकेट तंत्राचा कस, गोलंदाजांचा हात आणि फलंदाजांचे पाय यावर बेतलेले डावपेच, शारीरिक क्षमता, तसेच मानसिक कणखरपणाचा कस, इकडून तिकडे हेलकावणारे जय-पराजयाचे पारडे, असे संपूर्ण क्रिकेट म्हणजे कसोटी. त्यात हवी जिंकण्याची जिद्द, त्यासाठी प्रचंड परिश्रमाची तयारी व कमालीचा लढाऊ बाणा. तो दोन्ही संघांनी दाखविला. पाय जायबंदी असताना, ऋषभ पंत व हात गळ्यात असताना ख्रिस वोक्स संघासाठी मैदानात उतरला. २० जून ते ४ ऑगस्ट या पंचेचाळीस दिवसांत अनेक विक्रम नोंदविले गेले. खोऱ्याने धावा निघाल्या. भारताकडून बारा व इंग्लंडची नऊ, अशी तब्बल एकवीस शतके ठोकली गेली. १८ शतकी भागीदारी झाल्या. जाे रूट महान खेळाडूंच्या यादीत पुढे गेला, तर शुभमन गिल, ऋषम पंत दिग्गजांच्या पंगतीत विराजमान झाले. कर्णधाराकडून सर्वाधिक धावांच्या बाबतीत शुभमनने ग्रॅहम गुचला मागे टाकले. चार शतकांसह ७५४ धावांसह तो थोर फलंदाज डाॅन ब्रॅडमननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मालिकेत सर्वाधिक धावांचा सुनील गावस्कर यांचा विक्रम भलेही त्याला मोडता आला नाही; परंतु स्वत: गावस्करच म्हणाले की, कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळून शुभमनची कामगिरी सरस आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय मारा सांभाळताना मोहम्मद सिराजची कारकीर्द बहरली. एखाद्या चुकीने, क्षणाने खेळाडूची कारकीर्द संपते. जावेद मियांदादने ठोकलेल्या षटकाराने चेतन शर्माची कारकीर्द संपली. ओव्हलवर हॅरी ब्रुकचा झेल घेताना सिराज सीमारेषेबाहेर गेला तो असाच क्षण होता. त्या चुकीची भरपाई लढवय्या सिराजने थेट सामना जिंकून केली. भारतीय संघाच्या या कामगिरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, SENA नावाच्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया टापूमधील भारतीय संघाची धडक. वेगवान खेळपट्ट्यांच्या या टापूत सामना अनिर्णीत राखला, तरी मोठे समाधान. इंग्लंड दाैऱ्याने ती व्याख्या पार बदलून टाकली. तुमच्या रणांगणावरही आम्हीच जिंकू, भारतीय क्रिकेटची पताका उंचच उंच फडकत ठेवू, हा संदेश ‘गन टीम’ने क्रिकेटच्या जन्मभूमीवर कोरून ठेवला.