Khaki uniform with distinction endurance and a awareness of gratitude! | दुजाभाव सोसणारी खाकी वर्दी.. आणि कृतज्ञतेची जाणीव !

दुजाभाव सोसणारी खाकी वर्दी.. आणि कृतज्ञतेची जाणीव !

गणेशोत्सव आला, पोलीस बंदोबस्ताला उभा राहिला.. नवरात्र आले, पोलीस बंदोबस्तात व्यस्त झाला.. महापूर आला, पोलीस मदतीसाठी धावला.. निवडणूक आली, पोलिसांचा खडा पहारा सुरू झाला.. गुन्हा घडला, तिथे पोलीस पोहोचला.. अपघात झाला पोलीस पोहोचला. दंगेखोरांना धडा शिकवणारे पोलीसच ! स्वत:च्या कुटुंबाला वेळ न देता माजाच्या सुरक्षेची जबाबदारी उराशी बाळगून ती पार पाडणाराही पोलीसच! सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या दोन शब्दातील प्रत्येक अक्षराच्या अर्थ प्रत्यक्षात उतरवत पोलीस आपले कर्तव्य बजावतात. कर्तव्य बजावताना हजारो पोलिसांनी आपले बलिदान दिले. मात्र पोलिसांच्या या बलिदानाचा समाजाला नेहमीच विसर पडल्याची खंत वाटते.

देशसेवेचे कर्तव्य बजावण्याची शपथ घेऊन पोलीस आपल्या सेवेला सुरुवात करतो. पोलीस दलात सेवा बजावताना समाजाला घातक ठरणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला सीमेपलीकडचा शत्रू माहीत असतो, मात्र देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसाला त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या समाजातील विघातक प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांचा बीमोड करावा लागतो. यात दुर्दैवाने त्याला काही वेळा कौटुंबिक नाती, ज्ञाती बांधव, आपलेच मित्र वा सहकारी यांच्याशी सामना करावा लागतो.

सामाजिक सुरक्षितेला प्राधान्य देताना पोलिसांना काही वेळा जीव गमावण्याची वेळ येते. देशसेवेला वाहून घेताना दिलेले बलिदान यापेक्षा आणखी कोणते मोठे कर्तव्य असू शकते? समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी 
प्रामाणिकपणे पार पाडणारा पोलीस स्वत:ची कौटुंबिक जबाबदारी मात्र त्याच प्रामाणिकपणाने पार पाडू शकत नाही. सगळे जेव्हा उत्साहात सण, उत्सव सहकुटुंब साजरे करत असतात, तेव्हा पोलीस हातात लाठी घेऊन बंदोबस्तात दिवस घालवत असतो. ते पोलिसांचे कर्तव्यच आहे ते नाकारता येत नाही. हे कर्तव्य बजावण्याची शपथ घेऊनच ते या सेवेत रुजू झालेले असतात. ज्याप्रमाणे सीमेवर जवान देशाच्या शत्रूशी लढत असतो अगदी त्याचप्रमाणे पोलीस देशाअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीशी लढा देत असतो. दंगल झाली, आंदोलन झाले की पोलीस दगडफेकीसारख्या घटनांचा सामना करत ऊन-पावसाची तमा न बाळगता खडा असतो. महाराष्ट्राच्या नक्षली भागात झालेल्या हल्ल्यात कितीतरी पोलीस शहीद झाले आहेत. सव्वीस-अकराच्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात प्राणाची बाजी लावत पोलिसांनी कर्तव्य बजावले. या हल्ल्यात अतुलनीय असे शौर्य दाखवत पोलिसांनी इतिहास घडवला. सातारा जिल्ह्यातील तुकाराम ओंबळेंसारख्या पोलीस कर्मचाऱ्याने दहशतवादी अजमल कसाबला जिवाची बाजी लावून पकडले.

अशी बलिदानाची किती उदाहरणे द्यावीत? यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील १७ कर्मचारी शहीद झाले आहेत. अनेकदा घराबाहेर पडणाऱ्या पोलिसांना पुन्हा घरी कधी आणि कशा रूपात परत यावे लागेल याची कल्पना पण नसते. वरवर साध्या व किरकोळ वाटणाऱ्या छोट्या कारवाईवेळी संशयितांच्या हिंसक पावित्र्यामुळे पोलिसांना शारीरिक इजांना बळी पडावे लागल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पोलिसांनी अनेक वेळा धाडसी कामगिरी बजावली आहे. मात्र याच इतिहासात आणि वर्तमानात पोलिसांना समाजाकडून मिळणारी वागणूक पोलिसांची खंत वाढवणारी आहे. कर्तव्य बजावताना जीवन संपलेल्या पोलिसांना किंवा हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलिसांना समाजाकडून दुजाभावाची वागणूक मिळते ही खंत वाढत चालली आहे. पोलीस शहीद झाल्यास कर्तव्यावर असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्यास; त्याच्या कुटुंबीयांना योग्य वेळेत सेवा मिळत नाही. अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची संधी मिळवताना अक्षरश: पोलीस कुटुंबाची दमछाक होते. ज्याने उभे आयुष्य देशसेवेत घालवले त्या पोलिसांच्या कुटुंबाची फरपट डोळ्यात पाणी आणणारी असते. या शूरवीरांचे स्मरण स्फूर्तिदायक ठरावे यासाठी २१ ऑक्टोबर हा पोलीस शहीद दिन म्हणून आयोजित केला जातो. हे शौर्य इतिहासात गौरवशाली स्मृतिचिन्ह बनले पाहिजे. शहीद पोलीस जवानाच्या शौर्याची गाथा गायलाच हवी! 
 

Web Title: Khaki uniform with distinction endurance and a awareness of gratitude!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.