हे खोकल्याचे औषध की मुलांसाठी जालीम विष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 07:07 IST2025-10-08T07:06:12+5:302025-10-08T07:07:36+5:30
कोल्डरिफमुळे झालेले १६ मुलांचे मृत्यू ही एक भयानक घटना आहे. अनेक स्तरावरच्या चुका, त्रुटी या दुर्घटनेला जबाबदार आहेत. हे कुठवर चालणार?

हे खोकल्याचे औषध की मुलांसाठी जालीम विष?
-डॉ. अविनाश भोंडवे,
वैद्यकीय विश्लेषक, माजी राज्य अध्यक्ष, आयएमए
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून अनेक बालके एका संशयास्पद आजाराने बाधित झालेली आढळली. या मुलांना सर्दी, खोकला, ताप अशा तक्रारी होत्या. पण, त्यानंतर त्यांना श्वास घेणे कठीण होऊ लागले, म्हणून मध्य प्रदेशातील रुग्णालयात आणि नागपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या लक्षणांवरून हे ॲक्युट एनसिफॅलायटिस (मेंदूला येणारी सूज) या आजारामुळे घडल्याचे निदान झाले. परंतु, दोन - तीन दिवसांनी या मुलांची मूत्रपिंडे निकामी झाली, तसेच मेंदूला सूज आल्यावर केल्या जाणाऱ्या चाचण्याही नकारात्मक आल्या. शर्थीचे उपचार करूनही यातील १६ मुलांचा मृत्यू झाला आणि आणखी पाच मुले गंभीर अवस्थेत आहेत.
या मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी कोल्डरिफ नावाचे सर्दी, खोकल्याचे औषध देण्यात आले होते. त्यामुळे कोल्डरिफ या औषधाच्या रासायनिक तपासण्या करण्यात आल्या. त्या औषधात पॅरासिटमॉल, फेनिलेफ्रीन आणि क्लोरफीनॅरामाइन मॅलिएट या प्रमाणित औषधांसोबत डायएथिलीन ग्लायकॉल (डीईजी) नावाचा एक विषारी रासायनिक घटक सापडला.
डायएथिलीन ग्लायकॉल हे मानवांसाठी औषध म्हणून वापरले जात नाही. ते कारखान्यांमधील यंत्रांसाठी अँटिफ्रीझर (इतर द्रव गोठू नये म्हणून) रसायन असून, ब्रेकिंग फ्लुइड्स, नेलपेंट्स अशांमध्ये वापरले जाते. या औषधाच्या एसआर-१३ या बॅचमध्ये या रासायनिक पदार्थाचे प्रमाण ४८.६ टक्के इतक्या घातक प्रमाणात आढळले.
कोणतेही औषध तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे घेतल्यावर, ते रक्तात शोषले जाते. त्यातला अनावश्यक किंवा दूषित भाग मूत्रपिंडांतून मुत्राद्वारे उत्सर्जित केला जातो. कोल्डरिफमध्ये डीईजीची मात्रा मूत्रपिंडांच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याने, या बालकांची मूत्रपिंडे तत्काळ बंद पडली (ॲक्युट रीनल फेल्युअर) आणि अनेक गुंतागुंतीचे शारीरिक विकार निर्माण होऊन ही बालके मृत्युमुखी पडली.
डायएथिलीन ग्लायकॉल हे एक विषारी द्रावक आहे, अशा औषधांमधून किंवा अन्य कारणांनी ते शरीरात घेतले गेल्यास, सुरुवातीला उलटी, मळमळ, तोंडात खूप लाळ सुटणे, पोटात कळा येऊन दुखणे, डोके गरगरणे, ताप येणे अशी प्रारंभिक लक्षणे दिसतात. बऱ्याचदा पालक या लक्षणांना फार महत्व देत नाहीत. ही औषधे घेत राहिल्यास, यकृत, किडनी, मेंदू यामध्ये कमालीचा दाह निर्माण होतो आणि या महत्त्वाच्या अवयवांच्या पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होतात. परिणामतः चयापचय क्रियेवरही गंभीर आणि प्राणघातक परिणाम होतात. लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा ती अजिबात न होणे, अंगावर सूज येणे, रक्तातील क्षारांचे प्रमाण असंतुलित होणे, श्वास मंदावणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसतात.
अशा विषारी कफ सिरपांमुळे लहान बाळे दगावण्याच्या घटना, यापूर्वी भारतात जम्मू-काश्मीर, मुंबईमध्ये आणि झाम्बिया, उझबेकिस्तान या देशात घडलेल्या आहेत. बनवलेली औषधे प्रमाणित आहेत का? त्यातल्या घटकांचे प्रमाण योग्य आहे का? औषधांचे काही नवे दुष्परिणाम आढळू लागले आहेत का? या गोष्टींचे नियमन करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असते. बनवलेल्या प्रत्येक औषधाच्या बॅचची, दिलेल्या जागतिक मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक वेळी चाचणी होतेच असे नाही. अशा दुर्लक्षामुळे काही वेळा काही अप्रमाणित, औद्योगिक दर्जाचे, विषारी अशुद्धता असलेले घटक औषधात वापरले गेले असले, तरी ते खपून जातात.
भारतात २०२३ नंतर सिरप्सच्या निर्यातीसाठी अत्यंत कडक चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. पण, देशांतर्गत होणाऱ्या विक्रीसाठी तशी कडक अंमलबजावणी होत नाही. औषध निर्मात्यांनी बनवलेल्या औषधाच्या कोणत्या बॅचेस कुठे विकल्या गेल्या? कोणत्या विक्रेत्यांनी, वितरकांनी आणि रिटेलर्सनी त्या घेतल्या? यांच्या सविस्तर नोंदी, काटेकोरपणे ठेवण्याच्या अत्यावश्यक प्रक्रियेत नेहमीच त्रुटी आढळून येतात. कोणत्याही औषधात दोष आढळल्यावर, त्यावर तातडीने निर्बंध न घालणे, दोषी पक्षांवर कडक कारवाई न करणे, याबाबतच्या शिक्षा कठोर नसणे; राज्ये, केंद्र, औषध नियंत्रण संस्था यांच्यात आवश्यक तो समन्वय तत्काळ न होणे, जनतेला सार्वजनिक पातळीवर जागृती करण्याबाबत उशीर करणे, यामुळे अशा घटना होत राहतात आणि जनतेवर त्यांचे दुष्परिणाम होणे थांबत नाही.
या पार्श्वभूमीवर पालकांसाठी काही सूचना:
१. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे देणे टाळा. दुकानातून परस्पर औषधे घेणे योग्य नाही.
२. पॅकिंग, बॅच नंबर, औषधाच्या वैधतेची मुदत (एक्सपायरी) नीट तपासावी. शंकास्पद बॅचची औषधे वापरू नयेत.
३.औषध दिल्यावर मुलाच्या आजारात, वेगळी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. उलट्या, मळमळ, लघवी कमी होणे, पोट दुखणे अशा लक्षणांबाबत विलंब न करता डॉक्टरांकडे जावे.
४. सर्दी, नाक गळणे, ताप, खोकला अशांमुळे शरीरात निर्जलीकरण होते. त्यासाठी मुलांना पुरेसे पाणी, सरबत, ओआरएस देणे आवश्यक असते.
कोल्डरिफमुळे झालेले १४ मुलांचे मृत्यू ही एक भयानक घटना आहे. पण, केवळ औषध उत्पादकांच्या नव्हे, तर औषध नियामक सरकारी संस्था, गुणवत्ता नियंत्रण, वेळीच प्रतिसाद न देणे, सार्वजनिक माहिती त्वरित प्रसृत न करणे अशा अनेक पातळ्यांवर चुका झाल्या आहेत. जनतेने याबाबत सजग राहणे आवश्यक आहे.
avinash.bhondwe@gmail.com