इराणचा 'लिटल इंडिया'वर भीषण हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 05:39 IST2026-03-27T05:38:25+5:302026-03-27T05:39:40+5:30

या हल्ल्यात मुलांसह शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

iran brutal attack on little India in israel | इराणचा 'लिटल इंडिया'वर भीषण हल्ला

इराणचा 'लिटल इंडिया'वर भीषण हल्ला

इराण आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांपासून अत्यंत चांगले आहेत. सध्या इराण आणि इस्त्रायल-अमेरिका युद्धातही या संबंधांत कटुता आलेली नाही. असं असतानाही इराणनं 'लिटल इंडिया'वर घातक हल्ला का करावा? इराणनं या ठिकाणी नुकतेच भीषण बॅलेस्टिक मिसाइल हल्ले केले आहेत. त्यामुळे लिटल इंडियाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. शिवाय या हल्ल्यात मुलांसह शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

इराणनं 'लिटल इंडिया'वर केलेल्या या हल्ल्यामुळे तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, पण थांबा, हे 'लिटल इंडिया' भारतात नाही, तर इस्त्रायलमध्ये आहे। तेथील डिमोना या शहराला 'लिटल इंडिया' म्हटलं जातं, कारण या ठिकाणची बहुतांश परिस्थिती भारतासारखी आहे. डिमोनामध्ये मोठ्या प्रमाणात, सुमारे ७,५०० भारतीय नागरिक राहतात. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे तीस टक्के आहे. 

या नागरिकांची मुळं महाराष्ट्राशी जोडलेली आहेत. ठिकठिकाणी भारतीय दुकानं आहेत. अनेक हॉटेल्समध्ये भारतीय खाद्यपदार्थ मिळतात आणि दुकानांमधून सोनपापडी, गुलाबजाम, पापडी चाट, तसंच भेळपुरीसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात. हे पदार्थ तिथे प्रचंड लोकप्रिय आहेत. येथे अनेक जण अगदी अस्खलीत आणि सराईतपणे मराठी बोलतात. काही जण हिंदीही बोलतात. आपल्याकडे जसे क्रिकेटचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत, तसंच इथेही क्रिकेटवेड्यांची संख्या कमी नाही.

पण इराणनं 'लिटल इंडिया' म्हणजेच डिमोनावर बॅलेस्टिक मिसाइलनं हल्ले केले, कारण इस्त्रायलला थेट प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. याच शहराजवळ इस्रायलचं सर्वात मोठं न्यूक्लियर रिसर्च सेंटर आहे. यावर हल्ला केला, तर इस्त्रायलचं कंबरडं मोडेल आणि त्यांच्या संरक्षण सज्जतेला मोठा हादरा
बसेल, या कारणानं इराणनं डिमोनावर हल्ले केले.

तेल अवीवमधील भारतीय दूतावासानुसार भारतातून इस्रायलमध्ये जाणाऱ्यांची सर्वांत मोठी लाट १९५० आणि १९६०च्या दशकात आली होती. यातील बहुतेक लोक महाराष्ट्रातील बेने इस्रायली समुदायातील होते. याशिवाय काही लोक केरळ (कोचिनी यहुदी) आणि कोलकाता (बगदादी यहुदी) येथूनही गेले होते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये मिझोराम आणि मणिपूरमधील 'बेने मेनाचे' समुदायातील लोकही इस्रायलमध्ये स्थायिक होण्यासाठी जात आहेत. 

ते प्रामुख्यानं हिऱ्यांचा व्यापार, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि वृद्धांची देखभाल अशा क्षेत्रांत कार्यरत आहेत. केवळ खाद्यसंस्कृतीमुळेच नव्हे तर परंपरा, सण आणि संस्कृतीमुळेही हे शहर इस्त्रायलमध्ये असलं तरी ते संपूर्णपणे भारतीय आहे. सगळे भारतीय सण येथे मोठ्या धामधुमीत मनवले जातात. केरळमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला ओणम सण आणि संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहात साजरी होणारी दिवाळी इथेही तितक्याच जोरदारपणे साजरी केली जाते. दिवाळीच्या वेळी बेने इस्रायल आणि बगदादी यहुदी एकत्र येतात. भारतीय सणांच्या निमित्ताने या शहरात कार्यक्रम होतात.

नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोजित इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये महिनाभर चाललेल्या चित्रपट प्रदर्शनांना मोठी गर्दी झाली होती, तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या पहिल्या भारतीय संगीत महोत्सवातील सर्व तिकीटं हातोहात विकली गेली होती. भारतीय वंशाचे लोक हैफा, तेल अवीव, अराद, नेतन्या आणि अफुला यांसारख्या शहरांमध्येही राहतात.
 

Web Title : ईरान का इस्राइल के 'लिटिल इंडिया' डिमोना पर मिसाइल हमला: विवरण

Web Summary : ईरान ने इस्राइल के डिमोना शहर पर मिसाइलों से हमला किया, जिसे 'लिटिल इंडिया' कहा जाता है। 7,500 भारतीय नागरिकों के घर इस शहर को परमाणु अनुसंधान केंद्र के निकट होने के कारण निशाना बनाया गया। हमले में बच्चों सहित सौ से अधिक लोग घायल हुए।

Web Title : Iran's Missile Attack on Israel's 'Little India' Dimona: Details

Web Summary : Iran attacked Dimona in Israel, nicknamed 'Little India', with missiles. This city, home to 7,500 Indian citizens, was targeted due to its proximity to a nuclear research center. The attack injured over a hundred people, including children.