इराणबद्दल आपण गप्प बसलो, तर काळ सोकावेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 05:59 IST2026-03-05T05:58:37+5:302026-03-05T05:59:18+5:30
‘बळी तो कान पिळी’च्या जगात आपण बलवानाचीच हांजी हांजी केली, तर इज्जत जाईलच; पण एक दिवस ‘त्या’ बलवानाची धाड आपल्यावरच पडेल.

इराणबद्दल आपण गप्प बसलो, तर काळ सोकावेल!
- योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया
‘हे पाहा. नैतिकता, आदर्श, तत्त्व या गोष्टी आपल्या घरात, समाजात ठीक आहेत. परराष्ट्र धोरण असं चालत नसतं. तिथं प्रत्येकाला स्वतःचं राष्ट्रीय हित साधायचं असतं. आपल्यालाही तसंच करावं लागेल. आपलं सरकार नेमकं तेच करतंय. तुम्ही उगाच उपदेश करत बसू नका.’ ही या संभाषणाची सुरुवात नव्हती. नेहमीप्रमाणे सकाळच्या फेरफटक्यात आमची गाठ पडली होती. टी-२० सामने आणि युद्ध यावर बोलणं सुरू झालं. धावा आणि विकेट्सची व्हावी तशी क्षेपणास्त्रं आणि कलेवरांची मोजदाद सुरू होती. बुमराहला स्विंग आणि यॉर्कर कसा टाकावा हे शिकवणारे लोक आता ट्रम्पसाहेबांना हवाई युद्धाचे आणि पश्चिम आशियाला कूटनीतीचे धडे देऊ लागले होते. थंड सुरात इराणचा विनाश आणि तेलाच्या किमती यावर चर्चा चालू होती.
माझा सूर काहीसा कडवट लागला असणार. मी म्हणालो, ‘जरा विचार करा. इराणच्या जागी आपण असतो आणि इतर कोणी अशाप्रकारे चर्चा करत असते तर आपल्याला कसं वाटलं असतं? कुणाचा तरी सर्वनाश होत असताना आपण अशी चवीने चर्चा करणं योग्य आहे का?’ त्यांना माझं हे बोलणं रुचलं नाही. ‘इराणची तुलना भारताशी कशी करता येईल? तिथे कट्टरपंथी मुल्लांची राजवट आहे. तिथल्या जनतेलाच या हुकूमशाहीतून मुक्त व्हायचंय. गुपचूप अणुबॉम्ब बनवताहेत ते. त्यांना रोखायला नको?’
असले युक्तिवाद ऐकून ऐकून कान किटले होते माझे. इराणमध्ये लोकशाही आहे की नाही, याच्याशी अमेरिकेला सोयरसुतक नव्हतं. १९५३ साली अमेरिकेच्या सीआयएनेच इराणमधील पहिली लोकशाही संपुष्टात आणून इराणवर राजेशाही लादली. त्याविरोधात तिथे इस्लामी क्रांती झाली. तेव्हा, निदान अमेरिकेने तरी या विषयावर तोंड उघडू नये. इस्लामच्या नावाखाली चालू असलेल्या प्रशासनाबद्दल तेथील जनतेत प्रचंड असंतोष आहे. पण म्हणून त्या देशात मनमानी हस्तक्षेप करण्याचा अधिकार अमेरिकेला मिळतो की काय? अमेरिकेच्या मनात आलं की व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणायचं, इच्छा झाली की इराणच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करायची. आपण हे मूकपणे कसं पाहू शकतो? इराणने आपल्यासमोर ताठ मानेने वावरावं हेच मुळात ट्रम्प यांना मंजूर नसल्यामुळेच तिथे बळजबरीने सत्तापालट करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
अणुबॉम्ब वगैरे सपशेल बनाव. इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळपाससुद्धा पोहोचलेला नाही असं अमेरिकेच्याच संरक्षण खात्याने कबूल केलं आहे. गेल्यावर्षी इराणवर हल्ला केल्यानंतर, इराणचा अणुबॉम्ब प्रकल्प आपण नेस्तनाबूत केल्याची घोषणा खुद्द ट्रम्प यांनीच केली होती. ‘आपण आता किंवा पुढे कधीही अणुबॉम्ब बनवणार नाही’ अशी लेखी हमी द्यायला इराण तयार होता असं मध्यस्थी करणाऱ्या बहारिनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. गुपचूप बनवल्या जात असलेल्या अणुबॉम्बची एवढी काळजी अमेरिकेला वाटत असेल तर तिने सर्वप्रथम इस्रायल आणि पाकिस्तानवर हल्ला चढवायला हवा. त्यांच्याकडे तर अवैध अण्वस्त्रांचा साठाच आहे. खरं तर स्वतःकडे हजारो अण्वस्त्रं असणारी अमेरिका कोणत्या तोंडाने इतरांचा पहिला बॉम्ब रोखू शकते?
कमीतकमी भारताने तरी या ढोंगात सामील होऊ नये. आपल्या अणुबॉम्बला जागतिक मान्यता मिळत नव्हती तेव्हा उपदेशाचे हेच डोस भारतालाही पाजले जात. त्यावेळी ‘आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण?’ असंच आपण जगाला ठणकावत असू. कालपरवापर्यंत आपले पंतप्रधान इराण आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचे दाखले देत होते. कठीणप्रसंगी पश्चिम आशियातील जे देश भारताच्या उपयोगी पडले त्यात इराण एक होता. त्यांच्या बाजूने उभे राहण्याची हिंमत होत नसेल तर निदान त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येबद्दल शोक तरी व्यक्त करायचा. एवढं तर अमेरिकेचे पिट्टू असलेल्या पाकिस्ताननेही केलं. शिष्टाचार म्हणून साधे निवेदनही भारताला देता येऊ नये, अशी कोणती कळ ट्रम्प यांच्या हाती आहे?... पूर्वी गरीब होता माझा देश, पण अशी मान झुकवत नव्हता. अमेरिकेच्या सातव्या आरमारासमोर आपण अगदीच किरकोळ होतो. तरीही इंदिरा गांधी निक्सनना रोखठोक सुनावू शकत होत्या. कुठे गेला तो आमचा दृष्टिकोन? कुठे गेले ते आदर्श?
जे कुटुंबात, समाजात घडतं, तेच विश्व नावाच्या कुटुंबातही घडतं. केवळ नैतिकता आणि आदर्श यांच्याच जोरावर घर चालत नाही. उलट नैतिकता आणि आदर्श नसतील तर जगही चालू शकत नाही. आज अमेरिकेच्या गुंडगिरीला मोकळं रान दिलं, तर उद्या चीनही सोकावेल. चीनचा डोळा प्रथम तैवानवर असेल. पण कुणी सांगावं, एक दिवस आपलीही पाळी येऊ शकेल. आदर्शांचा हात सोडूनच दिला तर उद्या आपल्या पाठीशी कोण उभे राहील? ‘बळी तो कान पिळी’ ठरवणाऱ्या जगात आपण बलवानाचीच हांजी हांजी करत बसलो, तर इज्जत तर जाईलच; पण एक दिवस बलवानाची धाड आपल्यावरच पडेल.
yyopinion@gmail.com