I .. sorry! We couldn't save you. | आई.. माफ कर ! आम्ही तुला वाचवू नाही शकलो..

आई.. माफ कर ! आम्ही तुला वाचवू नाही शकलो..

 -सचिन जवळकोटे

हॉस्पिटलमधून हाकलून दिलेल्या आजारी आईनं भररस्त्यावर हतबल मुलाच्या कुशीत जीव सोडला, तेव्हा संवेदनशील लेकरांच्या हृदयातून आर्त हुंकार निघाला.. ‘आई.. माफ कर !’

मध्यरात्रीच्या अंधारात बघ तुझे डोळे
कसं मोठ्या आशेनं चमकले..
एवढा मोठा माझा भारी ल्योक
मला नक्की वाचवेल, असं तुला वाटले..
पण नाही गं आई.. तुला वाचवू शकलो
तुझे शेवटचे आचके गपगुमान बघत बसलो..
गाडी, घोडा, बंगला सारं काही पायथ्याशी
तरीही कसा आईविना भिकारी बनलो..

गावातल्या दवाखान्याचे दरवाजे बंद झाले
म्हणून मोठ्या आशेनं आपण सोलापुरात आलो..
पण उपचार करण्यापूर्वीच ‘गॉन केस’ म्हणत
हाकलून देणाऱ्या डॉक्टरला पाहून हादरलो..
भर मध्यरात्री भर रस्त्यावर रंगभवन चौकात
तू माझ्यासमोर तडफडत राहिली..
स्मार्ट सिटीच्या स्मार्ट स्ट्रीट लाइटखाली
केविलवाण्या डोळ्यांतून अवहेलना झिरपली..
 
बंद होत चाललेल्या तुझ्या पापण्यांतून
जगावरचा विश्वास कसा उडत चालला होता... कारण ‘वन डे’ व्हेंटिलेटरच्या बिलापेक्षा
सात दिवसांचा बकरा दवाखान्यात मोठा होता..
पेशंटचं बॅकग्राउंड पाहून कॅल्क्युलेशन करणारं प्रोफेशनल मॅनेजमेंट मेडिकल लॉबीत घुसलेलं..
प्रेतांच्या गर्दीला फुल सीझन म्हणणाऱ्यांना
पाहून कसायाचं सत्तूरही क्षणभर लाजलेलं..

एक माजी आमदार म्हणे रात्रभर
ऑक्सिजनसाठी ठाण मांडून बसलेले..
लोकांना वाटलं किती ही सामाजिक बांधीलकी,
मात्र ते स्वतःच्याच हॉस्पिटलसाठी धडपडलेले..
‘दसपट रिटर्न’ म्हणत मेडिकल लाइनमध्येही
अंगठेछाप मंडळी सेफ इन्व्हेस्टमेंट करताहेत..
धंदेवाईक दलालांची टोळी बनवून इथंही
गलिच्छ राजकारणाचा अड्डा भरवताहेत..
 
मतांची भीक मागत गल्लीबोळांत फिरणाऱ्या
नेत्यांनी दुसऱ्या लाटेची दखल न घेतलेली..
‘पॉझिटिव्ह’वाल्यांना ‘निगेटिव्ह’ उत्तर देत
पालकमंत्र्यांची गाडीही होम डिलिव्हरी झालेली..
समन्वयाचा अभाव अन् नियोजनाची चूक
शोधण्यासाठी आत्मचिंतनाची गरज भासलेली..
कागदी आकड्यांमध्ये रंगलेल्या अधिकाऱ्यांची
आता झोप उडविण्याची वेळ आलेली...

दुष्काळ शब्दाची चटक लागलेल्या जिल्ह्यात
ऑक्सिजन, इंजेक्शनचीही टंचाई जाणवते..
अन्याय सहन करण्याची सवयच झालेली
जनता आता लसीशिवायही जगू शकते..
शेतकऱ्यांच्या जिवावर गबरगंड बनलेले
साखरसम्राट अशावेळी कुठं गायब झाले..
एखादं उपचार केंद्र उघडलं असतं तर
बाया-बापड्यांनी आशीर्वादही असते दिले..

नगरसेविकेच्या लसीवरून राजकारण
करणाऱ्याचं तोंड जनतेसाठी का बंद असतं..
फोटोपुरतं पब्लिकमध्ये येणाऱ्या आमदारांचं
घरात बसून संपर्क अभियान जोरात चालतं..
जावळ-बारश्याला हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी
अशा मोठ्या संकट काळात कुठं लपले..
फुकटच्या इंजेक्शनचाही शो करून
पत्रकबहाद्दरांनी जबरदस्त क्रेडिट हाणले..

औषधांच्या काळ्या बाजारात तुंबड्या भरणाऱ्यांनी
जिवंतपणी तर बिचाऱ्या रुग्णांकडून लाटलं..
मेल्यानंतरही स्मशानभूमीतील सरणासाठी
तथाकथित समाजसेवकांनी भरपूर लुटलं..
म्हणूनच आई.. आम्हाला माफ कर..
आम्ही तुला वाचवू नाही शकलो..
मुर्दाडांच्या दुनियेत माणुसकी मरताना
तडफडत कबूल करतो की होय.. आम्ही हरलो !

Web Title: I .. sorry! We couldn't save you.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.