घोडेस्वार तरबेजच हवा, 7 भावी डॉक्टरांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:37 AM2022-01-28T05:37:50+5:302022-01-28T05:38:45+5:30

गडकरींनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत रस्ते महामार्गांनी जोडला. रस्ते विकासाचा हा वेग थक्क करणारा आहे.

Horse riders need training, many questions after the death of 7 future doctors | घोडेस्वार तरबेजच हवा, 7 भावी डॉक्टरांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न

घोडेस्वार तरबेजच हवा, 7 भावी डॉक्टरांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न

Next

मित्राचा वाढदिवस साजरा करून वर्ध्याला परत येत असताना अनियंत्रित कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या सात भावी डॉक्टरांचा करुण अंत झाला. या भीषण अपघाताचे वृत्त वाचून अनेक जण हळहळले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली. भरधाव असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण काही असो, सात विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेला. असे अपघात आता नित्याचीच बाब झाली आहे. गेल्या काही वर्षांत देशातील रस्त्यांचा दर्जा सुधारला. राष्ट्रीय महामार्गाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. अनेक राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. दररोज किमान ३५ किलोमीटर या वेगाने रस्त्यांची कामे होत आहेत. दळणवळण प्रचंड वाढले आहे. दोन-अडीचशे किमी अंतर पार करण्यासाठी जिथे पूर्वी किमान सहा-सात तास लागायचे, तिथे आता अवघे तीन-चार तास लागतात. याचे श्रेय अर्थातच, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना द्यावे लागेल.

गडकरींनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत रस्ते महामार्गांनी जोडला. रस्ते विकासाचा हा वेग थक्क करणारा आहे. एकीकडे रस्ते सुधारले आणि दुसरीकडे वेगवान वाहनेही रस्त्यांवर आली. या दुहेरी गतिमुळे प्रवास सुखकर झाला, मात्र त्याच वेळी वाहनांच्या गतीवरील नियंत्रण सुटू लागल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले. राष्ट्रीय क्राईम ब्युरोच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, अंगाचा थरकाप उडेल. दरवर्षी भारतात सुमारे अडीच लाख अपघात होतात आणि त्यात लाखभर लोक जीव गमावतात. जगाच्या तुलनेत आपल्याकडे केवळ एक टक्का वाहने आहेत. मात्र अपघातांची संख्या अधिक आहे. देशभरात दर ताशी ५३ अपघात होतात. प्रति चार मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये १८ ते ४५ या वयोगटातील सुमारे ७० टक्के लोक असतात. याचाच अर्थ, रस्ते अपघातात दरवर्षी शेकडो तरुण आपला जीव गमावून बसतात. ही राष्ट्रीय हानी आहे. भारत हा तसा तरुणांचा देश आहे. परंतु ही तरुणाई अतिवेगाचे बळी ठरत असेल तर त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या थायलंड, श्रीलंकासारख्या देशात रस्ते अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. युरोप-अमेरिकेत तर त्याहून कमी. २०२४ पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. त्यासाठी देशभरातील ५० हजार ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. रस्ते अपघाताची कारणमीमांसा केली तर काही बाबी ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे, आपल्याकडे असलेला वाहन साक्षरतेचा अभाव. सुरक्षित प्रवासासाठी केवळ वाहन चालविता येणे पुरेसे नसते. सध्याची वाहने अत्याधुनिक आहेत. स्वयंचलित आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे वाहनांची गती वाढली आहे. अशा वाहनांच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान वाहनचालकाला असणे गरजेचे असते. मात्र, त्याबाबतीत कमालीची बेफिकिरी दिसून येते.

रस्त्यांवरच्या चिन्हांची माहिती असणे आणि वाहन मागे-पुढे करता येणे, एवढ्याशा पात्रतेवर आपल्याकडे वाहन चालविण्याचा परवाना मिळतो! शिवाय, रस्त्यांवर वाहने आणणाऱ्या प्रत्येकाकडे परवाना असेलच याचीही शाश्वती नसते. वाहन चालविणाऱ्याने मद्यप्राशन करू नये, या नियमाचे तर सर्रास उल्लंघन होताना दिसते. वर्ध्यातील अपघातातही चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय आहेच. साधारणपणे आपल्याकडे मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास अपघातांचे प्रमाण अधिक आहे. चालकावर झोपेचा अंमल असणे, विनाथांबा, विनाविश्रांती गाडी चालविणे अशी कारणेही समोर आली आहेत. रस्ते सुरक्षिततेचे उपाय योजत असताना वाहनचालकांना प्रशिक्षण देणे, महामार्ग पोलिसांकडे अत्याधुनिक यंत्रणा असणे, नियमभंगासाठी कठोर शिक्षा ठोठावणे तितकेच गरजेचे झाले आहे. चांगले रस्ते आणि अत्याधुनिक वाहन असताना वेगावर नियंत्रण कशासाठी? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. परंतु, घोडेस्वार तरबेज असेल तरच तो बेफाम घोड्याला नियंत्रित ठेवू शकतो. हाच नियम वाहनचालकांना देखील लागू पडतो. लाखो रुपये किमतीचे वाहन आपण कोणाच्याही स्वाधीन करतो आणि वाहनासह लाख मोलाचा जीवही गमावून बसतो. हे टाळायचे असेल तर तरबेज घोडेस्वार तयार करणे हाच उपाय दिसतो.

Web Title: Horse riders need training, many questions after the death of 7 future doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.