गावकऱ्यांचे संकेत,...तोपर्यंत निकालांना ‘एक्झिट पोल’ समजण्यास हरकत नसावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:58 AM2023-11-07T09:58:05+5:302023-11-07T09:58:33+5:30

ग्रामीण भागात मराठा समाजाची लक्षणीय लोकसंख्या असतानाही यश मिळाल्याने भाजप नेतृत्वाचा जीव नक्कीच भांड्यात पडला असेल.

Hints from the villagers, ... till then the election results should not be considered 'exit poll'! | गावकऱ्यांचे संकेत,...तोपर्यंत निकालांना ‘एक्झिट पोल’ समजण्यास हरकत नसावी!

गावकऱ्यांचे संकेत,...तोपर्यंत निकालांना ‘एक्झिट पोल’ समजण्यास हरकत नसावी!

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाच्या सोमवारी दुपारपर्यंत समोर आलेल्या कलानुसार, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या सत्ताधारी महायुतीने मुसंडी मारली आहे. तुलनेत विरोधी महाविकास आघाडी मात्र पिछाडल्याचे दिसत आहे. हा मजकूर लिहीत असताना जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींमधील चित्र स्पष्ट व्हायचे होते ; परंतु एकंदरीत कल पुरेसा स्पष्ट झाला होता. शिवसेना आणि राकाँतील फुटीनंतर सातत्याने प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांमधून टीकेची झोड सहन करीत आलेल्या महायुतीतील पक्षांसाठी हे निकाल काहीसे दिलासादायक म्हणता येत असले तरी, ते काही महाराष्ट्राचे प्रातिनिधिक चित्र नव्हे, हेदेखील लक्षात ठेवायला हवे.

राज्यात एकूण २७,९२० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी दहा टक्क्यांपेक्षाही कमी ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका पार पडल्या. मुळात या निवडणुका पक्षाच्या चिन्हाखाली लढविल्या जात नाहीत. त्यामुळे निकालांच्या आकड्यांसंदर्भात नेहमीच दावे-प्रतिदावे होत असतात.  दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्रातील जवळपास निम्मी लोकसंख्या शहरांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल हाती येईपर्यंत सध्याचा कल कायम राहिला तरी त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी फार हुरळून जाण्याची आणि विरोधकांनी हतोत्साहित होण्याची गरज नाही. अर्थात, प्रत्येक पक्षाला आत्मचिंतन करण्याची संधी या निकालांमुळे नक्कीच मिळणार आहे. जे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत, त्यानुसार बहुतांश सर्वच प्रभावशाली नेत्यांनी त्यांच्या प्रभावाखालील ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व कायम राखले आहे. राकाँचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मात्र त्यांच्या बारामती या बालेकिल्ल्यातच हादरा बसला आहे.

बारामती तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एवढेच नव्हे, तर पवार कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही अजित पवार गटाने शरद पवार गटाला मात दिली आहे. ही घडामोड केवळ शरद पवार यांच्यासाठीच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राकाँत फूट पडल्यानंतर, त्या पक्षांच्या मूळ नेतृत्वाविषयी एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाल्याचे चित्र समाजमाध्यमांमधून निर्माण झाले आहे ; परंतु तशी काही सहानुभूती प्रत्यक्षात असल्याचे किमान या निवडणूक निकालांमधून तरी दिसले नाही. उलट राज्यातील प्रमुख सहा राजकीय पक्षांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे गट तळाच्या दोन स्थानांवर विराजमान झाले असल्याचे चित्र या निकालांमधून समोर आले आहे. उभय नेत्यांसाठी ते चिंताजनक जरी नसले, तरी आत्मचिंतनास प्रवृत्त करणारे नक्कीच म्हणायला हवे. अर्थात, ग्रामपंचायतीसारख्या अगदीच स्थानिक पातळीवरील निवडणूक निकालांमधून उभे राहणारे चित्र मतदारांच्या मनातील कल स्पष्ट करणारे असेलच, असे नव्हे. स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील मुद्यांना गौण स्थान असते.

स्थानिक मुद्दे, संबंध त्या निवडणुकांमध्ये वरचढ ठरतात. अनेकदा ‘लक्ष्मीदर्शन’ही महत्त्वाची भूमिका बजावते. प्रभावशाली आणि महत्त्वाकांक्षी नेत्यांसाठी,  ते ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतात, त्या भागात त्यांचा प्रभाव कायम असल्याचे दाखवून देणे क्रमप्राप्त ठरत असल्याने, अनेकदा या निवडणुकांमध्ये साम-दाम-दंड-भेद-नीतीचा अवलंब केला जातो. तसा तो ताज्या निवडणुकांमध्येही झाला असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेही हे निवडणूक निकाल संपूर्ण राज्याचा कल दाखविणारे आहेत, असा ठाम दावा कुणीही करू शकत नाही. तरीदेखील भाजप आणि त्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे निकाल नक्कीच दिलासादायक आहेत.

शिवसेना व राकाँतील फूट आणि मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करण्यात आले. मराठा आरक्षण मुद्यामुळे राज्यातील सर्वात मोठा मराठा समाज भाजप आणि विशेषतः फडणवीस यांच्यावर चांगलाच नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नेमक्या त्याच काळात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये भाजपला चांगले यश प्राप्त झाले. ग्रामीण भागात मराठा समाजाची लक्षणीय लोकसंख्या असतानाही यश मिळाल्याने भाजप नेतृत्वाचा जीव नक्कीच भांड्यात पडला असेल. अर्थात सर्वच पक्षांसाठी खरी लढाई अद्याप बाकी आहे. तोपर्यंत ताज्या निवडणूक निकालांना ‘इलेक्शन सर्व्हे’ किंवा ‘एक्झिट पोल’ समजण्यास हरकत नसावी !

Web Title: Hints from the villagers, ... till then the election results should not be considered 'exit poll'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.