सारे जहाँ से अच्छा या कृतज्ञ जाणिवेला नमस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 06:13 IST2021-01-26T06:13:00+5:302021-01-26T06:13:24+5:30
घरचं जेवण रुचकर, स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक असतं हे तोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत आपल्यावर रोज मेसमध्ये किंवा हॉटेलमध्ये खायची वेळ येत नाही.

सारे जहाँ से अच्छा या कृतज्ञ जाणिवेला नमस्कार!
विष्णुदास चापके
तसंच भारत, हा आपला देश काय आहे, इथली समृद्धता, विविधता, संस्कृती, कुटुंबसंस्था हे सारं किती महत्त्वाचं आहे हे मला भारत सोडल्यावर उमजायला लागलं. अगदी इतर आशियायी देशांशी तुलना केली तरी लगेच लक्षात येतं की, भारताला इतर देशांपेक्षा वेगळं आणि आदराचं स्थान देते ती आपली राज्यघटना. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर वसाहतवाद संपला आणि नवीन देश जन्माला आले. मागच्या सात दशकांमध्ये तुर्कीपासून म्यानमारपर्यंतच्या देशात त्यांच्या राज्य घटनेच्या कितीतरी आवृत्त्या आल्या आणि पायदळी गेल्या. आशियात भारत हा एकमेव देश आहे ज्याचे काम लिखित राज्यघटनेवर चालते. घटना इथे सर्वोच्च मानली जाते.
इथं लष्कराने बंड करून सत्ता हस्तगत करण्याचा इतिहास नाही. कधी वेळ मिळाला तर गुगलवर शोधा, लिस्ट ऑफ कूप आणि कूप अटेम्प्ट बाय कण्ट्रीज, या यादीत तुम्हाला पार चिलीपासून नार्वेपर्यंत आणि जपानपासून जमर्नीपर्यंत देश सापडतील, पण त्यात सुदैवानं भारताचं नाव नाही. भारतात कधी लष्कराचं बंड नाही झालं. याचं कारण आपली राज्यघटना आणि अंहिसावादी वृत्ती आहे. आपली राज्यघटना एवढी लवचिक आणि एवढी कठोर आहे, की लष्कराचा उठाव दूरच-नगराचा महापौर किंवा गावचा सरपंच काय अगदी देशाचा पंतप्रधानही एकदा आचारसंहिता लागू झाली की, सारे नियम पाळतो. सरकारी गाडी त्याकाळात निमूट जमा केली जाते. कायद्याचा सन्मान आणि आदर ही आपली ताकद आहे आणि ती जीवनशैलीही व्हायला हवी.
भारतीय माणसं, त्यांची जीवनशैलीच मुळात किती अहिंसक आहे, याची जाणीव मला माझ्या जगप्रदक्षिणेत इक्वोडोर या देशामध्ये झाली. तरूण मुलांच्या एका समुहासोबत मी तेथील राष्ट्रीय उद्यानात गेलो. परतीचं वाहन मिळायला वेळ झाला. सूर्यास्त कधीच झाला होता. अंधकार हळूहळू आपली काळी घोंगडी पसरवत होता. एक मुलगी फोनवर बोलत झाडाची पाने तोडत होती. मी तिला विनंती केली की, झाड आता झोपी गेलंय आणि तुम्ही पानं तोडून त्याला त्रस देऊ नका. त्या युवतीने मला प्रतीप्रश्न केला ‘झाडामध्ये जीव असतो आणि ते रात्री झोपतं हे तुम्हाला कोणी शिकवलं?’ मी म्हटलं, मला माझ्या आईने सांगितलं. ती म्हणाली, तिला कुणी सांगितलं? मी म्हंटलं तिच्या आईने, माझ्या आजीने. ती म्हणाली, त्यांनी जीवशास्त्रचा अभ्यास केला होता का? मी तिला सहज सांगितलं, झाडात जीव असतो, असं आमच्याकडे मानतात.
ती आमची एक रूढी आहे. रात्री आम्ही पान तोडत नाही किंवा अगदी मुंगीलाही मारत नाही. आमच्या पुराणात सुर्यास्तानंतर युद्धसुद्धा थांबत असे. तिला नवल वाटलं आणि माझ्या लक्षात आलं की, हे सारं आपल्या जीवनशैलीत आहे, ते आपण विसरत चाललो आहोत का? कोलकात्याचा हावडा ब्रिज ओलांडल्यानंतर ते जगाची प्रदक्षिणा करून परत येईपर्यंत माझी सर्वात मोठी अडचण होती ती शाकाहारी जेवण. मी मांसाहार करत नाही. हे समजल्यावर काही देशातील लोक आश्चर्याने विचारायचे, तुम्ही जिवंत कसे राहता?
जगभरातल्या प्रवासात कुटुंब गमावून बसलेली, नसलेलीच बरीच माणसं मला भेटली. माझ्या घरी, माझ्यापाठीमागे उभं राहणारं कुटुंब आहे, हक्काची, मायेची माणसं आहेत, ही माझी ताकद आहे, असं मला कितीदा वाटून गेलं त्याकाळात. तेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचंही. इथं त्यात हजार त्रुटी आहेत हे मान्य. पण तरी या व्यवस्थेचं कौतुक मला वाटलं आहे. दक्षिण अमेरिकेत पोलिओची लस घेतल्याचा पुरावा मागतात. पुराव्यासाठी मी पोलिओची लस सांतियागो चिलीमध्ये घेतली. जे आपल्याकडे आहे ते अनमोल आहे, त्यात बदल, सुधारणा आवश्यक आहेत, याचीही मला जाणीव आहे. मात्र, जे आहे ते जपणं, सुधारणं हेही तर आपलंच काम आहे. लाख दोष असतील व्यवस्थेत, पण आपल्या व्यवस्थेला कायदा आणि घटना यांचं कवच आहे. ते जपलं पाहिजे, आपलं भारतीयत्व आपल्या साऱ्यांचं आहे. आज प्रजासत्ताकाला म्हणून या साऱ्याची कृतज्ञ जाणीव मनाशी असणं, ही आपल्याला आपल्या नम्र ताकदीची जाणीव होणं आहे.
( लेखक मुक्त पत्रकार असून, ३ वर्षे ३ महिने ५ खंडातल्या ३५ देशांचा प्रवास करून ते नुकतेच भारतात परतले आहेत.)