संत तुकाराम म्हणायचे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. पण अलीकडे अशी पावले दिसेनाशी होत चालली आहेत. काही जण केवळ औपचारिकता म्हणून बोलतात तर काही वेळ निभावून नेण्यासाठी बोलतात. नेतेमंडळींच्या बोलण्याला तर लोक बऱ्यापैकी ओळखून असतात. जे केवळ बोलण्यासाठीच असते, ते कृतीत उतरण्याचा प्रश्नच नसतो. कारण वांझोट्या बोलाकडून अपेक्षा बाळगणे म्हणजे निव्वळ भाबडेपणाच ठरत असतो. पण अशाही सभोवतालच्या वातावरणात काही जण बोलतात, कल्पनाही मांडतात आणि त्याला कृतीची जोडही देतात, त्यामुळे त्या बोलण्याला नैतिक अर्थ प्राप्त होत असतो. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधी पदरमोड करून मदत केली त्यानंतर दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसादही लाभू लागला आहे. तोच कित्ता गिरवित नागपूर येथे ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याला आर्थिक हातभार लावून प्रयोगशील नाटककार महेश एलकुंचवार यांनी उक्ती आणि कृतीची सांगड घालून दिली आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘नाम’ फाउंडेशनचे कौतुक करून एलकुंचवार यांनी राज्यातील सुखवस्तू परिवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एका पाल्याला शिक्षण आणि इतर कार्यासाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले. एलकुंचवार केवळ आवाहन करूनच थांबले नाहीत, तर त्या कामाला आपल्यापासून सुरुवात व्हावी म्हणून त्यांना पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी अध्यक्ष म्हणून मिळालेला एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्या हाती सुपूर्द केला. त्यांनी दिलेल्या रकमेला जेवढे मोल आहे, त्यापेक्षा दु:खितांच्या अश्रूंचे मोल जाणण्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. त्याच भावनेतून त्यांनी केलेल्या आवाहनाला दाद देऊन सुखवस्तू कुटुंबांनी पुढाकार घेतला तर दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती एक झुळूक ठरणार आहे. त्यासाठी पुढाकार कोण घेईल हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
कल्पना चांगली पण..
By admin | Updated: March 28, 2016 03:41 IST