गौतमीला विरोध, हे तिच्या 'पाटीलकी'वरचे शिक्कामोर्तबच!

By संदीप प्रधान | Published: June 5, 2023 11:04 AM2023-06-05T11:04:39+5:302023-06-05T11:08:55+5:30

गौतमीचे आडनाव चाबूकस्वार आहे तर ती पाटील हे आडनाव लावून समाजाची बदनामी करीत आहे, अशा शब्दात मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड-पाटील यांनी नाराजी प्रकट केली.

gautami patil surname controversy maratha samanvayak rajendra patil comment maharashtra | गौतमीला विरोध, हे तिच्या 'पाटीलकी'वरचे शिक्कामोर्तबच!

गौतमीला विरोध, हे तिच्या 'पाटीलकी'वरचे शिक्कामोर्तबच!

googlenewsNext

संदीप प्रधान,
वरिष्ठ सहायक संपादक,
लोकमत

प्रधान आडनावाच्या व्यक्तीने देशी दारुचा गुत्ता सुरु केला किंवा लेले आडनावाच्या व्यक्तीने जुगार, मटक्याचा अड्डा सुरु केला तर जशी धारदार किंवा बांडी नाकं मुरडली जातील तशीच किंवा त्यापेक्षा अंमळ जास्तच नाकं मुरडली जात आहेत गौतमी नावाच्या सध्या ‘चाबूक’ लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनेनी ‘पाटील’ हे आडनाव लावल्यामुळे. गौतमीचे आडनाव चाबूकस्वार आहे तर ती पाटील हे आडनाव लावून समाजाची बदनामी करीत आहे, अशा शब्दात मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड-पाटील यांनी नाराजी प्रकट केली. गौतमीचे कार्यक्रम बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील अन्य प्रश्न संपलेले असल्याने मग याच विषयावर मतमतांतरांच्या बाईटचा वर्षाव सुरु झाला. मराठा समाजात मानाचे स्थान असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी गौतमीची पाठराखण करुन पुरोगामी परंपरेचे दर्शन घडवले. गौतमी ही एक होतकरु कलाकार आहे. तिला अशा पद्धतीने विरोध करण्यास संभाजीराजे यांनी विरोध केला. पाटील हे ब्रिटीश राज्यव्यवस्थेतील पद आहे. ती केवळ जातीची ओळख नाही, असा सूर गौतमीचे समर्थन करणाऱ्या अनेकांनी लावला. अगदी जळगावमधील पाटील सेवा संघानेही गौतमीला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही गौतमीचीच पाठराखण केली. माधुरी दीक्षितला आडनाव बदलण्याचा सल्ला कुणी दिला का, असा रोकडा सवाल त्यांनी केला.

धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे जन्माला आलेल्या गौतमीचे पितृछत्र लहानपणी गेले. ती मामाकडे लहानाची मोठी झाली. शिक्षणाकरिता पुण्यात आली. परंतु शिक्षणात तिचे मन रमले नाही. मग तिला तिच्यातील नृत्यकलेची जाणीव झाली. अनेक लावणी कलाकारांच्या लावण्या पाहत ती नृत्य कलाकार झाली. ऑक्रेस्ट्रात नृत्य सादर करु लागली. फेसबुक, इस्टाग्राम, युट्यूबमुळे काहींचे रातोरात नशिबाचे दार उघडते तसे ते गौतमीचे उघडले. तिला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद लाभला. त्यातून तिचे कार्यक्रम राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारा वगैरे भागात होऊ लागले. (येथील तरुण बिघडतात म्हणून एकेकाळी राज्यात डान्सबार बंदी झाली होती) तरुणांच्या उड्या या ठिकाणी पडू लागल्या. मायकेल जँक्सन किंवा जस्टीन बिबर यांच्या शोमध्ये देहभान विसरुन चित्कार करणारी तरुणाई जशी दिसते तशी ती गौतमीच्या कार्यक्रमात दिसते. त्यामुळे मग सांगलीत गौतमीच्या शोमध्ये एक मृतदेह आढळल्यावरुन वाद झाला. मृत व्यक्ती मद्यपान करुन पडली व डोक्याला मार लागून गेल्याचे नंतर उघड झाले.

इंदुरीकर महाराजांनी गौतमी तीन लाखांचे मानधन घेते असा गौप्यस्फोट केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. गौतमीच्या हावभावावरुन रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यासोबत तिचा पंगा झाला. असे एक ना अनेक वाद ही गौतमीची ओळख असताना आता तिच्या आडनावाचा वाद गाजत आहे. मात्र गौतमीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती अत्यंत धोरणी आहे. कुठे आक्रमक व्हायचे, कुठे माफी मागून मोकळ‌ं व्हायचं आणि कुठे नो कॉमेंटस बोलायचे, याचे (अनेक राजकीय धुरिणांना सध्या नसलेले) भान तिला आहे. त्यामुळे गौतमीची लोकप्रियता टिकून आहे. किंबहुना सोशल मीडियावरील लोकप्रियतेचे गारुड टिकवून ठेवायचे तर वादविवाद हेच महत्वाचे साधन आहे.

किशोर शांताबाई काळे यांचे ‘कोल्हाट्याचे पोरं’ हे आत्मकथन काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले आणि लावणी कलावंतांच्या दाहक जीवनाचे जळजळीत वास्तव जगासमोर आले. बहुतांश लावणी कलाकार हे कोल्हाटी, महार, मांग समाजातील असतात. त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या पोरांना आपला बाप कोण याचा पत्ता नसतो. जोपर्यंत ती नृत्यांगना तरुण आहे तोपर्यंत समाजातील धनाढ्य व सत्ताधारी पुरुषांना ती हवीहवीशी असते. अशा लावणी कलाकारांचे जीवन अत्यंत कुतरओढीचे, कष्टप्रद व शोषित असते हे वास्तव त्या आत्मकथनातून जगजाहीर झाले. गौतमीच्या आडनावाला विरोध करण्यामागे तीच चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात स्वत:ला सिद्ध करायला येणारे आडनाव बदलून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. कदाचित पाटील हे आडनाव आपल्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याकरिता अधिक मदतगार ठरेल, असे गौतमीला वाटले असेल.

लावणी ही प्रेक्षकधर्मी कला असल्याने तेथे प्रेक्षकांना रमवण्याकरिता, त्यांचा प्रतिसाद मिळवण्याकरिता काही अदा, हावभाव हेतूत: केले जात असावेत. सुरेखा पुणेकर, राजश्री काळे-नगरकर वगैरे लावणीसम्राज्ञींनी पाळलेली मर्यादा गौतमीने काहीवेळा ओलांडली असेल. पण तिला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता तिच्या चाहत्या वर्गाला (त्यातील बऱ्याचजणांची आडनावे पाटील असतील) यांनाही बोल्ड गौतमी हवी आहे.

Web Title: gautami patil surname controversy maratha samanvayak rajendra patil comment maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.