फ्रान्सच्या फर्स्ट लेडीचा छळ; १० जणांना शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 04:44 IST2026-01-09T04:44:16+5:302026-01-09T04:44:16+5:30
याच यादीत आता चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी फर्स्ट लेडी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

फ्रान्सच्या फर्स्ट लेडीचा छळ; १० जणांना शिक्षा
कोणाचा, कधी, कोणत्या कारणावरून छळ होईल आणि त्या व्यक्तीला त्याचा किती त्रास होईल, याचा काहीच भरवसा नाही. याच छळामुळे आजवर लक्षावधी लोकांना जिणं नकोसं केलं आहे आणि काही कारण नसताना त्यांना आयुष्यभर त्याचा त्रास भोगावा लागला आहे.
याच यादीत आता चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी फर्स्ट लेडी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. गेली अनेक वर्षे त्यांना आपल्यावरील छळाचा सामना करावा लागला, त्यावरून जगभरात त्यांच्याविषयी नको नको ते गैरसमज पसरले आणि त्यासाठी त्यांना चक्क फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा द्यावा लागला. मुख्य म्हणजे इतकी वर्षं जिद्दीनं त्यांनी हा लढा लढला, त्याला यश आलं आणि ब्रिगिट यांना ट्रोल करणाऱ्या दहाजणांना फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
फर्स्ट लेडी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्याविरुद्ध अनेक लोक अतिशय अश्लाघ्य अशी अफवा पसरवत होते की, ब्रिगिट या मुळात स्त्री नसून पुरुष आहेत. त्या संदर्भात जाणीवपूर्वक माेहीम तर चालवली गेलीच; पण एका पुरुषाचा फोटो दाखवून हाच ब्रिगिट यांचा फोटो आहे, असा समज जाणीवपूर्वक पसरवण्यात आला.
ब्रिगिट यांचा जन्म पुरुष म्हणून झाला होता आणि त्यांचं नाव जीन-मिशेल ट्रोगन्यूक्स होतं, नंतर त्यांनी आपलं नाव बदलून ब्रिगिट केलं, असं छातीठोकपणे सांगितलं गेलं. त्या संदर्भात अनेकांनी तर चॅनेल्सवर जाहीर मुलाखतीही दिल्या आणि त्या संदर्भातील ‘खोटे पुरावे’ सादर केले. खरं तर जीन-मिशेल ट्रोगन्यूक्स हे ब्रिगिट यांच्या मोठ्या भावाचं नाव आहे.
बराच काळ हे ट्रोलिंग सहन केल्यानंतर आणि खालच्या कोर्टात काही वर्षे प्रकरण चालल्यानंतर ब्रिगिट यांनी सर्वोच्च न्यायालयात २०२४ मध्ये या छळाविरोधात तक्रार दाखल केली होती. न्यायालयानं आता ज्या दहाजणांना शिक्षा ठोठावली आहे, त्यात आठ पुरुष आणि दोन महिला आहेत, ज्यांचं वय ४१ ते ६५ वर्षांदरम्यान आहे. कोर्टानं त्यांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या आहेत.
ब्रिगिट मॅक्रॉन यांच्या कन्या टिफेन ऑजियर यांनी साक्ष देताना सांगितलं की, या अफवांचा त्यांच्या आईच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर आणि पूर्ण परिवारावर अत्यंत विपरीत परिणाम झाला.
यावर एक दोषी जेरोम ए याने प्रतिवाद करताना निर्लज्जपणे म्हटले, मी काही पोस्ट्स फक्त एक गंमत, मजाक म्हणून केल्या होत्या. फ्रान्समध्ये गंमत करायलाही परवानगी (परमिट) लागते का? ब्रिगिट मॅक्रॉन या एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत, म्हणून त्यांनी ही टीका सहन करायला हवी.
ब्रिगिट यांनी सांगितलं की, या ऑनलाइन आणि ऑफलाइन टिप्पण्या अत्यंत त्रासदायक आहेत. त्यांच्या नातवंडांसाठी हे ऐकणं फार कठीण होतं की त्यांची आजी पुरुष आहे. काही अमेरिकन पत्रकारांनीही या प्रकरणाला हवा घातली होती.
ब्रिगिट यांना आणखीही काही कारणांनी ट्रोल करण्यात आलं होतं; कारण राष्ट्राध्यक्ष पती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यापेक्षा त्या २४ वर्षांनी मोठ्या आहेत. ब्रिगिट यांची कन्या इमॅन्युएल यांची क्लासमेट होती; पण आपल्या वर्गमैत्रिणीऐवजी तिच्या आईशीच इमॅन्युएल यांनी लग्न केल्यामुळेही त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.