देशोदेशीच्या आज्या ‘नातवांना’ करतात तृप्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:56 AM2023-01-31T10:56:08+5:302023-01-31T10:56:28+5:30

Family: खायला काय  आवडतं, या प्रश्नावर बहुतेकांचं उत्तर हे आईच्या हातचे, आजीच्या हातचे पदार्थ हे असतं. विशेषत: आजीच्या हातचे पदार्थ आवडतात हे सांगणाऱ्यांची संख्या जगात खूप जास्त आहे.

Foreign grandmothers make their 'grandchildren' satisfied! | देशोदेशीच्या आज्या ‘नातवांना’ करतात तृप्त!

देशोदेशीच्या आज्या ‘नातवांना’ करतात तृप्त!

Next

खायला काय  आवडतं, या प्रश्नावर बहुतेकांचं उत्तर हे आईच्या हातचे, आजीच्या हातचे पदार्थ हे असतं. विशेषत: आजीच्या हातचे पदार्थ आवडतात हे सांगणाऱ्यांची संख्या जगात खूप जास्त आहे. आपल्या  आजीच्या हातच्या पदार्थांवर प्रेम करणाऱ्या  एका व्यक्तीने एक अशी जागा तयार केली जिथे जगातला कोणीही व्यक्ती आला तरी त्याला आजीच्या हातचे पदार्थ मनसोक्त खायला मिळतील. आजीच्या ऊबदार हाताच्या चवीचं हे ठिकाण न्यूयाॅर्कच्या दक्षिणेकडे असलेल्या स्टेटन आयलॅण्ड या छोट्याशा परगाण्यात आहे. ‘इनोटेका मारिया’ हे  त्या रेस्टाॅरंटचं नाव असलं तरी हे रेस्टाॅरंट म्हणजे ‘नोनाज ऑफ द  वर्ल्ड’ या नावानेच ओळखलं जातं.  इटलीमध्ये आजीला नोना म्हणून संबोधलं जातं. 

या ठिकाणी जगभरातल्या आज्या येऊन त्यांच्या देशातल्या शतकानुतशतकांची परंपरा असलेले पदार्थ रांधतात. ऐंशी-नव्वदीच्या घरातल्या आज्यांनी तयार केलेले अप्रतिम चवीचे पदार्थ खाऊन खवय्ये तृप्त होतात आणि रेस्टाॅरंटमधून निघण्याआधी या आज्यांसाठी उभे राहून टाळ्या वाजवतात. ग्राहकांकडून मिळणाऱ्या या प्रतिसादामुळे आज्या खूश होतात. इथे रेस्टाॅरंटचा व्यवसाय होणं ही बाब दुय्यम असून आलेल्या ग्राहकांना आजीच्या हातची विशेष चव अनुभवायला मिळावी हा मुख्य हेतू आहे.

जो स्कॅरॅवेला आज ६७ वर्षांचे आहेत. त्यांनी २००७ मध्ये इनोटेका मारिया नावाचं हे रेस्टाॅरंट सुरू केलं. या रेस्टाॅरंटद्वारे त्यांना  खवय्यांना इटालियन  पदार्थांची मेजवानी द्यायची होती. हे रेस्टाॅरंट त्यांच्यासाठी व्यावसायिक नफा कमावण्याचा स्रोत नव्हता. मुळात स्कॅरॅवेला यांना हाॅटेल व्यवसायाची ना पार्श्वभूमी होती ना अनुभव. १७ वर्षे त्यांनी न्यूयाॅर्कच्या महानगर परिवहन प्राधिकरणात काम केलेलं. हाॅटेल व्यवसाय कसा करतात याचा त्यांना गंधही नव्हता. पण त्यांना इटालियन पदार्थ खूप आवडायचे. लहानपणापासून त्यांना या पदार्थांची आवड होती. पण ते पदार्थ खाण्यासाठी त्यांना कधीही न्यूयाॅर्कमधील इटालियन रेस्टाॅरंटमध्ये जाण्याची वेळ आली नाही.  कारण हे पदार्थ घरातच करून खायला घालणारी आजी, आई आणि बहीण होती. आजीकडे तर चवीचा खजिना होता. 
आजीच्या हातासारखी चव त्यांच्या आईच्या आणि बहिणीच्या हातालाही होती. पण एक एक करून घरातल्या या तिघी जणी गेल्या. स्कॅरॅवेलाच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी कोणताही अनुभव नसताना रेस्टाॅरंट उघडण्याचं ठरवलं. आई मारियाने स्कॅरॅवेला यांच्यासाठी ठेवलेल्या पैशातून त्यांनी एक दुकान घेतलं आणि तिथे  रेस्टाॅरंट उघडलं. या रेस्टाॅरंटला त्यांनी आईच्या नावावरून ‘इनोटेका मारिया’ हे नाव दिलं.

 सुरुवातीला  या रेस्टाॅरंटमध्ये फक्त इटालियन पदार्थ मिळतील असं त्याने ठरवलं होतं. त्यांना आपल्या रेस्टाॅरंटद्वारे आजीच्या हातची घरगुती चव जपायची होती. त्यासाठी त्यांनी ५० ते ९० वयोगटातल्या स्त्रियांना कूक म्हणून नेमण्याचं ठरवलं. त्यासाठी इटलीच्या वेगवेगळ्या प्रदेशातले स्थानिक पदार्थ रांधता येणाऱ्या आज्या हव्यात, अशी जाहिरात त्यांनी दिली. शतकानुशतकाचे इटालियन पदार्थ मन लावून रांधणाऱ्या आजीच्या वयाच्या बायका एवढीच त्यांची कूककडून अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या रेस्टाॅरंटमध्ये आज कूक म्हणून काम करतात. त्या नुसतं काम करत नाहीत तर आपल्याला मिळालेला चवीचा वारसा जपण्याचं महत्त्वाचं काम मोठ्या प्रेमानं आणि आजीच्या मायेनं करतात. या रेस्टाॅरंटमध्ये काम करणाऱ्या या आज्यांना कूक ही पदवी नसून त्यांना ‘नोना’ असंच संबोधलं जातं. या रेस्टाॅरंटमध्ये ८८ वर्षांची  मारिया जिआलानेल्ला ही आजी आहे तसेच ५५ वर्षांची युमी कोमात्सुडायरा ही जपानी महिलादेखील आहे. 

‘इनोटेका मारिया’ची खासियत
ब्राझिल, अर्जेंटिना, पेरू, इटली, जर्मनी, ग्रीस, पोलंड, आर्मेनिया, श्रीलंका, फिलिपिन्स, हाॅंगकाँग, तैवान, भारत, इजिप्त, त्रिनिदाद, टोबॅगो या अनेक देशांतून आलेल्या आज्या ही ‘इनोटेका मारिया’ या रेस्टाॅरण्टची खासियत आहे. ८८ वर्षांच्या सर्वांत वयोवृद्ध मारिया जिआलानेल्ला या रेस्टाॅरंटच्या प्रसिद्ध नोना आहेत. १९६१ मध्ये इटलीमधून त्या अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. पारंपरिक इटालियन पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा आहे.  खास जिआलानेल्ला नोनांच्या हातचे पदार्थ खाण्यासाठी खवय्ये आसुसलेले असतात. त्यांच्या हातचे पदार्थ खाऊन तृप्त झालेले खवय्ये या आजींना आवर्जून प्रेमानं मिठी मारतात आणि त्यांच्या सुगरणपणाला दाद देतात.

Web Title: Foreign grandmothers make their 'grandchildren' satisfied!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार