फतवा : बंद करा त्या खिडक्या, जिथून महिला दिसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:39 IST2025-01-03T10:38:12+5:302025-01-03T10:39:00+5:30

काय आहे हा फतवा? - त्यांनी देश आणि परदेशातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) ‘अखेरचा’ इशारा दिला आहे, महिलांना नोकरी देणं, त्यांना कामावर ठेवणं ताबडतोब बंद करा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. महिलांना कामावर ठेवणारी एक जरी एनजीओ आढळली, तरी त्यांची मान्यता कायमची बंद तर होईलच, पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही जेलची हवा खावी लागू शकेल. 

Fatwa Close the windows from which women can be seen | फतवा : बंद करा त्या खिडक्या, जिथून महिला दिसेल!

फतवा : बंद करा त्या खिडक्या, जिथून महिला दिसेल!

तालिबाननंअफगाणिस्तानात रोज नवनवीन फतवे काढणं सुरूच ठेवलं आहे. अर्थातच हे बहुतांश फतवे आहेत महिलांबाबतचे.महिलांनी काय करावं, काय करू नये, कसं वागावं, कसं वागू नये, एवढंच नाही, महिलांसंदर्भत इतरांनीही काय करावं आणि काय करू नये याचे आदेश तालिबन दिवसागणिक देत असतं आणि त्याबाबत डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतं. 

तालिबाननं महिलांच्या संदर्भात आता एक नवा फतवा काढला आहे. काय आहे हा फतवा? - त्यांनी देश आणि परदेशातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) ‘अखेरचा’ इशारा दिला आहे, महिलांना नोकरी देणं, त्यांना कामावर ठेवणं ताबडतोब बंद करा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. महिलांना कामावर ठेवणारी एक जरी एनजीओ आढळली, तरी त्यांची मान्यता कायमची बंद तर होईलच, पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही जेलची हवा खावी लागू शकेल. 

तालिबान्यांचा कयास आहे की बऱ्याच एनजीओ महिलांना नोकऱ्या देतात, त्यांच्याकडून काम करवून घेतात, त्यामुळे देशाची संस्कृती बुडते आहे, महिलांची चालचलणूक बदलते आहे, देशात अश्लीलता वाढते आहे आणि देश पश्चिमेच्या आहारी जातो आहे. अफगाणिस्तानात असंही महिलांच्या नोकरीवर प्रतिबंध आहेच, पण चोरीछुपे किंवा कुठल्याही अन्य कारणानं त्यांनी घराबाहेर पडू नये, असं तालिबान्यांचं मत आहे. 

हे कमी म्हणूनच की काय, तालिबान्यांच्या आणखी एका फतव्यामुळे हसावं की रडावं, असा प्रश्न आता तिथल्याच स्त्री-पुरुषांना पडला आहे. तालिबानचा हा नवा फतवा म्हणतो, ज्या ज्या घरगुती इमारती आहेत, म्हणजे ज्या इमारती राहण्यासाठी वापरल्या जातात, तिथल्या इमारतींच्या खिडक्याही तातडीनं बंद करा. बिल्डरांनाही त्यांनी सक्त ताकीद दिली आहे, इमारतींना खिडक्या बनवताना आधी दहा वेळा विचार करा आणि मगच इमारतीला कुठे खिडकी बनवायची ते ठरवा. अर्थातच हवा आणि प्रकाशासाठी खिडक्या असाव्यात या नैसर्गिक तत्त्वाशी त्यांना काहीही घेणंदेणं नाही. 

मग काय आहे तालिबान्यांचं म्हणणं? - त्यांच्या मते कोणत्याही इमारतीला अशा ठिकाणी खिडकी नको, जिथून कोणतीही, कोणत्याही महिला दिसू शकतील! 

यासंदर्भात तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, कोणत्याही इमारतीला अशा ठिकाणी खिडकी नको, जिथून कोणाच्याही घराचं अंगण दिसू शकेल, कोणाच्या स्वयंपाकघरातलं किंवा कोणत्याही रूममधलं काही दिसू शकेल.. परिसरात ज्या ठिकाणी विहिरी किंवा पाणी भरण्याच्या जागा आहेत, अशा जागाही या खिडक्यांमधून दिसता कामा नयेत. थोडक्यात, सामान्यत: महिला ज्या ठिकाणी वावरतात, अशी कोणतीही जागा तुमच्या खिडक्यांमधून दिसता कामा नये.. नाहीतर ‘फटके’ खायला तयार राहा! अशा खिडक्या म्हणजे अश्लीलतेला जन्म देण्याचं कारण ठरू शकतात आणि अश्लीलतेला आम्ही कुठल्याही तऱ्हेनं थारा मिळू देणार नाही, असं तालिबान्यांचं म्हणणं आहे.

केवळ बिल्डरांनाच नाही, अफगाणिस्तानातील सरकारी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरताना तालिबाननं म्हटलं आहे, आपापल्या परिसरात तयार होणाऱ्या प्रत्येक नव्या इमारतीवर लक्ष ठेवा, शेजारच्या घरात, आजूबाजूला डोकावता येऊ शकेल आणि जिथून महिलेचा केसही दिसू शकेल अशी जागा, फट, खिडकी जर त्या इमारतीला असली तर तुमचंही काही खरं नाही. या नव्या फतव्यामुळे अधिकारीही हातात भिंग घेऊन नव्या इमारतींच्या खिडक्या शोधायला लागले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी तर नव्यानं तयार झालेल्या आणि तयार होत असलेल्या प्रत्येक इमारतीच्या, प्रत्येक फ्लॅटच्या, प्रत्येक रूममध्ये जाऊन खिडक्या आणि फटी शोधायला सुरुवात केली आहे, जिथून महिलेची सावलीही दृष्टीस पडू शकेल!

पण ज्या इमारती जुन्या आहेत आणि बऱ्याच अगोदर तयार झाल्या आहेत, तिथल्या खिडक्यांतून महिला नजरेस पडू शकत असतील तर काय? -त्यांच्यासाठीही तालिबानकडे उपाय आहे! आपल्या घराच्या, खिडक्यांच्या समोर त्यांनी विटांची नवी भिंत बांधावी किंवा त्या खिडक्या बंद कराव्यात! काही महिन्यांपूर्वी महिलांनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्यानं बोलण्यावरही तालिबाननं बंदी घातली होती.

ज्यांनी निर्मिती केली, त्यांनाही डोकेदुखी
ज्या अमेरिका आणि पाकिस्ताननं तालिबानला खतपाणी घातलं होतं, त्यांच्यासाठीही तालिबान आता डोकेदुखी ठरली आहे. १९९०च्या दशकात अमेरिका आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था सीआयए व आयएसआयच्या मदतीनं तालिबानची निर्मिती झाली. पश्तू लढवय्यांच्या या संघटनेला अफगाणिस्तानच्या बहुसंख्य पश्तुनी लोकांचंही समर्थन होतं. देशात स्थैर्य स्थापन करणं आणि धार्मिक कायदा सक्तीनं लागू करणं हे तालिबानचं ध्येय आहे.
 

Web Title: Fatwa Close the windows from which women can be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.