आशिष धवन, अध्यक्ष, सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशन

दर्जेदार शिक्षण आणि अध्ययनामुळे व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना चालना मिळते आणि त्या महत्त्वाकांक्षा वास्तवात उतरविण्यासाठीच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात परिवर्तन घडून येते. हे सर्व लक्षात घेत भारत या जगातील सर्वात तरुण देशात, जिथे ६-१४ या वयोगटातील २६ कोटी विद्यार्थी आहेत, तिथे शिक्षण आणि अध्ययनाचे महत्त्व खूपच आहे. शाळेतील अध्ययन निष्पत्तीची पातळी कमी असल्यामुळे भारताची मनुष्यबळ क्षमता खाली येत आहे.
 विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीसंदर्भात झालेल्या संशोधनातून दिसून आले आहे की, भारतातील ६-८ वयोगटातील दर २ पैकी १ मूल शाळेत जात आहे, पण त्याचे शिक्षण होत नाही. ही आकडेवारी चिंता अधिक वाढविणारी आहे. कारण अर्थ समजून घेऊन वाचन करण्याची मूलभूत क्षमता नसल्यामुळे शाळेतील उपस्थिती आणि अध्ययन यातील दरी प्रचंड आहे. एक प्रभावी व्यक्ती म्हणून घडण्यासाठी हे अत्यंत मूलभूत कौशल्य आहे. अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट २0१६ या अहवालानुसार तिसरीतील केवळ एक चतुर्थांश विद्यार्थी लघुकथा वाचू आणि समजू शकतात आणि त्यांना काही सोपी वाक्ये रचता येतात किंवा दोन अंकी संख्यांची वजाबाकी करता येते. ही अतिशय गंभीर बाब आहे, हे नक्कीच.भारत सरकारच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेनुसारसुद्धा (एनएएस) अर्थबोध न होता वाचता येणाऱ्या मुलांचे प्रमाण खूप असल्याचे दिसून आले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर मुलाने चालायला शिकण्याआधीच धावण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वप्रथम मूलभूत अध्ययनाच्या बाबतीत आपल्याकडे स्पष्ट आणि मोजता येण्यासारखे लक्ष्य असणे आणि ते साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. निर्णयकर्ते, शिक्षक, शाळा व्यवस्थापक, प्रशासन आणि शिक्षणक्षेत्रात काम करणाºया संस्थांना या मुद्द्यावर प्राधान्याने काम करण्याबद्दल जाणीव झाली तरच आपल्याला लक्षणीय बदल दिसून येऊ शकेल. या दिशेने वाटचाल करतानाचे पुढचे पाऊल म्हणेज मुले इयत्ता तिसरीपर्यंत अर्थबोधासह वाचन करण्यास शिकतील यावर आपले लक्ष केंद्रित करणे आणि मोजता येण्यासारखे लक्ष्य ठेवणे. उदा. मुळाक्षरे व शब्दांची ओळख किंवा अचूक तोंडी वाचन करता येणे.दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देता यावे यासाठी आवश्यक इनपुट्स आणि प्रशिक्षण शाळा आणि शिक्षकांना मिळत असल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आम्हाला वाटते की, शैक्षणिक उपाययोजनेत वर्गातील भिन्न अध्ययन पातळ्यांसाठी योग्य ठरणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रारूप समाविष्ट करण्यात यावे. त्याचप्रमाणे अध्ययन - अध्यापन साहित्य हे विद्यार्थ्याच्या पातळीनुसार असावे, बाल साहित्याचा समावेश असावा आणि मुलांना निश्चित प्रकारची अध्ययन मदत उपलब्ध करून देणाºया नियमित चाचण्या घेण्यात याव्या.या सर्व उपायोजनांसोबतच सुरुवातीच्या इयत्तांमधील मुलांना कसे शिकवावे आणि त्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करावा याचे परिणामकारक प्रशिक्षण शिक्षकांना देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना नियमितपणे प्रशिक्षण व आवश्यकतेनुसार मार्गदर्शनाची जोड देणे आवश्यक आहे. वर्गाबाहेरही, यासंदर्भात मागे राहिलेल्या शाळा, जिल्हे व राज्ये यांना कशा प्रकारे मदत करता येईल याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलची गरज आहे.आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळू या. शाळा, जिल्हा आणि राज्य पातळीवरील आपल्या कामगिरीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या ध्येयसिद्धीच्या दृष्टिकोनातून आपण कितपत हेतू साध्य केले आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार पुढील कृती करणे आवश्यक ठरते. प्रत्येक जिल्ह्यामधील गरजू शाळांची नोंद होणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना प्रशिक्षण, अध्यापन किंवा साहित्यासंदर्भातील अधिक स्रोत उपलब्ध करून देता येतील.

भारतातील स्रोत लक्षात घेता पुढील पाच वर्षांत मूलभूत अध्ययन पातळी सर्वांपर्यंत पोहोचविणे शक्य आहे, ही सकारात्मक बाब आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती, योग्य कृती आराखडा आणि सातत्य आणि शिक्षक व पालकांकडून सक्रिय सहकार्य असेल तर मुलांच्या शिक्षणाची खातरजमा आपण निश्चितच करू शकतो.

Web Title: Examine the study ability of the school and teachers with the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.